पाटोदा आणि पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध- जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख
पाटोदा जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना गणवेश वाटप

वैभवशाली महाराष्ट्र न्युज
अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा (ममदापूर) येथे सोमवार, दिनांक १ ऑगस्ट रोजी सत्यशोधक आण्णा भाऊ साठे यांची जयंती विविध उपक्रम राबवून साजरी करण्यात आली. प्रारंभी बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांच्या हस्ते व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच बाळासाहेब देशमुख तर प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच गोविंद जामदार, अविनाश उगले, व्यंकटराव उगले, शिरीष मुकडे, आकाश देशमुख, सामाजिक कार्यकर्ते धिमंत राष्ट्रपाल, कैलास पाडुळे, विष्णू सरवदे हे मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर पाटोदा येथील जि.प.प्राथमिक शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांना बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख व सरपंच बाळासाहेब देशमुख यांच्या हस्ते प्रत्येकी २ संच शालेय गणवेश वाटप करण्यात आले. या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मनोज पाडुळे, उपाध्यक्ष चंद्रकांत यादव तसेच शालेय समिती सदस्य व ग्रामपंचायत सदस्य व मुख्याध्यापक एम.ए.शेख व शिक्षकवृंद, पालक उपस्थित होते. नवीन गणवेश (ड्रेस) मिळाल्याने सर्वच विद्यार्थ्यांचे चेहरे आनंदाने फुलून गेले होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख म्हणाले की, सरपंच बाळासाहेब देशमुख आणि,उपसरपंच तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मनोज पाडुळे, उपाध्यक्ष चंद्रकांत यादव, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, शाळेचे मुख्याध्यापक एम.ए.शेख आणि सर्व शिक्षकवृंद यांनी मिळून व पुढाकार घेऊन लोकसहभाग गोळा केला. त्यांच्या या समाजाभिमुख उपक्रमाला पाटोदा गावचे ग्रामस्थ आणि पालक वर्गाने भक्कम साथ दिली. यातून शंभर टक्के शालेय गणवेश वाटप करणे, शाळा दुरूस्ती, ई-लर्निंग अशा विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देत पाटोदा जि.प.शाळा ही अंबाजोगाई तालुक्यात एक नामांकित शाळा करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला त्याबद्दल माजी सभापती देशमुख यांनी सर्वांचे जाहीर कौतुक केले. तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, माझ्या शिक्षण सभापतीपदाच्या कार्यकाळात बीड जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये शासन व लोकसहभागातून विद्यार्थ्यांना २ गणवेश व शालेय साहित्य वाटप केले, विज्ञान प्रदर्शन आयोजित केले, शिक्षक व शिक्षिकांसाठी मराठवाडा साहित्य संमेलन आयोजित केले. असे विविध उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य आणि उत्साह निर्माण करते. विविध सुविधा व साहित्य हे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत पूरक ठरतील, विद्यार्थ्यांना सकस शालेय पोषण आहार दिला जातो. असे सांगून देशमुख म्हणाले की, आजची पिढी अतिशय भाग्यवान आहे कारण, ती इंनटरनेटच्या युगात घडत आहे. त्यामुळे आजच्या विद्यार्थ्याला आपल्याला पाहिजे त्या शिक्षकाकडून ज्ञान घेता येईल. आजही शिक्षकांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. पाटोदा आणि पंचक्रोशीतील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्वोतोपरी मदत करणार आहोत, मागास, वंचित घटकांना ज्ञानदान करणार्या शाळा टिकल्याच पाहिजेत. गणवेशामुळे कोणता मुलगा साहेबांचा आहे आणि कोणता मुलगा शेतकरी, शेतमजूराचा आहे हे कळत नाही. गणवेश सर्वांना समान पातळीवर ठेवतो. गणवेश हा समानतेचे तत्व घेवून जोडणारा धागा आहे. सदैव आई – वडील व शिक्षकांचा जीवनामध्ये सर्वांनी आदर करावा. गणवेशामुळे एकता निर्माण होऊन आपली व समाजातील सर्वांची ठळकपणे ओळख निर्माण होते. त्यामुळे सर्वच घटकांत गणवेश महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्यांनी मातृभाषे सोबतच इंग्रजीचे ज्ञान अवगत करून घ्यावे. त्यामुळे जगाची सहज ओळख होते असे प्रतिपादन बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी केले. तर अध्यक्षीय समारोप करताना सरपंच बाळासाहेब देशमुख म्हणाले की, बीड जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती राजेसाहेब देशमुख यांनी सुरू केलेला विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा, प्रत्येक विद्यार्थ्यांस २ संच गणवेश, शालेय साहित्य पुरविण्याचा हा उपक्रम आदर्श असल्याचे सांगून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक ते माध्यमिक शाळेतील विद्यार्थी वर्ग हा ग्रामीण भागातील, शेतकरी, शेतमजूर आणि गरीब व गरजू कुटुंबातील असतो. यापूर्वी पाटोदा येथील विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविण्यात आले असून विद्यार्थ्यांसाठी पाणी, प्रशस्त वर्ग खोल्या, ई-लर्निंग आदी शैक्षणिक सुविधा व डिजिटल शिक्षण देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती सरपंच देशमुख यांचेकडून देण्यात आली. यावेळेस शालेय समितीचे अध्यक्ष मनोज पाडुळे म्हणाले की, देशमुख कुटुंबियांनी मागील ३५ वर्षे समाजसेवेच्या माध्यमातून लोकांना यथाशक्ती मदत केली. त्यांच्या समाजसेवेच्या कार्याचे प्रतिबिंब त्यांच्या व्यक्तिमत्वातून दिसते, गोरगरिब विद्यार्थ्यांना शिक्षणातून ज्ञानी होण्यासाठी शैक्षणिक साहित्याची मदत करणे म्हणजे खरोखरच आदर्शवत कार्य आहे. पाटोदा शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकी २ संच गणवेश वाटप करून गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना अनोखी भेट दिली. राजेसाहेब देशमुख हे मागील ५ वर्षे बीड जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये गणवेश, पुस्तके, वह्या आदी शैक्षणिक साहित्याचे वाटप करून ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणास प्रोत्साहन देण्याचे अतुलनिय कार्य करीत आहेत असे गौरवोद्गार या प्रसंगी शालेय समिती अध्यक्ष पाडुळे यांच्यासह उपस्थित अनेक पालकांनी काढले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक मुकुंद सोनवणे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार शिक्षक अशोक यादव यांनी मानले. कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारीवृंद, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होता.