अखिल भारतीय मराठा महासंघाच्या बीड जिल्हाध्यक्षपदी राणा चव्हाण यांची निवड
चव्हाण यांच्या निवडीचे सर्वस्तरांतून स्वागत

वैभवशाली महाराष्ट्र न्युज
================
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
येथील सामाजिक कार्यकर्ते राणा चव्हाण यांची अखिल भारतीय मराठा महासंघाच्या बीड (पूर्व) जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. नियुक्तीचे पत्र त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्रजी कोंढरे यांनी नुकतेच बीड येथे दिले आहे. राणा चव्हाण यांच्या निवडीचे सर्वस्तरांतून स्वागत व अभिनंदन होत आहे.
शनिवार, दिनांक 7 जानेवारी 2023 रोजी बीड येथे अखिल भारतीय मराठा महासंघाचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर आणि कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळेस अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्रजी कोंढरे, विभागीय अध्यक्ष गोपाळराव चव्हाण यांच्या हस्ते राणा दगडू चव्हाण यांना अखिल भारतीय मराठा महासंघ,बीड पूर्वचे जिल्हाध्यक्षपदी निवड करून नियुक्तीचे पत्र देण्यात आले. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष विनोद आप्पा इंगोले, विभागीय उपाध्यक्ष नारायणराव थोरात, युवक जिल्हाध्यक्ष किशोर गिराम पाटील, उत्तर विभागाचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब साळुंके, महिला बीड जिल्हाध्यक्षा सैरंध्रा डोईफोडे, उस्मानाबाद महिला जिल्हाध्यक्षा रेखाताई लोमटे व धारूर तालुकाध्यक्ष अमरदीप सोळंके आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते. राणा दगडू चव्हाण हे यापूर्वी मराठा महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. तसेच ते राजीव गांधी पंचायतीराज संघटनचे विभागीय अध्यक्ष होते, संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीचे सदस्य ही राहीले आहेत, तसेच राणा चव्हाण हे आमदार सौ.नमिताताई मुंदडा, भाजपाचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा आणि युवा नेते अक्षय मुंदडा यांचे खंदे समर्थक व कार्यकर्ते म्हणून सर्वत्र ओळखले जात आहेत. मराठा महासंघाच्या माध्यमातून त्यांनी अंबाजोगाईत काम सुरू केले. राजीव गांधी पंचायतीराज संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष झाले व 4 सप्टेंबर 2019 पासून चव्हाण यांनी औरंगाबाद विभागाचे अध्यक्ष म्हणून उत्तम कार्य केले आहे. सामाजिक क्षेत्रांत विविध पदांवर कार्य करण्यासाठी आपणांस ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांचे सतत मार्गदर्शन व प्रेरणा मिळत असल्याची प्रतिक्रिया राणा चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केली. संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या माध्यमातून अंबाजोगाई शहर आणि तालुक्यातील गोरगरीब व गरजूंना शासनाची मदत व सहकार्य मिळवून देण्यासाठी चव्हाण यांनी सातत्यपूर्ण प्रयत्न केले आहेत. मराठा महासंघ तसेच अंबाजोगाईत मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून मराठा समाजाच्या प्रश्नासंदर्भात सातत्याने रस्त्यावर उतरून समाजाच्या न्याय हक्कांसाठीचा लढा ते मागील अनेक वर्षांपासून लढत आहेत. मराठा महासंघाचे अंबाजोगाई तालुकाध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष म्हणून मागील सहा ते आठ वर्षांपासून ते काम पाहत आहेत. मराठा समाजाच्या प्रत्येक प्रश्नासंदर्भात पोटतिडकीने कायम रस्त्यावर येऊन आंदोलनात सहभाग घेणा-या राणा चव्हाण यांच्या सर्वंकष कार्याची दखल घेत त्यांची मराठा महासंघाच्या बीड (पूर्व) जिल्हाध्यक्षपदी मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी निवड केली. निवडीबद्दल आभार मानून यापुढे अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्रजी कोंढरे, विभागीय अध्यक्ष गोपाळराव चव्हाण यांच्या नेतृत्वात बीड जिल्ह्यातील सर्व ज्येष्ठ व युवा पदाधिकाऱ्यांना सोबत घेवून अखिल भारतीय मराठा महासंघाच्या माध्यमातून प्रभावीपणे कार्य करणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष राणा चव्हाण यांनी सांगितले.