मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ घ्या – भीमसेन लोमटे यांचे आवाहन
वैभवशाली महाराष्ट्र न्यूज विशेष

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी शुक्रवार, दिनांक २८ जुन रोजी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेची घोषणा केली. या योजनेअंतर्गत महिलांना १५००/ रूपये महीना सुरू करण्यात येईल. त्यामुळे अंबाजोगाई शहरासह प्रभाग क्रमांक ४ मधील महिला, भगिनी यांनी सदरील योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन युवा कार्यकर्ते भीमसेन आप्पा लोमटे यांनी केले आहे.
याबाबत आवाहन करताना भीमसेन आप्पा लोमटे यांनी सांगितले आहे की, राज्य सरकारने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना घोषित केलेली आहे. या योजनेअंतर्गत महिलांच्या बॅंक खात्यामध्ये थेट १५००/ रूपये जमा होणार आहेत. ही योजना याच महिन्यात चालू होणार आहे. सदर योजना महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत राबविली जात आहे. याच्या अटी व शर्थी पुढीलप्रमाणे आहेत. सरकारने या योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत वाढविली आहे. ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करणाऱ्या महिलांना १ जुलैपासून लाभ देण्यात येईल. योजनेसाठी शेती धारणा अट वगळण्यात आली आहे. लाभार्थी महिलांचा वयोगट २१ ते ६५ वर्षे करण्यात आला आहे. परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरूषाबरोबर विवाह केला असेल तर त्यांच्या पतीचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य असेल. अडीच लाख रूपये उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशनकार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येईल. कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. २१ ते ६५ वर्षे वयोगटातील विवाहित, परित्यक्ता, विधवा, महिला असावी, बँकेमध्ये सदर महिलेच्या नांवे खाते असावे, रेशनकार्ड मध्ये सदर महिलेचे नांव अंतर्भूत असावे. सदरील योजनेअंतर्गत नोंदणी करीत असताना उत्पन्नाचा दाखला सन २०२५ पर्यंत वैध असणारा असावा, रेशनकार्ड, आधारकार्डची झेरॉक्स, लाभार्थी नांवाने बॅंक पासबुक झेरॉक्स ही सर्व माहिती महिलांनी किंवा त्यांच्या कुटुंबियांनी नोंदणी अर्जात भरावयाची आहे. सदर योजनेसाठी पात्र असणाऱ्या २१ ते ६५ वयोगटातील महिलांनी आवश्यक कागदपत्रांसह सेतू केंद्रातून सदर योजनेकरीता अर्ज दाखल करावयाचा आहे. आधारकार्डला आपला मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे. तरी अंबाजोगाई शहरातील सर्व महिला, भगिनी यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन भीमसेन आप्पा लोमटे यांनी केले आहे.
*प्रभाग क्रमांक चार मध्ये विशेष मोहीम राबविणार :*
अंबाजोगाई शहरातील प्रभाग क्रमांक चार परळीवेस येथे सर्व महिलांना लाभ मिळवून देण्यासाठी विशेष मोहीम राबविणार आहोत. याअंतर्गत महिलांचे ऑनलाईन अर्ज दाखल करून देणे, या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे काढून दिली जातील, महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राबविण्यात येत असलेल्या या योजनेअंतर्गत अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली आहे. योजनेची आणि कागदपत्रांची अपुरी माहिती, कागदपत्रांची जुळवाजुळव अर्ज भरताना येणाऱ्या अडचणी तलाठी, सेतू, तसेच झेरॉक्स दुकानावर महिलांची गर्दी होत आहे. सदर योजनेसाठी लागणारी कागदपत्रे कुठे आणि कोणत्या तारखेपर्यंत द्यावयाचे हे माहित नसल्यामुळे त्यांची धावपळ होत आहे. याचा फायदा घेत महिलांची आर्थिक लूट होण्याची शक्यता ही नाकारता येत नाही. असे होवू नये म्हणून आम्ही महिलांसाठी मदत कक्ष स्थापन करीत आहोत. यात महिलांना ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करून देण्यासाठी आवश्यक ती मदत करण्यात येईल.
भीमसेन लोमटे अंबाजोगाई
(सामाजिक कार्यकर्ते)