आपला जिल्हावैभवशाली महाराष्ट्र न्युज

प्राचार्य जे . एम . पैठणे एक प्रेरणास्त्रोत

विशेष लेख

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज / विशेष व्यक्तीमत्व

मधुर आवाज, गोड गळा ,सुंदर व देखने रूप इत्यादी मानवाला मिळालेल्या निसर्ग दत्त देणग्या आहेत. या सर्व देणग्या ज्यांच्याकडे आहेत त्यांना आपण भाग्यवान समजतो परंतु काही देणग्या / गुण या आपण प्रयत्नपूर्वक आणि स्व कष्टाने मिळू शकतो वाचन ,लेखन, मनन आणि चिंतन व जबरदस्त इच्छाशक्तीच्या जोरावर ज्यांनी आपल्या अंगी वक्तृत्वाचा गुण विकसित केला आणि आपल्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटविणारे व्यक्तिमत्व म्हणजे ग्रामीण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नेकनूर येथील प्राचार्य जालिंदर मसुराम पैठणे हे होय . ते प्राचार्य जे. एम. पैठणे या नावाने ते सुपरीचीत आहेत . नियत वयोमानानुसार 30 जून 2024 रोजी प्राचार्य पैठणे जे.एम . सेवानिवृत्त होत आहेत . त्यांचा सहकारी शिक्षक या नात्याने मी त्यांच्या कार्याचा अल्पसा आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे .

पैठणे सरांचा जन्म 7 जून 1966 रोजी बीड तालुक्यातील लिंबारुई (देवी) सारख्या खेडेगावात झाला . प्राथमिक शिक्षणासाठी त्यांना जवळच असलेल्या ताडसोन्ना या गावी पायी जावे लागे . पुढे ते माध्यमिक शिक्षणासाठी बीड येथे आले .माध्यमिक शिक्षण ते पदवीपर्यंतचे शिक्षण बीड शहरातच झाले .विद्यार्थी शेपासूनच त्यांना वाचन लेखन आणि भाषणाची आवड होती बी .एस .सी .पर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लगेचच सरांनी ग्रामीण माध्यमिक कन्या शाळा नेकनूर येथे 1987 साली आपल्या सेवेस प्रारंभ केला . सरांची काम करण्याची हातोटी आणि विद्यार्थ्यांविषयी असणारी आंतरिक तळमळ ओळखून संस्थेचे सचिव ॲड जगदीशरावजी शिंदे (भाऊ ) यांनी त्यांची मुख्याध्यापक पदी नेमणूक केली पुढे सरांनी सेवांतर्गत बी.एड . करून मुख्याध्यापक पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता प्राप्त केली .

प्रारंभी शाळेत विद्यार्थी संख्या मर्यादित असल्यामुळे पैठणे सरांचे प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष असे. 1988 साली सरांनी शाळेमध्ये साने गुरुजी कथा कथनमाला सुरू केली या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना अवांतर पुस्तक वाचनाची गोडी लागली आणि विद्यार्थ्यांमध्ये व्यासपीठावर येऊन बोलण्याचे धाडस निर्माण झाले. आज छत्तीस वर्षापासून सुरू असलेल्या साने गुरुजी कथाकथन मालेचे वटवृक्षात रूपांतर झालेले आहे कारण शाळेतील माजी विद्यार्थी जेव्हा भेटतात तेव्हा ते अभिमानाने सांगतात सर आपण शाळेत सुरू केलेल्या कथाकथन मालेमुळे कुठल्याही व्यासपीठावर आम्ही आमचे मनोगत बिनधास्त आणि आत्मविश्वासाने मांडू शकतो शाळेत कथाकथन माला सुरू करण्याचा पैठणे सरांचा दुसरा हेतू तरी काय होता ? माझ्या शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये वक्तृत्वाचा गुण विकसित झाला पाहिजे त्या निमित्ताने त्यांचे वाचन चिंतन आणि लेखन झाले पाहिजे साने गुरुजी म्हणतात ना ‘करील मनोरंजन जो मुलांचे जडील नाते प्रभुशी तयाचे ‘ हे ब्रीद लक्षात घेऊन पैठणे सरांनी शाळेत आपले कार्य चालू ठेवले पैठणे सरांच्या प्रत्येक आठवड्याला कथा सांगण्याच्या सवयीमुळे त्यांच्याकडे अगदी भरमसाठ कथांचा संग्रह आहे याला कारण सरांना असणारी वाचनाची आवड ही सुद्धा आहे .

