सकारात्मक संदेश देणाऱ्या बातम्यांची समाजाला गरज – उपजिल्हाधिकारी शरद झाडके
सह्याद्री मराठी पत्रकार संघाच्या वतीने दर्पण दिन साजरा ; दिनदर्शिकेचे प्रकाशन_

समृद्ध महाराष्ट्राच्या..सर्वांगिण बातम्यांसाठी…
वैभवशाली महाराष्ट्र न्यूज विशेष
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त शनिवार, दिनांक 6 जानेवारी रोजी पत्रकार दिन साजरा करण्यात आला. यानिमित्ताने सह्याद्री मराठी पत्रकार संघाच्या दिनदर्शिका – २०२४ चे प्रकाशन उपजिल्हाधिकारी शरद झाडके यांच्या हस्ते करण्यात आले.
दि.6 जानेवारी हा दिवस दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रमांनी पत्रकार दिन म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येतो. पत्रकारांची लेखणी समजाहितासाठी तळपली पाहिजे व गरजवंताला न्याय मिळाला पाहिजे या विधायक भुमिकेत वास्तवाचे दर्शन पत्रकार आपल्या लेखनीतून करीत असतात. याच विचारांची देवाणघेवाण व पत्रकारांना आपल्या नैतिक कामातून जनमाणसांत लोकप्रियता मिळवून देण्यासाठी व सांघिक भावना टिकून राहण्यासाठी दरवर्षी पत्रकार दिनाचे आयोजन होत असते. याच धर्तीवर यशस्विपणे महाराष्ट्रात स्थापन झालेल्या सह्याद्री मराठी पत्रकार संघ (महाराष्ट्र राज्य) यांच्या वतीने नविन वर्षाच्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा अंबाजोगाई येथील “अंबारी” शासकीय विश्रामगृह या ठिकाणी अंबाजोगाईचे उपजिल्हाधिकारी शरद झाडके यांच्या शुभहस्ते करण्यात आले. प्रारंभी प्रकाशन सोहळ्यानिमित्त उपस्थित सह्याद्री मराठी पत्रकार संघाच्या सर्व सदस्यांना पत्रकार दिनाच्या उपजिल्हाधिकारी झाडके यांनी शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, दिनदर्शिका अतिशय उत्कृष्ट दर्जाची तयार केली आहे. यामुळे येणाऱ्या काळात आपल्या कार्याला निश्चितत भविष्य असणार आहे. पत्रकारांनी दर्जेदार बातम्या प्रसिद्ध करून चांगली विचारधारा जपली पाहिजे, कोणत्याही गोष्टीचे अवास्तव उदात्तीकरण न करता वस्तुनिष्ठ, योग्य, सकारात्मक व चांगल्या विषयांना पटलावर आणले पाहिजे. जेणेकरून समाजमनावर याचा विपरीत परिणाम होणार नाही, नव्या पिढीकडून चांगली विचारधारा जपली जाईल. सकारात्मक संदेश देणाऱ्या बातम्यांची समाजाला गरज अशी अपेक्षा उपजिल्हाधिकारी झाडके यांनी प्रकाशन सोहळ्या प्रसंगी व्यक्त केली. यावेळी सह्याद्री मराठी पत्रकार संघाचे नवनिर्वाचित महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष डॉ.जावेद शेख, महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष शहाजी भोसले, अंबाजोगाई तालुकाध्यक्ष प्रा.दत्तात्रय जाधव, सचिव गोविंद लांडगे यांना पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा ही दिल्या. यावेळी पत्रकार संघाचे पदाधिकारी गोविंद शिनगारे, काशिनाथ कातमांडे, अनिल ठोंबरे, महादेव दौंड, मनोराम पवार, दत्तात्रय भाकरे, डॉ.लतिफ शेख, शिवाजी औसेकर, बळीराम लोकरे, गोविंद लांडगे यांच्यासह इतरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोविंद शिनगारे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा.दत्तात्रय जाधव यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सह्याद्री मराठी पत्रकार संघाच्या वतीने पुढाकार घेण्यात आला.