कवी दिनकर जोशी यांना अमळनेर येथे होणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे निमंत्रण
_अ.भा.मराठी साहित्य संमेलनातील सहभागाने जोशींनी चौथ्यांदा वाढविला अंबानगरीचा नांवलौकिक_

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
मराठी साहित्य संमेलन २०२४ विशेष
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे मराठी वाड्•मय मंडळ, अमळनेर द्वारा अमळनेर (जि.जळगाव) येथे २, ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी आयोजित ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील निमंत्रितांचे कविसंमेलन – १ मध्ये सहभागी होण्यासाठीचे निमंत्रण अंबाजोगाई येथील प्रख्यात कवी दिनकर जोशी यांना नुकतेच प्राप्त झाले आहे.
पूज्य सानेगुरूजी यांची कर्मभूमी असलेल्या अमळनेर (जि.जळगाव) येथील “पूज्य सानेगुरूजी साहित्य नगरी” प्रताप महाविद्यालय या ठिकाणी होत असलेल्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद प्रसिद्ध साहित्यिक प्रा.डॉ.रविंद्र शोभणे हे भूषविणार आहेत. या साहित्य संमेलनात निमंत्रितांच्या कविसंमेलनाकरिता अंबाजोगाई येथील प्रख्यात कवी आणि ज्येष्ठ पत्रकार दिनकर जोशी यांना निमंत्रित करण्यात आले आहे. काव्यवाचन करण्यासाठीचा सतत चौथ्यांदा हा बहुमान जोशी यांना प्राप्त झाला आहे. शुक्रवार, दिनांक २ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.३० ते ८.३० यावेळेत होत असलेल्या कविसंमेलन – १ च्या अध्यक्षस्थानी देविदास फुलारी (नांदेड) हे आहेत. कविसंमेलनाचे सुत्रसंचालन संजय चौधरी (नाशिक) हे करणार आहेत. या कविसंमेलनात अंबाजोगाई येथील प्रख्यात कवी दिनकर जोशी यांच्यासह संपूर्ण देशभरातून नामवंत कवी सहभागी होत आहेत. दिनकर वासुदेवराव जोशी हे मागील ३१ वर्षांपासून काव्यलेखन करीत आहेत. त्यांना आद्यकवि मुकुंदराज काव्यरत्न पुरस्कार, कै.सुभद्राबाई बिवरे यासह विविध पुरस्कार प्राप्त असून त्यांनी सासवड आणि उस्मानाबाद येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, जागतिक मराठी संमेलन, पुणे फेस्टिव्हल येथे सलग पाच वर्षे आणि मराठवाडा साहित्य संमेलनासह महाराष्ट्रातील असंख्य साहित्य व काव्य संमेलनातून सहभागी होत काव्यगायन करून सतत १५ वर्षांपासून अंबानगरीचा नांवलौकिक वाढविला आहे. त्यांचा “आयुष्याचे अवघड ओझे” हा काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे. मराठवाडा बालकुमार साहित्य संमेलन (१९९५), मायबोली साहित्य संमेलन, सद्भावना सांस्कृतिक समारोह, अंबाजोगाई साहित्य संमेलन, बालझुंब्बड आदींचे यशस्वी आयोजन, संयोजन, संकल्पना, सहभाग व मार्गदर्शन करून अंबाजोगाईसह मराठवाड्यातील साहित्य चळवळीला बळ, प्रेरणा आणि नवा आयाम देण्याचे कार्य दिनकर जोशी हे आजपावेतो करीत आहेत. विविध सामाजिक व साहित्य संस्थांचे ते पदाधिकारी ही आहेत. सामाजिक बांधिलकीतून अंबाजोगाई शहरात विविध साहित्यिक उपक्रम राबवून मराठी साहित्य क्षेत्रातील मान्यवर कविंना सन्मानित करण्यात जोशी यांचा मोठा पुढाकार राहिला आहे. दिनकर जोशी हे योगेश्वरी शिक्षण संस्थेत सहशिक्षक आहेत. शिक्षण तसेच साहित्यासोबतच त्यांनी २५ वर्षे पञकारीता केली आहे. त्यांना कै.अनंतराव भालेराव शोध पञकारीता पुरस्कार, भिकाभाऊ राखे आदर्श पञकारीता पुरस्कार व कै.सा.ऊ.भारजकर शोध पञकारीता पुरस्कार प्राप्त झाले आहेत. जोशी यांनी शांतीवन, आर्वी (ता.शिरूर कासार) येथे आयोजित दोन दिवसीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद ही भूषविले आहे. तसेच गतवर्षी अक्षरयात्री प्रतिष्ठान, विटा (भारत) आणि भारतीय राजदूतावास काठमांडू (नेपाळ) यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनानिमित्त आयोजित नेपाळ – भारत बहुभाषिक कवि संमेलनात निमंत्रित कवी म्हणून पाचारण करण्यात आले आहे. कवि संमेलनाकरिता निमंत्रण मिळाल्याबद्दल कविवर्य जोशी यांचे साहित्य वर्तुळ, मिञ परीवार, साहित्य, शिक्षण, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांकडून स्वागत व अभिनंदन करण्यात येत आहे.