मुख्याध्यापक म्हणून शाळेत काम करत असताना आपण अधिकारी पदावर काम करत आहोत म्हणून शिकणे काही थांबत नसते हे तत्त्व त्यांनी ध्यानी धरून एम ए मराठी केले खरंतर मुख्याध्यापक पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता प्राप्त केल्यानंतर ही ते स्वास्थ बसले नाहीत 1993 -95 मध्ये त्यांनी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे एम .एड . शिक्षण क्षेत्रातील अतिशय महत्त्वाची असणारी पदव्युत्तर पदवी संपादन केली आणि आपली शैक्षणिक गुणवत्ता सतत वाढवत ठेवली आणि 1988 ते 2000 सालापर्यंत बही :शाल व्याख्यानमालेच्या कार्यवाह म्हणून पैठणे सरांनी केलेले कार्य खरोखरच गौरवस्पद आहे . भविष्यात व्याख्यानमालेच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नामवंत व्याख्याते शाळेत बोलावून त्यांच्या विचारांची महती गंगा विद्यार्थ्यांपर्यंत पोचली एवढेच नाही तर बहिशाल व्याख्यानमालेच्या माध्यमातून विद्यापीठांकडून विद्यार्थ्यांना वाचनीय असणारी असंख्य पुस्तके शाळेच्या वाचनालयाला उपलब्ध करून घेतली तसेच बहिःशाल व्याख्यानमाले अंतर्गत शाळेत महिला शिबिर आणि बालिका शिबिर सारखे विविध कार्यक्रम घेऊन आपल्या कार्याचा प्रभावी ठसा पैठणे सरांनी विद्यापीठातही उमटविला

1995 साली माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या आदेशानुसार साक्षरतेचे महत्व ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्यासाठी आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला त्याचवेळी पैठणे सरांनी स्वतः कल्पकतेतून विद्यार्थ्यांच्या कलाजत्ता तयार करून ग्रामीण भागातील खेड्यापाड्यातील साक्षरतेचे महत्व सांस्कृतिककार्यक्रमातून लोकांना पटवून दिले गेले कला जत्ताच्या प्रत्येक कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक या नात्याने पैठणे सर जातीने हजर राहत असत .याच वर्षी सरांच्या मार्गदर्शनाखाली रात्रीचे साक्षरतेचे वर्ग देखील चालत होते या वर्गातून साक्षर झालेले निरक्षर आजही स्वाभिमानाने साक्षर म्हणून मिरवत आहेत.

पैठणे सरांच्या घराशेजारी शाळा आणि शाळे शेजारी घर असल्यामुळे सर शाळेत बसले काय किंवा घरी बसले काय यात त्यांना कधीच फरक जाणवत नसे त्याचा परिणाम म्हणून सरांनी शाळेत रात्रीची अभ्यासिका सुरू केली . रात्र अभ्यासिकेसाठी प्रत्येक आठवड्याला एका शिक्षकाची निरीक्षक म्हणून जबादारी दिली जाई .त्यावेळी फक्त मुलींची शाळा होती तरी रात्रभ्यासिकेला मुलींनी प्रचंड प्रतिसाद दिला शिक्षकांबरोबरच मुख्याध्यापक स्वतः अभ्यासिकेत थांबून विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवत असत . रात्र अभ्यासिकेबरोबरच सरांनी शाळेत रविवार अभ्यासक्रही सुरू केली . रविवार अभ्यासिके साठी सुद्धा सर्व शिक्षकांना रविवार वाटून दिले जात होते . आपल्या वाटयाला आलेल्य रविवारी सर्व शिक्षक निरीक्षक म्हणून आपले काम चोख बजावत होते .हे सर्व खटाटोप करण्याचा पैठणे सरांचा प्रांजळ आणि स्वच्छ हेतू हा आहे की विद्यार्थ्यांनी आपला अधिकाधिक वेळ अभ्या साठी दिला पाहिजे एखाद्या विद्यार्थ्या अभ्यासापासून दुरावला जातो आहे हे आजही त्यांच्या निदर्शनास आले तर त्यांना प्रचंड संताप होतो. याचा परिणाम म्हणून आजही शाळेतील शेकडो विद्यार्थी शिक्षक , प्राध्यापक, डॉक्टर, आय. ए . एस. , आय. ई. एस. आणि स्वतःचे छोटे मोठे उद्योग करून चांगल्या पदापर्यंत पोहोचले आहेत

पैठणे सरांना आजही अनेक कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून किंवा व्याख्याते म्हणून बोलावले जाते एखाद्या कार्यक्रमाची तयारी असो, व्याख्यानाची तयारी कि वर्ग अध्यापनाची तयारी असो किंवा शिक्षक मासिक बैठकीची तयारी असो जय्यद तयारी निशी पुढे जायचे हा सरांचा शिरस्ता . टेबलावर पडलेला लिफाफा फाडून त्याच्या पाठीमागे असलेल्या कोऱ्या भागावर लिहून व्याख्यानाचे मुद्दे संदर्भ किंवा वर्ग अध्यापनाचे महत्त्वाचे मुद्दे लिहिताना मी सरांना खूप वेळा पाहिले आहे.

