कोठारबन येथे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन
कृषी विशेष

केज /प्रतिनिधी:दीनदयाल शोध संस्थान कृषि विज्ञान केंद्र अंबाजोगाई यांच्या माध्यमातून कोठारबन ता. वडवणी जि. बीड येथे दि २५ रोजी ‘प्रक्षेत्र दिवस’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे सरपंच अशोक मुंडे तर कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून कृषि विज्ञान केंद्राचे वरीष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. वसंत देशमुख, प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. प्रदीप सांगळे (पिक संरक्षण) आणि कृष्णा कर्डिले (शास्त्रज्ञ पीकविद्या) उपस्थित होते.
मंचावर आर. बी. भोंडवे (विभागीय व्यवस्थापक, नुजीवीडू सीड्स), जाधवर (कृषी पर्यवेक्षक) कृषी विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना कर्डिले यांनी सांगितले की, कृषि विज्ञान केंद्राच्या माध्यमातून दरवर्षी शेतकऱ्यांचा शेतावर आधुनिक तंत्रज्ञान प्रात्यक्षिक राबविण्यात येतात. केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर यांच्या माध्यमातून बीड जिल्ह्यात विशेष कापूस प्रकल्प अंतर्गत ‘कापूस घनलागवड तंत्रज्ञान प्रात्यक्षिके’ राबविली जात आहेत. कापूस घनलागवड व एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थान प्रात्यक्षिकाचे दृष्य निष्कर्ष शेतकऱ्यांना प्रत्यक्षात पाहता यावेत यासाठी प्रक्षेत्र दिवसाचे आयोजन केल्याचे त्यांनी सांगितले. पुढे माहिती देताना त्यांनी सांगितले कि, कापूस पिकामध्ये घन लागवड तंत्रज्ञानामुळे एकरी झाडांची संख्या वाढून उत्पादकतेते वाढ होते. कापूस पिकातील अन्नद्रव व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन केले.
डॉ. सांगळे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, मराठवाडयातील मोठ्या क्षेत्रावर कापूस घनलागवड तंत्रज्ञान प्रयोग घेतले आहेत. गळफांदी छाटणी तंत्रज्ञान, कापूस पिकातील कीड व्यवस्थापन, फवारणी तंत्रज्ञान याचा अवलंब करून विद्यापीठ शिफारशी देत आहे. त्यामध्ये कामगंध सापळे कसे हाताळावे आणि चिकट सापळे घरी कसे तयार करता येतील, कापूस लागवड तंत्रज्ञानात बदल करून कापसातील कीड व्यवस्थापन करून एकरी उत्पादन वाढवणे शक्य आहे.
अध्यक्षीय मार्गदर्शन करताना अशोक मुंडे यांनी सांगितले की, गावातील कापसाची उत्पादकता वाढविणे सोबतच उत्पादन खर्च कमी करून उच्च दर्जाचा कापूस पिकवणे आवश्यक आहे, कृषि विज्ञान केंद्राच्या माध्यमातून शेतकर्यांनी नवनवीन कृषी तंत्रज्ञान आत्मसात करावे, असे त्यांनी सांगितले.
केंद्रीय कापूस संशोधन संस्था अंतर्गत विशेष कापूस प्रकल्पाचे समन्वयक डॉ. मनिकंदन यांनी आभासी माध्यमाद्वारे शेतकन्यांची संपर्क साधून प्रात्यक्षिकाचे अभिप्राय घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालाजी बोबडे यांनी केले तर आभार यल्लालिंग चिंतले व्यक्त केले, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुरज पोकळे (प्रकल्प युवा व्यावसायिक – 2), मंगेश चाटे व अभिजीत भोसले यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमास गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.