सामाजिक व राजकीय जीवनात सरदार पटेल यांनी श्रेष्ठत्वाचा आदर्श निर्माण केला – ज्येष्ठ पत्रकार अरूण करमरकर
दीनदयाळ बँकेची युगपुरूष स्वामी विवेकानंद व्याख्यानमाला

वैभवशाली महाराष्ट्र न्युज
अंबाजोगाई (वार्ताहर)
मागील २६ वर्षांपासून “विश्वास, विकास आणि विनम्रता” या त्रिसुत्रीने आर्थिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या दीनदयाळ नागरी सहकारी बँकेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही १० ते १२ जानेवारी २०२३ या कालावधीत दररोज सायंकाळी साडेसहा या वेळेत युगपुरूष स्वामी विवेकानंद यांच्या १६० व्या जयंतीनिमित्त व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. द्वितीय पुष्प गुंफताना ज्येष्ठ पत्रकार अरूण करमरकर यांनी अंबाजोगाईकरांना अंतर्मुख केले. सरदार पटेल यांच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख मांडून सरदार पटेल यांनी सामाजिक, राजकीय जीवनात उत्तम नेतृत्व कसे असले पाहीजे हे दाखवून देत श्रेष्ठत्वाचा आदर्श निर्माण केला असे गौरवोद्गार ज्येष्ठ पत्रकार अरूण करमरकर यांनी काढले.
दीनदयाळ बँकेतर्फे आयोजित युगपुरूष स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेतील द्वितीय पुष्प व्याख्याते ज्येष्ठ पत्रकार अरूण करमरकर यांनी, “सरदार पटेल, समर्थ नेता” या विषयावर गुंफले. यावेळेस करमरकर यांनी सरदार पटेल यांच्या जीवनकार्याचा परीचय सभागृहाला करून दिला. पटेल यांच्या कार्य कर्तृत्वावर विस्तृत प्रकाश टाकला. पटेल हे जसे उत्तम नेते होते तसेच ते सर्वप्रथम उत्तम अनुयायी देखिल होते, सात्विक शक्तीचे प्रतिक राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना पटेल यांनी आपले गुरू मानले होते. असे सांगून करमरकर यांनी गुरू-शिष्य परंपरेची विविध सर्वोत्तम उदाहरणे देत श्रीराम-हनुमान, श्रीकृष्ण-अर्जुन, रामकृष्ण परमहंस-योध्दा संन्यासी स्वामी विवेकानंद ते राष्ट्रपिता महात्मा गांधी-सरदार पटेल इथपर्यंतचे संदर्भ त्यांनी दिले. पटेलांचे बालपण, शालेय, महाविद्यालयीन शिक्षण, कुटुंब, घरची परिस्थिती, न्यायनिष्ठ वकील ते बॅरिस्टर आणि समर्पित समाजसेवक ते नगरसेवक, नगराध्यक्ष आणि भारताचे कर्तव्यकठोर गृहमंञी इथपर्यंतचा प्रेरणादायी प्रवास उलगडून दाखवला. पटेल यांनी केलेली विविध आंदोलने, वेळोवेळी घेतलेल्या भूमिका, काँग्रेस पक्ष संघटनेवरील हुकूमत व मजबूत पकड, एक बाणेदार, खंबीर व कणखर नेतृत्व, शेतकऱ्यांसाठीची कणव, देशातील 565 संस्थानांच्या विलनीकरणासाठी घेतलेल्या समायोचित भूमिका व डावपेच हे सर्व नव्या पिढीने समजून घ्यावे असे आवाहन करून ज्येष्ठ पत्रकार अरूण करमरकर यांनी महाराष्ट्रात सरदार पटेल यांच्या विषयी असलेल्या अपूर्ण तसेच अयोग्य माहितीमुळे काय गैरसमज आहेत यावर भाष्य केले. यावर्षीच्या व्याख्यानमालेतून अंबाजोगाईकरांना लोहपुरूष सरदार पटेल यांच्या समर्पित, सच्चे पाईक, राष्ट्रभक्तीने ओतप्रोत असलेल्या समर्थ आणि आदर्श व्यक्तिमत्त्वाची ओळख करमरकर यांनी करून दिली. प्रारंभी “सहकार भारती : एक समर्थ सहकारी चळवळ” या विषयावर प्रा.डाॅ.दिपक देशमुख (बीड) यांनी “सहकार भारती”ची स्थापना, उद्देश, कार्य, इतिहास, चिंतन याबाबत नेमक्या शब्दांत माहिती दिली, राष्ट्रीय पुनर्निर्माण, भारताला गतवैभव मिळवून देणे, गोरगरीबांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे हेच सहकार भारतीचे खरे उद्दिष्ट असल्याचे प्रा.डाॅ.देशमुख यांनी नमूद केले. यावेळी व्यासपीठावर बँकेचे अध्यक्ष एॅड.मकरंद पत्की, बँकेचे संचालक प्राचार्य किशन पवार, इंजि.बिपीन क्षिरसागर, मकरंद सोनेसांगवीकर, डॉ.विवेक दंडे, राजाभाऊ दहिवाळ, प्रा.डाॅ.दिपक देशमुख हे मान्यवर उपस्थित होते. तर या प्रसंगी ‘भरतमुनी’ खुले सभागृहात संचालिका सौ.शरयूताई शरदराव हेबाळकर, प्रा.अशोक लोमटे, मुख्यकार्यकारी अधिकारी सनतकुमार बनवसकर आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर, आजी – माजी संचालक, सभासद, ठेवीदार व ग्राहक उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांनी दीपप्रज्ज्वलन करून भारतमाता, राजमाता जिजाऊ माँसाहेब, स्वामी विवेकानंद, पंडीत दीनदयाळजी उपाध्याय आणि लक्ष्मणराव इनामदार यांच्या प्रतिमांचे पुजन करून अभिवादन केले. दीनदयाळ बँकेच्या वतीने “सहकार भारती” स्थापना दिवस साजरा करण्यात आला. त्यानंतर कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचालन संचालक प्राचार्य किशन पवार यांनी केले, तर करून बँकेचे संचालक डॉ.विवेक दंडे यांनी समर्पक शब्दांत प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. जयेंद्र कुलकर्णी यांनी वैयक्तिक पद्य सादर केले. तर उपस्थितांचे आभार बँकेचे संचालक राजाभाऊ दहिवाळ यांनी मानले. या प्रसंगी बँकेच्या वतीने महिलांकरीता विशेष आकर्षक ठेव पर्वकाळ मकरसंक्रांत ते रथसप्तमी या कालावधीत “मकरसंक्रमण ठेव योजना जाहीर करण्यात आली. याचा लाभ घेण्याचे आवाहन दीनदयाळ नागरी सहकारी बँकेच्या वतीने करण्यात येत आहे. यावेळेस बँकेचे सभासद, ग्राहक, ठेवीदार, हितचिंतक व विविध क्षेञातील मान्यवर, बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी दीनदयाळ बँकेचे सर्व अधिकारी, कर्मचारीवृंद यांनी परीश्रम घेतले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
▫️▫️▫️