आपला जिल्हामहाराष्ट्रवैभवशाली महाराष्ट्र न्युजसामाजिक

तीन दिवसीय यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाचे आज उद्घाटन

डॉ. ऋषिकेश कांबळे यांच्या हस्ते उद्घाटन तर समारोप रवींद्र शोभणे यांच्या उपस्थित होणार

सांस्कृतिक / सामाजिक  महाराष्ट्र विशेष

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज/ प्रतिनिधी

अंबाजोगाईः यशवंतराव चव्हाण स्मृती समितीच्या वतीने दरवर्षी आयोजित केल्या जाणार्‍या यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाचे आज शनिवार, दि.२५ नोव्हेंबर २०२३ रोजी सायंकाळी ५ .३० वा. या समारोहाचे उद्घाटन छत्रपती संभाजीनगर येथील ज्येष्ठ साहित्यिक, तत्वज्ञ व उदगीर येथे संपन्न झालेल्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. ऋषिकेश कांबळे यांच्या हस्ते होणार आहे.
महिला महाविद्यालयाच्या प्रांगणात सायंकाळी ५.३० वाजता संपन्न होईल. आज
रात्रौ ८.३० वा. कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून अध्यक्षस्थानी नागपुर येथील ज्येष्ठ कवी, गझलकार बबन सराडकर – नागपूर हे राहणार असून, कवी संमेलनाचे सूत्रसंचालन अहमदपूर येथील सुप्रसिद्ध कवी राजेसाहेब कदम हे करणार आहेत. तर सुप्रसिध्द कवी सर्वश्री शिवाजी
सातपुते – मंगळवेढा, सोभा रोकडे – अमरावती, डॉ. सप्नील चौधरी – पुणे (सोयगाव), विनय पाटील – जळगाव, शैलजा कारंडे – लातूर व लतिफ शेख, सारोळा – लातूर यांचा सहभाग राहणार आहे.

यावर्षी ३९ वे वर्ष असून तीन दिवसीय कार्यक्रमात उद्घाटन समारंभ, कवी संमेलन, बाल आनंद मेळावा, “भावरंग” हा सुगम संगीताचा भावगीत, भक्तीगीत, नाट्यसंगीत कार्यक्रमा बरोबर शास्त्रीय संगीत गायन, समारोप समारंभ व याचं कार्यक्रमात मराठवाड्यातील विशेष कार्य केलेल्यांना पुरस्कार वितरण, असा कार्यक्रम संपन्न होणार आहे. अशी माहिती समितीचे सचिव दगडू लोमटे यांनी दिली.
*भावरंग” संगीत मैफिल*
रवीवार, दि.२६ नोव्हेंबर २०२३ रोजी सायं. ८.०० वा. सुगम संगीत मैफिलीचा आयोजन केले आहे. पुणे येथील सुप्रसिद्ध युवा गायक नागेश आडगाकर यांची निर्मिती असलेला ‘भावरंग” हा भावगीत, भक्तिगीत, गझल, नाट्यगीत आसलेला संगीतमय कार्यक्रम सादर होईल. त्यात त्यांना गायिका भाग्यश्री देशपांडे गायन साथ करतील तर स्वानंद कुलकर्णी – संवादिनी, सागर पटोकार – तबला, आसाराम साबळे – पखवाज व अनुप कुलथे व्हायोलिनवर साथसंगत करतील.
*शेतकरी परिषदेत सोयाबीनवर विशेष चर्चा*
२७ नोव्हेबर सोमवार रोजी सकाळी १०.३० वा. शेतकरी परिषदेचे आयोजन केले असून वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी येथील सोयाबीन पैदासकार तथा सहयोगी संचालक बियाणे डॉ. शिवाजीराव म्हेत्रे हे “सोयाबीन – सुधारित बीज (वाण), लागवड तंत्रज्ञान आणि बाजारपेठ” या विषयावर मार्गदर्शन करतील. शेती शेतीजोडधंदा याबाबत स्वत: प्रयोग केलेले प्रगतशील शेतकरी व या वर्षाचा यशवंतराव चव्हाण स्मृती कृषी पुरस्कार प्राप्त असे नारायणराव गोरे, कळमनुरी हे अध्यक्षस्थानी असतील. ते स्वनुभव कथन करून मार्गदर्शन करतील.

*समारोप समारंभ व पुरस्कार वितरण*

याच दिवशी सायंकाळी ५.३० वाजता समारोप समारंभ होत असून सुप्रसिद्ध लेखक, तथा अमळनेर येथे नियोजित ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्ष रवींद्र शोभणे यांच्या अध्यक्षतेखाली समारोप समारंभ संपन्न होणार आहे. या समारंभात मराठवाड्यातील कृषी, साहित्य, संगीत व युवा (धावपटू ) या क्षेत्रातील चार गुणवंतांचा यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने सन्मान करण्यात येणार असून त्यात कळमनुरी येथील प्रयोगशील शेतकरी व शेती उद्योजक नारायणराव गोरे यांना कृषी, अहमदपूर येथील ज्येष्ठ लेखिका प्रा.ललिता गादगे यांना साहित्य, छत्रपती संभाजीनगर येथील पं. विजय देशमुख यांना संगीत तर आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक सुवर्ण पदके प्राप्त केलेला सुप्रसिद्ध धावपटू युवकांचे प्रेरणा असणारा आष्टी येथील युवा अविनाश साबळे याला युवागौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे स्वरुप स्मृतीचिन्ह,रोख पाच हजार रूपये,शाल, पुष्पगुच्छ असे आहे.

*’पखवाज वादक’ व शास्त्रीय गायन’*

रात्रौ ठिक ८.०० वा. शास्त्रीय संगीताच्या मैफिलीत माजलगाव येथील हल्ली पुण्यात वास्तव्याला असलेला व नैनीताल येथे शिक्षण घेतलेला प्रतिभावान पखवाज वादक मनोज सोळंके यांचे पखवाज वादन होईल. त्याला यश खडके यांची संवादिनीवर साथ होईल. त्यानंतर जमशेदपूर येथील सुप्रसिध्द शास्त्रीय गायिका रोंकिनी गुप्ता यांचे गायन होईल. त्यांना संवादिनीवर तन्मय मेस्त्री हे तर आशिष रगवाणी तबला साथ करतील. हे सर्व कार्यक्रम वेणूताई चव्हाण महिला महाविद्यालयात संपन्न होणार आहेत अशी माहिती समितीचे सचिव दगडू लोमटे यांनी दिली आहे.
वरील सर्व कार्यक्रमांना रसिक श्रोत्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.