रक्षामंत्री पदक मिळविणारे मेजर प्रा.एस.पी.कुलकर्णी यांचा छात्र सेनेला जय हिंद
सन्मान कार्याचा , गौरव व्यक्तीमत्वाचा ..!

वैभवशाली महाराष्ट्र न्युज
अंबाजोगाई विशेष
================
पस्तीस वर्षांचे शैक्षणिक आयुष्य केवळ छात्र सेना अर्थात महाराष्ट्र बटालियनला समर्पित करून ज्यांनी अंबाजोगाईसह जिल्ह्याचा नांवलौकिक वाढविला, एनसीसी हाच आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक समजून त्याहून अधिक सामाजिक दायित्व पत्करून ग्रामीण भागातील हजारो मुलांना प्रवेशित करायचे, प्रशिक्षित करून जीवनाची रोजी रोटी मिळवून देणारे एवढेच नाही. तर याच क्षेत्रात कर्तव्यदक्ष राहून चौफेर कामगिरी करताना भारत सरकारकडून रक्षामंत्री पुरस्कार ज्यांना मिळाला ते मेजर प्रा.एस.पी.कुलकर्णी यांनी नुकतीच छात्र सेनेतुन निवृत्ती घेतली आहे. मेजर प्रा.एस.पी.कुलकर्णी यांच्या कार्याचा गौरव करणारा हा लेख नव्या पिढीसाठी निश्चितच प्रेरणादायक ठरेल..!”_
================
“माय अर्थ माय ड्युटी” त्याहून अधिक वृक्षारोपण आणि जल साक्षरता हे प्रयोग हाती घेवून सामाजिक जनजागृतीची काम करणार्या ध्येयवेड्या प्राध्यापकांनी शिक्षण संस्था परिसरात पाच हजारपेक्षा अधिक लावलेली झाडे ज्याला ग्रीनरी सिटीसारखं स्वरूप प्राप्त झालं. त्यांची निवृत्ती ही विद्यार्थ्यांना मात्र पसंत होणारी नाही. योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या सेवेत येण्याअगोदर विद्यार्थी दशेपासून सरांना एनसीसीची आवड होती. प्रशिक्षण काळात अंडर ऑफीसर इथपासून ‘सी सर्टिफिकेट’ एवढेच नाही तर अनेक नामांकन त्यांनी प्राप्त केलेले होते. बटालिअन हा खर्या अर्थाने राष्ट्रभक्ती आणि सामाजिक दायित्व शिवाय देशाची सेवा कशी करावी ? याचे ज्ञान अवगत करून देणारी संस्था म्हणुन ओळखल्या जाते. देशाच्या सुरक्षेत एनसीसी विषयाचं महत्तम अधिक आहे. एस.पी.कुलकर्णी हे मुळचे ग्रामीण भागातले रहिवाशी. शिक्षणासाठी अंबाजोगाईत आल्यानंतर ज्या ठिकाणी पदवी शिक्षण घेतलं, त्याच महाविद्यालयात नोकरी प्राप्त केली. वास्तविक पहाता त्यांना पोलीस खात्यामध्ये जाणं आवडीचा विषय होता.शक्य न झाल्यामुळे महाविद्यालयात हे व्रत स्विकारलं. आपल्या हातुन युवकांच्या व्यक्तिमत्वांची जडणघडण होते. देशभक्त आपण निर्माण करू शकतो. एवढच नाही तर ग्रामीण भागातील मुलांना रोजगार मिळवुन देण्यासाठी हे साधन महत्वाचं. म्हणून त्यांनी यासाठी जीवाचे रान करीत पस्तीस वर्षे केलेली सेवा अंबाजोगाईच्या शिक्षण क्षेत्रात कुणीच विसरू शकत नाही. एस.पी.म्हटले की, एनसीसी हे समीकरण विविध क्षेत्रातील लोकांच्या डोळ्यांसमोर यायचे. शहर स्वच्छता असेल किंवा नवरात्र उत्सवात योगेश्वरी मंदिर स्वच्छता असेल एवढेच काय शासकिय अधिकार्यांना एखादा सामाजिक उपक्रम घ्यायचा असेल तर एस.