माजी मुख्याध्यापिका श्रीमती विजयाताई क्षीरसागर यांची ग्रंथतुला ; पुस्तक प्रकाशन सोहळा
लेकीनं आईसाठी पुढाकार घेणं कौतुकास्पद - लेखिका विजया मारोतकर

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज डिजिटल मिडिया
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
येथील जिल्हा परिषद शाळेच्या निवृत्त मुख्याध्यापिका श्रीमती विजयाताई सुधाकर क्षीरसागर यांच्या तीन लेकीनं प्रकाशित केलेल्या कविता संग्रहाच्या माध्यमातून समर्पित भाव ज्याला नात्याच्या रेशमी धाग्याने गुंफताना मातृत्वाची ग्रंथ तुला करून समाजात आदर्श प्रस्थापित केला. ते खर्या अर्थाने कौतुकास्पद म्हणावे लागेल. मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाल्याने तिच्याकडे बघण्याचा वेगळा आयाम तयार झाल. कविता ताजी असेल तरच वाचकांना आवडते. त्या दृष्टीने कवी मनाने विचार करायला हवा. कवितेच्या रचनेतून सामाजिक मन आणि जबाबदारीची जाणिव करून देता येते असे प्रतिपादन नागपूर येथील प्रसिद्ध लेखिका विजया मारोतकर यांनी केले.
सौ.अपर्णा कुलकर्णी, आश्विनी निवर्गी आणि प्रा.डॉ.सीमा पांडे या भगिनींनी स्वयंरचित केलेल्या कविता संग्रहाच्या पुस्तकाचे प्रकाशन सौभाग्य मंगल कार्यालयात नुकतेच संपन्न झाले. विशेष म्हणजे त्याच ग्रंथ पुस्तिकांनी त्यांच्या आईची ग्रंथ तुला करण्यात आली. व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.सुरेश खुरसाळे, जेष्ठ साहित्यिक माजी प्राचार्य वेदकुमार वेदालंकार, सुनिता देशमुख यांच्यासह अनेकांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक करताना प्रा.सीमा पांडे यांनी या उपक्रमामागची पुर्वपिठीका सांगून मातृसंस्थेविषयी असलेले दायित्व लेकी म्हणून तो जोपासण्याचा आम्ही छोटासा प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले. याच कार्यक्रमात अश्विनी निवर्गी लिखित ‘वनोद्वारी’, ‘सेवाव्रती मेजर’ या पुस्तकाचे ही प्रकाशन करून प्रा.एस.पी.कुलकर्णी यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. ८५ वर्षांच्या विजयाताई क्षीरसागर यांना त्यांच्या लेकीनं केलेल्या कौतुकाचा आनंदाने स्विकार करताना डोळ्यांतले आश्रु रोखता आले नाहीत. याचि देहि, याचि डोळा लेकरं, लेकी लेखक झाल्या, त्यांनीच संपादित ग्रंथ संपदा ज्या तराजूत मला तोलल्या गेलं यापेक्षा आयुष्यातला आनंद दुसरा असु शकत नाही. पण, याप्रसंगी स्व.प्रा.सुधाकरराव (पती) नसल्याची खंत त्यांना जाणवली. सौ.अपर्णा कुलकर्णी यांनी तर नात्याचे रेशमी बंध यावर आधारित स्वत:च्या जीवनात माहेरी आणि सासरी आलेल्या प्रत्येक नातेवाईकांच्या भुमिकेचं कवितेच्या माध्यमातून रेखाटन केलं. ज्याचं नांव नात्याचे रेशमी बंध असं दिलं. अर्थात मातृ संस्थेची आदर्श महती सांगणारी कविता संग्रह इथे प्रकाशित झाल्याने उपस्थितांनी कौतुक केले. प्रा.गणेश पिंगळे, अश्विनी निवर्गी यांनी मनोगत व्यक्त केले. तर सुनिता देशमुख यांनी आईचे महत्व जीवनात किती आहे हे पटवून दिले. ज्ञानेश्वरी ग्रंथाचा हिंदीतून अनुवाद करणारे वेदालंकार ज्यांचं वय ९४ वर्षे आहे त्यांच्याही साहित्याचा सन्मान कुटुंबियांच्या वतीने करण्यात आला. अध्यक्षीय समारोप करताना डॉ.खुरसाळे यांनी या सर्व कुटुंबियांचं कौतुक करून आईच्या ऋणानुबंधाप्रती लेखणीच्या माध्यमातुन सामाजिक बांधिलकी जोपासत नविन आदर्श प्रस्थापित केल्याबद्दल उपक्रमाचेही कौतुक केले. या सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणावर महिलांची तथा विविध क्षेत्रातील मान्यवरांचीही उपस्थिती होती. वर्तमान समाजव्यवस्थेत जन्मदात्याकडून आई – वडिलांची परवड होते. एव्हाना जबाबदारी आणि कर्तव्याची जाणिव जन्म दिलेल्या लेकरांनाही नसते असे अनेक उदाहरणं समोर येत असताना लेकी जेव्हा आईचा स्वलिखित ग्रंथ संपदेने सन्मान करतात यापेक्षा आनंद दुसरा कोणताच नाही हे तितकंच खरं. या अनोख्या सोहळ्याचं शहरात सर्वत्र कौतुक होत आहे.