शाळा महाविद्यालयांमध्ये प्राचार्य तथा मुख्याध्यापक म्हणून काम करताना सरांनी वेगवेगळी पदे भूषवली आहेत प्रत्येक पदावर काम करत असताना सरांनी आपल्या वक्तृत्वाच्या जोरावर संघटन कौशल्यामुळे आपला एक वेगळा ठसा उमटवला नाही तर नवलच .2001 ते 2014 पर्यंत बीड जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव म्हणून त्यांनी काम पाहिले. 2015 ते आज तागायत बीड जिल्हा मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष म्हणून ते कार्य करत आहेत. सन 2022 मध्ये मराठवाडा मुख्याध्यापक संघाच्या सरचिटणीस पदी त्यांची निवड झाली. त्यापूर्वी त्यांनी सह कोषाअध्यक्षाची ही जबाबदारी पार पाडली. 2016 साली राष्ट्रीय सुरक्षा दल बीड जिल्हा कार्यवाह पदी निवड झाली होती. याशिवाय मराठवाडा साहित्य परिषदेत जिल्हा शाखा बीडचे कार्यवाह म्हणून तर सत्यशोधक पहिले राज्यस्तरीय साहित्य संमेलन बीडचे सहकार्य वाह म्हणून ही सरांनी आपले जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडलेली आहे .

वरील सर्व कार्याचा आढावा पाहता सरांना अनेक प्रकारचे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे त्यामध्ये 2001 मध्ये शक्ति प्रतिष्ठान, बीडचा आदर्श शिक्षक पुरस्कार महाराष्ट्र , सायन्स फाउंडेशन अहमदनगरचा उपक्रमशील मुख्याध्यापक तथाआदर्श शिक्षक पुरस्कार , त्यानंतर अतिशय महत्त्वाचा आणि शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा लावणारा पुरस्कार म्हणजे पाच सप्टेंबर 2014 चा महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक राज्य पुरस्कार हा होय. त्यानंतर 19 मार्च 2014 ला नेकनूर पत्रकार संघाच्या वतीने नेकनूर गौरव पुरस्कार देऊन सरांचा सन्मान करण्यात . 24 डिसेंबर 2015 ला साने गुरुजी जयंती निमित्त राष्ट्रसेवा दलाचा साने गुरुजी सामाजिक शिक्षक हा राज्यस्तरीय पुरस्कार देऊनही यांचा सन्मान करण्यात . फेब्रुवारी 2023 मध्ये शाळेसाठी गौरवाचा समजला जाणारा आणि शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा लावणारा पुरस्कार म्हणजे” मुख्यमंत्री स्वच्छ शाळा सुंदर ” या उपक्रमात बीड तालुक्यातून प्रथम पुरस्कार मिळाला आणि शाळेला तीन लाखाचे बक्षीस जाहीर झाले . या शिवाय जर आपली शाळा ” मुख्यमंत्री स्वच्छ शाळा सुंदर शाळा” या उपक्रमात तालूक्यातून पहिली आली तर नेकनूचे प्रतिष्ठीत नागरीक आणि मकसूद नर्सरीचे मालक मकसुद भाई (पहेलवान) यांनी शाळेला 50000 रु,. बक्षिस जाहिर केल आणि ते बक्षिस ही शाळेला मिळाले .याशिवाय राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानात मुख्याध्यापकांसाठी तज्ञ मार्गदर्शक म्हणून” यशदा ” पुणे येथे प्रशिक्षण घेऊन जिल्ह्यातील मुख्याध्यापकांना प्रशिक्षित करण्याचे काम सरांनी केले.

गेल्या 32 वर्षापासून मी सरांसोबत त्यांचा एक सहकारी म्हणून काम करत असताना आमचे अतिशय प्रेमाचे संबंध राहिले आहेत दिवसभराचा जास्तीत जास्त वेळ आम्ही सोबतच राहत असू त्यामुळे त्यांच्या प्रेमळ स्वभावाचे मला अनुभूती आहे त्यांच्याबरोबर एक सहकारी म्हणून काम करताना अनेक वेळा आमच्यात वैचारिक मतभेदही झाले अनेक वेळा खटके उडाले पण काहीही जरी असले तरी मतभेदाचा राग सरांनी डोक्यात कधी जाऊ दिला नाही. किंवा कोण्या सहकार्याबरोबर खुन्नस धरून सर कधीच वागले नाहीत सरांच्या सोबत राहून मी या शैक्षणिक वातावरणात इतका एकरूप झालो होतो की मी इथे रुजू झाल्यानंतर दोन वर्षांनी मला निवड मंडळाची जिल्हा परिषदची ऑर्डर आली होती पण ती ऑर्डर नाकारून मी इथेच काम करणं स्वीकारलं या घटनेला पैठणे सर साक्षीदार आहेत

अस म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एक स्त्री असते याप्रमाणे प्राचार्य पैठणे सरांच्या यशस्वीते मागे त्यांच्या पत्नी सौ शांता पैठणे यांचाही मोलाचा वाटा आहे त्यामुळेच तर सर एवढी उंची भरारी घेऊ शकले मुलगी डॉक्टर शुभांगी पैठणे आणि मुलगा चिरंजीव डॉक्टर शुभम पैठणे आणि पत्नी सौ शांता पैठणे असा सरांचा छोटा आणि सुखी परिवार आहे सरांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने त्यांना दीर्घायुष्य आणि निरोगी आयुष्य लाभो अशी शुभेच्छा देऊन थांबतो धन्यवाद .

० लेखक ०

श्री रघुनाथ किसनराव रुचके

( बी.एस्सी. एम. एड.)

ग्रामीण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नेकनूर ता . जि. बीड

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.