पी.हे नांव डोळ्यासमोर येत असे. पस्तीस वर्षांचा प्रदीर्घ कालावधी त्याची कर्तव्ये आणि एकनिष्ठता हे नसे थोडके. इथं काम करताना आतापर्यंत त्यांनी अनेक उपक्रम हाती घेतले. मध्यंतरी राज्यात युवकांना सोबत घेवुन काढलेली मोटार सायकल रॅली असेल शिवाय पर्यावरण आणि वृक्षारोपण यासाठी सायकल फेरीतून केलेलं जागरण असेल. त्याहून अधिक बटालिअनचे विविध उपक्रम यात ते कधीच मागे राहिले नाहीत. या क्षेत्राचा इतका छंद त्यांना होता आयुष्यात या माणसाने स्वत:चा संसार न पहाता शंभर टक्के झोकुन देवुन एकाच विषयात लक्ष केंद्रित केले. बटालिअनचे तिन्ही सेक्टर त्या ठिकाणी कमांडींग ऑफीसर म्हणुन काम केलं. अनेक योजना त्यांनी प्रत्यक्ष अंमलात आणताना सैन्य भरती प्रशिक्षण, वृक्षारोपण, जलसाक्षरता, श्रममेव जयते अभियान आदी उपक्रम त्यांनी राबवले. मुळात राष्ट्रभक्ती तथा सामाजिक उत्थान प्रेरित असलेले एस.पी.अगदी एनसीसी हा त्यांच्या र्हदयाचा श्वास होवून बसला होता. यामागे अनेक कारणे स्वत:च डोंगराएवढी गरिबी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिली. शिवाय ऊसतोड कामगाराचा हा बीड जिल्हा. इथल्या लेकरांना एनसीसीच्या माध्यमातून नोकरी मिळावी असे अनेक त्यांचे उद्देश समाजकारी असायचे. खरे तर त्यांनी हजारो विद्यार्थी या माध्यमातून घडविले जे आज ठिकठिकाणी योग्य पदावर काम करताना दिसतात. स्वत: जिद्द आणि चिकाटी ज्याचा वापर त्यांनी रात्रंदिवस या विषयात केला. योगेश्वरी महाविद्यालयात त्यांच्या माध्यमातून सुरू असलेलं हे दालन :न भुतो न भविष्यति” असे म्हणावे लागेल. यापूर्वी त्यांना पन्नास पेक्षा अधिक वेगवेगळे नामांकित पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागाने वनश्री पुरस्कार देवून सन्मान केला. त्याचे कारण वृक्ष लागवड हे उद्दिष्ट केवळ कागदावर न ठेवता प्रत्यक्ष अंमलबजावणी करून सामाजिक जनजागृती या प्रश्नावर मोठ्या प्रमाणात केली. जिथे जाणार तिथे झाड लावणार हा त्यांचा मुळ स्वभाव. संस्था परिसरात त्यांनी लावलेली झाडे पोटच्या लेकरासारखी जपताना पाच हजार पेक्षा अधिक जो परिसर आजही पहाताना सुंदर, रम्य दिसून येतो. खरे म्हणजे अजातशत्रू ही त्यांची प्रतिमा. शिक्षण क्षेत्रात काम करताना संस्था विचार आणि पदाधिकार्यांचे मार्गदर्शन या चौकटीत त्यांनी केलेली सेवा नेत्रदीपक म्हणावी लागेल. दुसरी विशेष बाब म्हणजे काही दिवसांपूर्वी एनसीसी या विषयातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना भारत सरकारचा रक्षामंत्री पुरस्कार मिळालेला आहे. खरे तर ही अत्यंत स्वाभिमानाची गोष्ट म्हणावी लागेल. आजवर हा पुरस्कार बीड जिल्ह्यात नव्हे कदाचित मराठवाड्यात कुणालाही मिळालेला नसेल. अत्यंत सन्मानजनक तत्कालीन