खा.सोनवणेंकडून महामार्ग, रेल्वेसाठी सतत पाठपुरावा; केंद्रीय मंत्र्यांची भेट घेवून मांडले प्रश्न
पाठपुराव्यातील चिकाटी पाहून केंद्रीय मंत्री गडकरींनी थोपटली पाठ, रेल्वेमंत्री वैष्णव यांच्याकडून मागण्यासंदर्भात सकारात्मकता

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
दिल्ली विशेष न्युज
बीड जिल्ह्यातील विविध राष्ट्रीय महामार्गाचे काम तातडीने पुर्ण करावेत, महामार्ग कामे करीत असताना जिथे-जिथे तांत्रिक दोष झालेले आहेत ते दुरुस्त करावेत, भेगा पडलेल्या महामार्गांची दुरूस्ती करावी, अशा विविध मागण्यांसाठी खा.बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची दिल्लीत भेट घेतली. यावेळी सततचा पाठपुरावा पाहून मंत्री नितीन गडकरी यांनी पाठ थोपटली. तर जिल्ह्यातील रेल्वेच्या संदर्भात केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेवून रेल्वे संदर्भातील विषयावर चर्चा केली. यावेळी मंत्री वैष्णव यांनी रेल्वेसंदर्भाने मांडलेल्या सर्व मागण्यांबाबत सकारात्कता दर्शवली.
दि.२४ जुलै रोजी खा.बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात त्यांची भेट घेतली. यावेळी शेगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग मधील परतूर-माजलगाव बिटमधील सादोळा (ता.माजलगाव) येथील अपूर्ण असलेली सर्व कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली. माजलगाव-केज बिटमधील नादुरुस्त भागांची दुरुस्ती व तांत्रिक दोष दूर करण्याबाबत निर्देश द्यावेत, धारूर घाटातील प्रस्तावित वळण मार्गाचे काम तसेच बर्दापूर-लोखंडीसावरगाव चौपदरीकरणाचे काम लवकरात लवकर सुरू करावे, केज-कळंब मधील मांजरा नदीवरील पुलाच्या कामासंदर्भात निर्माण झालेल्या अडचणी दूर करून काम पूर्ण करावे, पैठण-पंढरपूर रस्ता व अहमदपूर-मांजरसुंबा-पाटोदा या रस्त्यांवरील समस्या तातडीने सोडवाव्यात व प्रस्तावित अतिरिक्त बाबींना मंजुरी देण्यात यावी. छत्रपती संभाजीनगर—बीड—सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील गेवराई तालुक्यातील गढी येथील उड्डानपुल व रस्ता हा विभागाच्या तांत्रिक दोषामुळे अपघात होऊन ६ युवकांचा दुर्दैवी मृत्यू ओढवला. या तांत्रिक दोषाची जबाबदारी निश्चित करण्यात यावी. मयतांच्या कुटूंबियांना मदत करण्यात यावी, अशी आग्रही मागणी केली. या सर्व मुद्द्यांकडे ना.गडकरी यांनी वैयक्तिक लक्ष घालण्याचे आश्वासन दिले व उर्वरित कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी संबंधितांना सूचना दिल्या. याच वेळी ‘तुमचा बीड जिल्ह्याच्या विकासासाठीचा पाठपुरावा आणि धडपड चांगली आहे’, अशा शब्दात पाठीवर थाप देवून कौतूक केले. यानंतर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची त्यांच्या संसदभवन कार्यालयामधे खा.सोनवणे यांनी भेट घेतली. यावेळी, आहिल्यानगर-बीड—परळी रेल्वे प्रकल्पाअंतर्गत प्रस्तावित १० रोड ओव्हर ब्रिज व ढोलेवस्ती (बीड) रोड अंडरपासचे काम त्वरीत सुरू करण्यात यावे. बार्शीनाका (बीड शहर) रेल्वे स्टेशनवर प्रवासी संख्येच्या प्राथमिकतेच्या आधारे थांबा देण्यास मंजुरी देणे, अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर रेल्वे स्टेशनवर रेल्वेगाड्यांना थांबा देण्याचा प्रस्ताव मंजूर करून आदेश त्वरित निर्गमित करणे, बीड-आहिल्यानगर-सीएसटी (मुंबई) अशी नियमीत रेल्वेसेवा लवकर सुरू करावी, अशी मागणी केली. यावेळी मंत्री वैष्णव यांनी सकारात्मकता दाखवित मागण्यांसदर्भात कार्यवाही करण्याचा शब्द दिला.
००
बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी महामार्ग, रेल्वेचे कामे होणे अत्यंत महत्त्वाचे असून, केंद्रीय मंत्री गडकरीसाहेब यांनी वैयक्तिक लक्ष देतो, असा शब्द दिला आहे. तर रेल्वेमंत्र्यांनी मागण्यासंदर्भात सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. या प्रकल्पांची अंमलबजावणी लवकरात लवकर होण्यासाठी माझ्याकडून सातत्याने पाठपुरावा केला जाईल.
– खा.बजरंग सोनवणे, बीड मतदारसंघ.
००
सादोळाकरांची माणगी केंद्रीय मंत्र्यांपुढे मांडली
शेगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गमधील परतूर-माजलगाव बिटमधील सादोळा (ता.माजलगाव) येथे पुल आणि रस्त्याचे काम अपुर्ण आहे. याठिकाणी जमीनीवरूनही वादविवाद निर्माण झालेले आहेत. यामुळे काम अपूर्ण असून यावर योग्य तो मार्ग काढून तेथील काम पूर्ण करावे, यासाठी मागील काही दिवसांपुर्वी सादोळाकरांनी उपोषण केले होते. यानंतर दि.२४ जुलै रोजी खा.सोनवणे यांनी सादोळाकरांचा प्रश्न थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यापुढे ठेवला. रस्त्यासंदर्भात जनभावना लक्षात घेवून तो प्रश्न तातडीने सोडवू, असे मंत्री गडकरी म्हणाले.