शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा…शिवसंग्राम
केज शिवसंग्रामच्या वतीने तहसीलदारांनाा निवेदन

“अस्मानी आणि सुलतानी संकटात शेतकरी पिचला,शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची गरज..शिवसंग्राम. “
बीड (प्रतिनिधी) :– मागील काही दिवसा पासून जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या काढणीस आलेल्या पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे केज तालुक्यातील नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांचे उभं पीक वाहून गेले या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ओला दुष्काळ जाहीर करून तात्काळ मदतीची घोषणा करावी, अशी मागणी केज शिवसंग्रामच्या वतीने बुधवारी तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
बीड जिल्हयामध्ये मागील कांही दिवसापासून परतीच्या पावसाने धुमाकुळ घातला असून या अतिवृष्टीमुळे केज तालुक्यातील अनेक गावांमधील शेतकरी बाधित झाले आहेत. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन व कपाशी पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. या अस्मानी संकटामुळे शेतकरी वर्ग अतिशय हवालदिल झालेल असून खरीप हंगामाच्या सुरुवातीपासूनच आलेल्या विविध आपत्तीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित क्षेत्रांचे त्वरीत पंचनामे करुन त्या अनुषंगाने ओला दुष्काळ जाहीर करणे गरजेचे आहे.
आर्थिक व मानसिकदृष्ट्या पिचलेल्या शेतकऱ्यांना तांतडीने आर्थिक मदत जाहीर करण्यात यावी, तसेच शेतकऱ्यांना उभारी देण्यासाठी केंद्र सरकारने राबवलेल्या पी.एम किसान सन्मान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करणारी योजनेची तात्काळ अंमलबजावणी करावी. अशी मागणी केज शिवसंग्रामच्या वतीने निवेदनाद्वारे स्थानिक प्रशासनामार्फत मा. मुख्यमंत्री महोदयांना केली आहे. याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष किसनदादा कदम,केज तालुकाध्यक्ष नामदेव बप्पा गायकवाड युवक तालुका अध्यक्ष अमोल पोपळे, माजी तालुकाध्यक्ष लिंबराज वाघ, शिवसंग्राम नेते डॉ.उत्तम खोडसे,बाळासाहेब गलांडे , प्रवीण चाळक,शिवाजी वाघमारे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ.मनीषाताई कुपकर, महिला आघाडीच्या जिल्हा सरचिटणीस साक्षीताई हांग , श्री.बाळासाहेब चाळक, केज शहराध्यक्ष अशोक कदम, सोशल मीडियाचे दिपक कोल्हे, विशाल नाईकवाडे,डॉ.राहुल शिंदे , श्री.शंभुराजे लांबतुरे,महेश गुजर,सोमनाथ गुजर,श्यामसुंदर धपाटे, सुमंत कदम आदी उपस्थित होते.