देशाचे संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडीस यांच्या शुभ हस्ते दिल्लीत पुरस्कार सन्मान सोहळा झाला होता. खरे म्हणजे माणूस एका ठिकाणी कुठ पर्यंत काम करतो ? वय कालपरत्वे अनेक मर्यादा येतात. पण, एक गोष्ट पुन्हा पुन्हा सांगावी वाटते 15 ऑगस्ट तसेच 26 जानेवारी हे राष्ट्रीय उत्सव आले की, एक-एक महिना या ध्येयवेड्या प्राध्यापकाचे मन संसार तर सोडा स्वत:ला सांभाळता येत नसे. 24 तास योगेश्वरीच्या मैदानावरचा प्राध्यापक हे लोकांनी पाहिलेलं आहे. या विषयात त्यांची कडवी निष्ठा खरोखरच आदर्श घेण्यासारखी वाटते. त्यांच्या हातून कितीतरी पोलीस अधिकारी झाले. सैन्यदलात अनेकजण गेले. पण, ही सारी मंडळी आजही एस.पी. सरांना जयहिंद घातल्याशिवाय रहात नाहीत. खरे तर कुठलीही जबाबदारी सरळ, सोपी असते असे नव्हे. 35 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीत अनेक चांगले अनुभव तितकेच कटु अनुभव प्रत्यक्ष अनुभवलेले हे प्राध्यापक म्हणावे लागतील पण, शुद्ध कर्माच्या आधारावर वेगवेगळ्या प्रसंगातून बाहेर पडले ही खर्या अर्थाने स्वकर्तृत्वाची आई-वडिलांची पुण्याई म्हणावी लागेल. त्यांच्या स्वभावाचा एक एक पैलू हा आदर्श घेण्यासारखा म्हणावा लागेल. परोपकार धर्म, मानवतावादी दृष्टीकोन आणि स्वत:च्या श्रेष्ठत्वाविषयी कधीही नसलेला अहंकार केवळ सेवाभाववृत्ती अन् राष्ट्र समर्पण भावना यातून त्यांचे झालेले मार्गक्रमण नव्या पिढीने आदर्शव्रत घेण्यासारखे आहे. त्यांचं कार्य पाहून बीड येथून प्रकाशित होणार्या एका नामांकित दैनिकाने दोन दिवसांपूर्वी विशेष पुरस्कार देवून सन्मानित केलेले आहे. वर्तमान जीवन जगताना नोकरीचे वय आणि शारीरिक मर्यादा लक्षात घेता स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांत त्यांनी छात्र सेवेतून घेतलेली निवृत्ती त्याला त्रिवादी सलाम. त्रिवादी सलाम.
समाजात अशी माणसे उपलब्ध होणे किंवा एकांगी सेवा आणि निष्ठेचा आदर्श दाखवुन देणारी कमी मिळतात. पण, एक गोष्ट निश्चित म्हणावी लागेल मिळेल ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली तर त्यातून मिळणारा आनंद हा परमोच्च असतो. वास्तविक पहाता गतवर्षी फार मोठ्या आजाराचा सामना त्यांना करावा लागला. त्यातून बाहेर पडतील का नाही ? अशी शंका असताना सहीसलामत सन्माननिय प्राध्यापक संकटातून बाहेर पडले. आई-वडिलांची पुण्याई, ग्रामदैवताचा आशिर्वाद आणि स्वत:चे शुद्ध कर्म कदाचित हेच कामाला आले. या संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुरेशराव खुरसाळे व इतर पदाधिकार्यांनी निवृत्त पदाधिकारी मित्रांनी तथा विद्यार्थ्यांनी सरांच्या निवृत्तीला शुभेच्छा देवून भविष्य उज्ज्वल राहो असे म्हटले.
लेखक – विजय देशमुख, सहशिक्षक (माजलगाव)