आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणमहाराष्ट्रवैभवशाली महाराष्ट्र न्युज

शिक्षकांनी विद्यार्थीकेंद्रीत साहित्य निर्मिती करावी – डॉ.हेमंत वैद्य

श्री. खोलेश्वर शैक्षणिक संकुलात 'हैद्राबाद मुक्तिसंग्राम आणि अंबाजोगाईची शौर्यगाथा' पुस्तकाचे प्रकाशन

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज विशेष

अंबाजोगाई (प्रतिनिधी)

विद्यार्थी उपयोगी साहित्य निर्मिती होणे ही काळाची गरज ओळखून विद्यार्थ्यांना आपल्या राष्ट्रीयत्वाच्या विचाराने समृद्ध करणारे परंतु विद्यार्थ्यांच्या आकलन शक्तीचा विचार करून त्यांच्या पातळीचे साहित्य शिक्षकांनी निर्माण करावे, ज्यातून आपल्या संस्थेचे राष्ट्रसमर्पित विद्यार्थी घडविण्याचे ध्येय साध्य होईल हे नक्की, असे प्रतिपादन भा.शि.प्र.संस्थेचे कार्यवाह डॉ.हेमंत वैद्य यांनी केले.

येथील श्री.खोलेश्वर शैक्षणिक संकुलाच्या वतीने आयोजित केलेल्या ‘हैद्राबाद मुक्तिसंग्राम आणि अंबाजोगाईची शौर्यगाथा’ या संकुलातील शिक्षकांनीच लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात केले. पुढे ते म्हणाले की, शिक्षकांनी सक्रीय सहभागी होऊन विद्यार्थ्यांना हैद्राबाद मुक्तिसंग्रामातील अंबाजोगाई शहरातील स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेल्या क्रांतिकारी लढ्याच्या निवडक कथा या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यात उत्सुकता वाढेल आणि यातून ते खरा इतिहास जाणतील , ही नक्कीच अभिनंदनीय बाब आहे.’ प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजनानंतर स्वागत व परिचय झाला. प्रास्ताविकातून स्थानिक समन्वय समितीचे कार्यवाह किरण कोदरकर यांनी मुक्तिसंग्रामाचा इतिहास, त्यात सहभागी झालेल्या स्वातंत्र्यसैनिकांचा पराक्रम, समर्पण, त्याग, जाज्वल्य देशप्रेम याबद्दल आजच्या पिढीमध्ये कृतज्ञतेची भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने या पुस्तकाची निर्मिती केली असल्याचे सांगितले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन झाले.यावेळी केंद्रीय कार्यकारिणी सदस्या वर्षाताई मुंडे यांनी संपादकीय भूमिकेतून पुस्तक निर्मितीची संकल्पना व भूमिका मांडली. प्रमुख पाहुणे गोरक्षनाथ आबुज यांनी सांगितले की, सध्या चुकीचे विमर्श निर्माण करून समाजामध्ये बुद्धीभेद करण्याचे दुष्कर्म राष्ट्रविघातक मंडळी करत आहेत. त्यामुळे इतिहास साहित्यातून पाठीमागचे चित्र स्पष्ट दिसले पाहिजे तरच वर्तमान आणि भविष्यातील वाटचाल योग्य होऊ शकेल. यासाठी मराठवाडा मुक्तिसंग्रामाचे तथ्य समजून घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळामध्ये आपल्या विचाराची, पुराव्यांवर आधारित इतिहास मांडणारी मंडळी पोहचणे आवश्यक असल्याचे ही ते म्हणाले. मराठवाडा मुक्तिसंग्राम हा जनसामान्यांचा इतिहास असून आपल्याच घरात, गल्लीत, गावात घडलेला इतिहास आहे असेही त्यांनी सांगितले. पुढे त्यांनी क्रूर निजामशाहीचा २२५ वर्षांचा इतिहास मांडला.सत्य ऐकले नाही तर तथ्य समोर येणार नाही, त्यामुळे मग जो कोणी काय सांगेल तेच खरे मानण्याची वेळ येते हे त्यांनी आवर्जून सांगितले. अध्यक्षीय समारोपात कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ इतिहास अभ्यासक प्रा.डॉ.हर्षवर्धन आर्य यांनी सांगितले की, या संस्थेत येण्याचे भाग्य लाभले.ही पुस्तिका दर्जेदार झालेली असून विद्यार्थी केंद्रबिंदू ठेवून निर्माण झाली असल्याचे सांगितले. हैद्राबाद स्वातंत्र्यसंग्राम हा एका समान ध्येयाने जात-पात विरहीत लढा होता. निजामशाहीचा इतिहास सांगतांना त्यांनी आर्यसमाजाचे अमूल्य योगदान असल्याचे पुराव्यानिशी सर्वांना दाखवून दिले. इतिहास ही माणसाला सूज्ञ बनवणारी ज्ञानशाखा आहे. त्यामुळे पारदर्शक पद्धतीने इतिहास अभ्यास व लेखन झाले पाहिजे ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. व्यासपीठावर रा.स्व.संघाचे जिल्हा कार्यवाह बिपीन क्षीरसागर, स्थनिक समन्वय समितीचे अध्यक्ष विजयराव वालवडकर यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमासाठी संस्थेचे सन्माननीय पदाधिकारी, स्थानिक पदाधिकारी, मुक्ति लढ्यातील क्रांतिकारकांचे कुटुंबीय, पत्रकार, जाहिरातदार, संकुलातील सर्व प्राध्यापक, शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केदार वाघमारे यांनी केले. तर वैयक्तिक पद्य जयेंद्र कुलकर्णी यांनी सादर केले. उपस्थितांचे आभार आप्पाराव यादव यांनी मानले.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.