केज-कळंब रस्त्यावरील जुन्या पुलावरील रस्त्याची तातडीने दुरूस्ती करा
दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन करणार - संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रविण ठोंबरे यांचा इशारा

समृद्ध महाराष्ट्राच्या…
सर्वांगीण बातम्यांसाठी…..
वैभवशाली महाराष्ट्र न्यूज विशेष
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
बीड जिल्ह्यातील केज ते कळंब रस्त्यावरील मांजरा नदीचा नवीन पूल होईपर्यंत जुन्या पुलाच्या दोन्ही बाजूचा रस्ता व पुलाची दुरूस्ती तात्काळ करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रविण ठोंबरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे केली आहे.
या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री यांना संभाजी ब्रिगेडच्या वतीने यापूर्वी निवेदन देण्यात आले आहे. आमच्या प्रतिनिधीशी बोलताना संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रविण ठोंबरे यांनी सांगितले की, बीड जिल्ह्यातील केज ते कळंब रस्त्यावर मांजरा नदीचा जुना पुल आहे. सदर ठिकाणी नवीन पुलाचे काम जवळपास मागील चार ते पाच वर्षांहून अधिक काळापासून सुरूच आहे. परंतु, अद्यापही सदर नवीन पुलाचे व पुलाला जोडणाऱ्या दोन्ही बाजूंच्या रस्त्याचे काम हे पूर्ण झालेले नाही. त्याठिकाणी असलेल्या जुन्या पुलावरील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. पुलाचे कडेही तुटले आहेत. त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता असून सदर जुना पुल हा वाहतूकीसाठी अत्यंत धोकादायक बनला आहे. त्यामुळे नवीन पुलाचे काम होईपर्यंत जुन्या पुलावरील रस्ता व पुलाची दुरूस्ती करणे हे अत्यंत आवश्यक आहे. केज ते कळंब हा रस्ता पूर्वी राज्य रस्ता होता. त्यानंतर सदर रस्ता हा राज्य रस्ते विकास महामंडळाकडे हस्तांतरित झाला आहे. त्यामुळे पर्यायी रस्ता व्यवस्थित करण्याची जबाबदारी संबंधित कंत्राटदारावर असताना ही सदर अत्यंत वर्दळीच्या रस्त्यावर अधिकारी व संबंधित कंत्राटदार हे दुरूस्ती बाबत दुर्लक्ष करीत आहेत. ही अतिशय गंभीर बाब आहे. तरी बीड जिल्ह्यातील केज ते कळंब रस्त्यावरील मांजरा नदीचा नवीन पूल होऊपर्यंत जुना पूलाच्या दोन्ही बाजूचा रस्ता व पुलाची त्वरित दुरूस्ती करण्याबाबत राज्य सरकारने सार्वजनिक बांधकाम विभागाला आदेश द्यावेत अशी मागणी जिल्हाध्यक्ष प्रविण ठोंबरे यांनी केली आहे.
*अन्यथा तीव्र आंदोलन करणार :*
केज – खामगाव – पंढरपूर महामार्गावरील केज तालुक्यातील मांगवडगाव फाटा ते मांजरा नदीवरील पुल, कळंब शहराजवळील धाराशिव जिल्हा हद्दीपर्यंत अत्यंत खराब व नादुरूस्त रस्त्यामुळे चालू मालवाहतूक वाहनातून शेतमाल चोरीला जात असल्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. तसेच वाहनांचे, विशेषतः दुचाकी अपघात झाले आहेत, सोयाबीनचे कट्टे चोरीच्या घटना ही घडलेल्या आहेत. परिणामी शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. तसेच या नादुरूस्त रस्त्यामुळे आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर वारी करणाऱ्या वारकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागला आहे. या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री यांना यापूर्वी संभाजी ब्रिगेडच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. त्यामुळे रखडलेले काम तात्काळ सुरू करावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल याची सरकार आणि प्रशासनाने नोंद घ्यावी.
*- प्रविण उत्तमराव ठोंबरे*
(जिल्हाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड, बीड.)