सकारात्मक आयुष्य जगताना, प्रत्येकाने जिभेवरचा गोडवा संवादातून टिकविण्याची गरज – राम कुलकर्णी यांचे प्रतिपादन

वैभवशाली महाराष्ट्र न्युज
———————————
अंबाजोगाई (प्रतिनिधी) मानवी जीवनात संसाराच्या वाटेवर चालताना आपल्या आयुष्याकडे पहाण्याचा दृष्टीकोन सकारात्मक असला पाहिजे. माणुस आहात तर माणुसकी र्हदयात जिवंत ठेवा. एकमेकांवर शुद्ध अंत:करणातून प्रेम करा. कुणाविषयी आकस न ठेवता आपल्या जीभेवरचा गोडवा संवादीत भुमिकेतून वाढवला तर स्नेह आपोआप निर्माण होतो. ज्यासाठी मकर संक्रांतीचीच गरज भासते असे नव्हे. सण, उत्सव भारतीय हिंदु संस्कृतीची रूढी परंपरा आपण वर्षानुवर्षे साजरी करत असतो. पण, स्वत:च्या मनाची शुद्धता द्वेषमुक्त असेल तर कुणा विषयीही मत्सर निर्माण होवू शकत नाही. एखाद्या संस्थेत काम करताना सामुहिक संघटन, मनाचे मिलन ज्यातून बंधुभाव निर्माण झाला तर आदर्श घडविले जातात असे प्रतिपादन भाशिप्र संस्थेचे केंद्रीय कार्यकारीणी सदस्य तथा खोलेश्वर महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष राम कुलकर्णी यांनी केले.
खोलेश्वर महाविद्यालयात सेवायोजन विभागाच्या वतीने मकर संक्रांतीनिमित्त आयोजित केलेल्या तीळगुळ वाटप कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोप प्रसंगी भाजपाचे राज्य प्रवक्ते कुलकर्णी हे बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मुकूंद देवर्षी, अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा.डॉ.बाबा कागदे, विभागप्रमुख प्रा.डॉ.फुलारी, प्रा.डॉ.रोहिणी अंकुश आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक करताना मकर संक्रांतीचे महत्व आणि भारतीय हिंदु संस्कृती या संदर्भात बोलताना प्राचार्य डॉ.मुकुंद देवर्षी यांनी या उत्सवाचे महत्व पटवून देताना महाविद्यालयात परंपरेनूसार कार्यक्रम घेत असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या भाषणात पुढे बोलताना राम कुलकर्णी यांनी तीळगुळाचे महत्व स्वत:च्या आयुष्याकडे घेवुन जाताना मानवी जीवन किती सुंदर आहे हे सांगताना त्यांनी सकारात्मक जीवन जगण्याचा सल्ला दिला. प्रत्येकाच्या मनाची शुद्धता आणि दुसर्या विषयी चांगली भावना ठेवणं सतत गोड बोलून संवादित जीवन जगणं एवढेच नव्हे तर कुणाविषयी आकस न ठेवता, द्वेष, मत्सराची भावना मनात न ठेवता जीवन जगणे म्हणजे खर्या अर्थाने मकर संक्रांत साजरी केल्यासारखेच होय. ज्यांच्या र्हदयातच मायेचा गोडवा, स्नेहभावाचा भावबंध दडलेला असतो अशांना बाहेरून कदाचित गोड पदार्थ खावेच लागतात असे नव्हे. आपल्या मनाची गोडी जर दुसर्याकडे बघण्यासाठी चांगली असेल त्याच ठिकाणी खरा गोडवा गुळाच्या ढेपीला देखील मागे टाकू शकतो. मकर संक्रांतीनिमित्त संकल्प करताना उपस्थित प्राध्यापक, गुरूजन वर्ग, विद्यार्थी, विद्यार्थीनीच्या समोर आयुष्य जगताना उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवले पाहिजे. शुद्ध कर्माधिष्ठित जीवन परोपकाराने जर जगलो तर नेहमीच आपल्याला हवे तिथे यश मिळाल्याशिवाय रहात नाही. आपल्यावर असलेली जबाबदारी व त्याचे कर्तव्याने पालन झाले तर प्रत्येक क्षेत्रात यश मिळवायला भविष्य बघण्याची गरज नाही. चला तर मग, चांगला संवाद करीत आयुष्य जगू, दुसर्याला ही आनंद देवूयात आणि आपण ही आनंदाने जगूयात. एवढेच नव्हे तर आपल्यातले चांगले सद्गुण प्रदर्शित होताना दुसर्याच्या डोळ्यांत कधी आश्रु येणार नाहीत अशी कृती आपल्या हातून होणार नाही याची काळजी या निमित्ताने घेण्याचा सल्ला त्यांनी दिला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.डाॅ.अजय डुबे यांनी केले. प्रा.डाॅ.रोहीणी अंकुश यांनी आभार मानले. एकमेकांना तीळगुळाचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली.