मराठा समाजाला सरसकट आरक्षण द्यावे – जेष्ठ नागरिकांचे उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
येथील मराठा समाजातील ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने मराठा समाजाला सरसकट आरक्षण द्यावे या मागणीचे निवेदन अंबाजोगाईचे उपविभागीय अधिकारी यांना मंगळवार, दिनांक १९ डिसेंबर २०२३ रोजी देण्यात आले. या निवेदनावर ५० हून अधिक मराठा समाजातील ज्येष्ठ नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. हे निवेदन देताना राज्याचे मा.मुख्यमंत्री व दोन्हीही उपमुख्यमंत्री यांना मराठा समाजाच्या ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने देण्यात आलेल्या सदरील निवेदनात नमूद आरक्षणा संदर्भातल्या भावना कळवाव्यात अशी विनंती प्रशासनाकडे केली आहे.
सदरील निवेदनात पुढे म्हटले आहे की, आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा समाज सातत्याने शांततेच्या मार्गाने आंदोलने करीत आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे अत्यंत कुशलतेने व शांततेच्या मार्गाने हे मराठा आरक्षणाचे आंदोलन हाताळीत आहेत. आज त्यांच्या पाठीशी महाराष्ट्रातील सर्व गरजवंत, सर्वसामान्य, कष्टकरी व शेतकरी (कुणबी) मराठा यांच्या पाठिंब्याची प्रचंड मोठी शक्ती उभी आहे. विद्यमान मा.मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे आरक्षण देण्यासाठी सकारात्मक आहेत. त्याबद्दल त्यांचे मराठा समाजातील जेष्ठ नागरिकांच्या शिष्टमंडळाने आभार व्यक्त केले आहेत. सदरील मागणीसाठी यापुढे आंदोलन करण्याची गरज पडली तर ज्येष्ठ नागरिक हे देखील उपोषण करण्यासाठी तयार असल्याची भावना यावेळी सर्वच ज्येष्ठ मराठा नागरिक यांच्याकडून व्यक्त करण्यात आली. निवेदनावर ज्येष्ठ नागरिक डॉ.दामोदर थोरात, धनराज मोरे, दाजीसाहेब लोमटे, श्रीरंग चौधरी, मनोहर कदम, अंगद तट, लक्ष्मण गोरे, पुंडलिक पवार, शिवाजी शिंदे, राजेश्वर चव्हाण, दत्तात्रय आंबाड, ज्ञानोबा देशमुख, परमेश्वर करपे, महादेव चौधरी, नारायण मुळे, प्राचार्य बाळासाहेब चव्हाण, भीमराव मुळे, अण्णासाहेब जगताप, मदन नरवाडे, राजेंद्र लोमटे, सुभाष डोंगरे, चंद्रकांत ठोंबरे, दगडू साळुंके, शंकर मोरे, दिनेश गंगणे, प्रदीप मोरे आदींसह ५० हून अधिक जणांच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदन देताना अनेकांनी उपस्थित राहून आपल्या समायोचित भावना व्यक्त केल्या. सर्वप्रथम अंगदराव तट यांनी मराठा आरक्षण विषयक भूमिका मांडली. शेवटी उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरिकांनी “एक मराठा, लाख मराठा” अशा घोषणा दिल्या.