आपला जिल्हावैभवशाली महाराष्ट्र न्युज

कापूस घनलागवड तंत्रज्ञान प्रक्षेत्र दिवस साजरा

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज विशेष

कृषी विश्व/वैभवशाली महाराष्ट्र न्यूज

केज / प्रतिनिधी (महादेव दौंड)

दीनदयाल शोध संस्थान कृषि विज्ञान केंद्र अंबाजोगाई यांच्या माध्यमातून केकतसारणी येथे दि १० रोजी ‘प्रक्षेत्र दिवस’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषि विज्ञान केंद्राचे वरीष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. वसंत देशमुख, प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. वसंत सूर्यवंशी (कृषी विस्तार विद्यावेत्ता) उपस्थित होते. मंचावर पंडित सावंत सरपंच केकतसारणी कृष्णा कर्डिले ( शास्त्रज्ञ पीकविद्या), माऊली रूपनर, विठ्ठल हाके, बळीराम वीर (विभागीय व्यवस्थापक, राशी सीड्‌स), रामभाऊ रूपनर व कृषी विभाग चे प्रतिनिधी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना कर्डिले यांनी सांगितले की, कृषि विज्ञान केंद्राच्या माध्यमातून दरवर्षी शेतकर्‍यांच्या शेतावर आधुनिक तंत्रज्ञान प्रात्यक्षिक राबविण्यात येतात. केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर यांच्या माध्यमातून बीड जिल्ह्यात विशेष कापूस प्रकल्प अंतर्गत कापूस घनलागवड तंत्रज्ञान प्रप्रत्याक्षिके राबविली जात आहेत. कापूस घनलागवड व एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थान प्रात्यक्षिकाचे दृष्य निष्कर्ष शेतकऱ्यांना प्रत्यक्षात पाहता यावेत यासाठी प्रक्षेत्र दिवसाचे आयोजन केल्याचे त्यांनी सांगितले. पुढे माहिती देताना त्यांनी सांगितले कि, कापूस पिकामध्ये घन लागवड तंत्रज्ञानामुळे एकरी झाडांची संख्या वाढून उत्पादकतेते वाढ होते. बोंडसड होऊ नये म्हणून बुरशी नाशकाची फवारणी करावी.

डॉ. सुर्यवंशी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, परभणी कृषी विद्यापीठाने मराठवाडय़ातील मोठ्या क्षेत्रावर कापूस घनलागवड तंत्रज्ञान प्रयोग घेतले आहेत. गळफांदी छाटणी तंत्रज्ञान, अन्नद्रव्य व्यवस्थापन, फवारणी तंत्रज्ञान याचा अवलंब करून विद्यापीठ शिफारसी देत आहे. कापूस लागवड तंत्रज्ञानात बदल करून कापसातील कीड व्यवस्थापन करून एकरी उत्पादन वाढवणे शक्य आहे.

अध्यक्षीय मार्गदर्शन करताना डॉ. वसंत देशमुख यांनी सांगितले की, जिल्ह्यातील कापसाची उत्पादकता वाढविणे सोबतच उत्पादन खर्च कमी करून उच्च दर्जाचा कापूस पिकवणे आवश्यक आहे. कृषि विज्ञान केंद्राच्या पुढाकारातून केज तालुक्यात शेतकरी उत्पादक कंपनीची (कृषी पराशर शेतकरी कंपनी) स्थापना करण्यात आली आहे. कृषि विज्ञान केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी नवनवीन कृषी तंत्रज्ञान आत्मसात करावे, असे त्यांनी सांगितले.

केंद्रीय कापूस संशोधन संस्था अंतर्गत विशेष कापूस प्रकल्पाचे समन्वयक डॉ. मनिकंदन यांनी आभासी माध्यमाद्वारे शेतकऱ्यांची संपर्क साधून प्रात्यक्षिकाचे अभिप्राय घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कर्डिले यांनी केले तर आभार सरपंच पंडित सावंत यांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यल्लालिंग चिंतले (प्रकल्प युवा व्यावसायिक), सुरज पोकळे (प्रकल्प युवा व्यावसायिक), राजाभाऊ रूपनर व बालाजी बोबडे यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमास गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.