तेजज्ञान फाऊंडेशनच्या ‘ध्यान’ महोत्सवाची अंबाजोगाई येथे उत्साहात सांगता
सामाजिक/ वैभवशाली महाराष्ट्र न्यूज विशेष

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
तेजज्ञान फाऊंडेशनच्या ‘रजत जयंती ध्यान महोत्सव’चे आयोजन शहरातील लोकनेते गोपिनाथराव मुंडे सभागृह, खोलेश्वर महाविद्यालय, अंबाजोगाई येथे करण्यात आले होते. या महोत्सवाची उत्साहात सांगता झाली.
‘हॅपी थॉट्स’ नांवाने ओळखली जाणारी ‘तेजज्ञान ग्लोबल फाऊंडेशन’ ही आध्यात्मिक सेवाभावी संस्था आपल्या स्थापना दिनाच्या रौप्य महोत्सवी वर्षात प्रवेश करीत आहे. या विशेष प्रसंगी, फाऊंडेशन तर्फे रविवारी शहरातील लोकनेते गोपिनाथराव मुंडे सभागृह, खोलेश्वर महाविद्यालय, अंबाजोगाई येथे ‘रजत जयंती ध्यान महोत्सव’ (सिल्व्हर ज्युबिली सेलिब्रेशन) आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध डॉ.शंकर धपाटे (अधिष्ठाता, स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रूग्णालय), अविनाश भारती (प्रसिद्ध व्याख्याते, युवा कवी तथा किर्तनकार) आणि प्रमुख वक्त्या म्हणून डॉ.वनिता उन्हाळे मॅडम या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी कार्यक्रमाच्या सुरूवातीस बोलताना धनंजय इंगळे यांनी तेजज्ञान फाउंडेशनचे संस्थापक तेजगुरू सरश्री यांचा आणि त्यांच्या आध्यात्मिक कार्याचा परिचय करून देत केली. त्यांनी उपस्थितांना तेजज्ञान फाउंडेशनच्या जागतिक शांततेसाठीच्या कटिबद्धतेचा उल्लेख करत, बाहेरच्या जगतात शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रथम अंतर्मनात शांतता निर्माण करणे आवश्यक आहे, असे समजावले. जीवनात ‘स्वल्पविराम’ घेण्याचे महत्व पटवून देत, “हातातील मोबाइल काही वेळ बाजूला ठेवून ध्यानात बसल्यास, ध्यानाद्वारे आयुष्यात हा स्वल्पविराम निर्माण होईल आणि आपल्या सर्वोच्च आनंदाचा, ‘स्व-अनुभव’ होईल,” असे इंगळे म्हणाले. तर प्रमुख वक्त्या म्हणून डॉ.वनिता उन्हाळे मॅडम यांनी तेजज्ञान फाऊंडेशनचे संस्थापक तेजगुरू सरश्री यांनी जीवनात ध्यान व आध्यात्मिक साधनेचे महत्त्व पटवून देत लाखो लोकांच्या जीवनात आनंद आणि शांती निर्माण केली आहे असे सांगून तेजज्ञान फाउंडेशन तर्फे आयोजित या ध्यान महोत्सवाच्या माध्यमातून जगभर शांतता आणि आनंद पसरविण्याच्या उद्दिष्टाला एक नवीन दिशा देण्यात आली असल्याचे उन्हाळे मॅडम यांनी सांगितले. या प्रसंगी डॉ.शंकर धपाटे आणि अविनाश भारती यांनी ही तेजज्ञान फाऊंडेशनच्या वतीने ‘रजत जयंती ध्यान महोत्सव’चे उत्तम आयोजन केल्याबद्दल कौतुक केले. तसेच त्यांनी आपल्या विचारांतून उपस्थितांना संबोधित केले आणि साधनेसाठी प्रेरणा दिली. या कार्यक्रमात तेजगुरू सरश्री यांचा ध्यानावर मार्गदर्शन करणारा व्हिडिओ संदेश दाखविण्यात आला. सरश्रींनी यात ध्यान का आणि कसे करावे, तसेच ध्यानाचे वरवरचे तसेच अंतिम लाभ म्हणजे ‘मी कोण आहे?’ या प्रश्नाचे उत्तर शोधणे, यावर प्रकाश टाकला. “मी कोण आहे ?” हा शोध घेणे मानवी जीवनाचे अंतिम उद्दिष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी सर्व उपस्थितांना २१ मिनिटांचे ध्यान अनुभवण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले, ज्यातून उपस्थितांना ‘स्व-अनुभव’ मिळाला. या कार्यक्रमाला १०० पेक्षा अधिक साधक आणि नागरिक सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनंजय इंगळे यांनी रंगतदार पद्धतीने केले आणि फाउंडेशनच्या २५ वर्षांच्या प्रवासाची ओळख उपस्थित श्रोत्यांना करून दिली. कार्यक्रमाच्या समारोपात, जवळपास सर्व उपस्थितांनी २१ दिवसांचे ध्यान चॅलेंज घेण्याचा संकल्प व्यक्त केला. तेजज्ञान फाउंडेशन तर्फे अशा प्रकारचे कार्यक्रम भारतातील सुमारे १२५ शहरांमध्ये आयोजित करण्यात आले आहेत, ज्यामुळे संपूर्ण देशभर ध्यानाच्या माध्यमातून शांतता आणि आनंदाचे सशक्त वातावरण निर्माण होत आहे हे उल्लेखनीय आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी तेजज्ञान फाऊंडेशन, शाखा अंबाजोगाईच्या वतीने पुढाकार घेण्यात आला.