मराठा मोर्चासाठी येणाऱ्या वाहनांना टोलमाफी द्या; खा.सोनवणे भेटले गडकरींना
मराठा समाजाच्या मोर्चासाठी दिले MSRDC आणि NHAI ला पत्र

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
बीड: मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई मोर्चा निमित्त बीड जिल्ह्यासह राज्यभरातून मुंबईकडे लाखो वाहने येणार आहेत. या वाहनांमधून युवक, शेतकरी, कष्टकरी येणार असून त्यांच्यावर आर्थीक भार पडू नये, यासाठी त्यांच्या वाहनांना टोल माफी देण्यात यावी, अशी मागणी खा.बजरंग सोनवणे यांनी मुख्य महाव्यवस्थापक व प्रादेशिक अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, कोंकण-भवन, मुंबई व व्यवस्थापकीय संचालक, राष्ट्रीय महामार्ग, मुंबई यांना पत्र दिले असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेवूनही मागणी केली आहे.
मुख्य महाव्यवस्थापक व प्रादेशिक अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, कोंकण-भवन, मुंबई व व्यवस्थापकीय संचालक, राष्ट्रीय महामार्ग, मुंबई यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे, दि.२९ ऑगस्ट २०२५ रोजी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या मुंबई येथील आंदोलनात सहभागी होण्यासाठी बीडसह राज्यातील विविध जिल्ह्यांतून मोठ्या संख्येने नागरिक मुंबईकडे प्रवास करणार आहेत.या प्रवासासाठी हजारो वाहने मुंबईकडे येणार असून त्यामुळे मार्गावरील टोल नाक्यांवर मोठी गर्दी होणार आहे तसेच प्रवाशांवर अतिरिक्त आर्थिक भार येणार आहे. शेतकरी, युवक आणि सर्वसामान्य नागरिक स्वयंस्फूर्तपणे या आंदोलनात सहभागी होत असल्यामुळे त्यांच्यावर जादा खर्च पडू नये, यासाठी त्या कालावधीत मुंबईकडे येणाऱ्या व जाणाऱ्या सर्व वाहनांना टोलमाफी देण्यात यावी, या निर्णयामुळे जनतेला आर्थिक दिलासा मिळेल, टोल नाक्यांवरील गर्दी कमी होईल व वाहतूक व्यवस्थापन सुलभ होईल म्हणून या संदर्भात तातडीने आवश्यक आदेश निर्गमित करावेत, असे म्हटले आहे. मुख्य महाव्यवस्थापक व प्रादेशिक अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, कोंकण-भवन, मुंबई व व्यवस्थापकीय संचालक, राष्ट्रीय महामार्ग, मुंबई यांना पत्र दिल्यानंतर खा.बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची देखील भेट घेतली. यावेळी मराठा समाजाच्या मोर्चासाठी येणाऱ्या वाहनांना टोलमाफीचा निर्णय घेण्यात यावा, तसे आदेश आपण द्यावेत, अशी मागणीही केली. यावेळी दोघात टोलमाफिच्या विषयावर सकारात्मक चर्चा झाली आहे.
००
समाजासाठी पत्र देणारे पहिले लोकप्रतिनिधी
राज्यात मराठा आरक्षण प्रश्नी वातावरण तापलेले आहे.दि.२९ ऑगस्ट रोजी मुंबई येथे मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन होत आहे. यासाठी ग्रामीण भागातून येणाऱ्या गरीब मराठा समाजावर आर्थीक भार पडू नये, यासाठी टोलमाफीचे पहिले पत्र केंद्रीय मंत्री तसेच MSRDC व NHAI यांना दिले आहे. असे पत्र देणारे खा.बजरंग सोनवणे हे पहिले लोकप्रतिनिधी आहेत.
—