डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकॅडमीचा राज्यस्तरीय पुरस्कार उपप्राचार्य प्रा.गौतम गायकवाड यांच्या ग्रंथास जाहीर
वैभवशाली महाराष्ट्र न्यूज

अंबाजोगाई (प्रतिनिधी)
येथील प्रवर्तनवादी चळवळीतील आघाडीचे लेखक उपप्राचार्य प्रा.गौतम गायकवाड यांच्या ‘बुध्द प्रबुद्ध विचारांच्या पाऊलखुणा’ या ग्रंथास सन-२०२५ साठी दिला जाणारा राज्यस्तरीय ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकॅडमी’ तृतीय पुरस्कार जाहीर झाला आहे. या बाबतचे पत्र त्यांना नुकतेच प्राप्त झाले आहे. त्यांच्या या उल्लेखनिय यशाबद्दल उपप्राचार्य प्रा.गायकवाड यांचे सर्वस्तरांतून अभिनंदन होत आहे.
यापूर्वी याच संस्थेचा ‘व्हि.जे.आरक’ या ग्रंथास राज्यस्तरीय तृतीय, ‘प्रज्ञासुर्याचे सुर्यपुत्र’ या ग्रंथास राज्यस्तरीय प्रथम आणि ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि आंबेडकरी साहित्य (आकलन आणि अवलोकन)’ या ग्रंथास सन- २०२२ साठी दिला जाणारा राज्यस्तरीय ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकॅडमी’ द्वितीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. या उपरोक्त संस्थेचा सलग हा चौथा पुरस्कार उपप्राचार्य प्रा.गौतम गायकवाड यांना मिळाला आहे. ही विशेष उल्लेखनीय बाब आहे. उपप्राचार्य प्रा.गायकवाड हे आंबेडकरी चळवळीतील आघाडीचे लेखक, कवी आणि विचारवंत आहेत. त्यांच्या समग्र व उल्लेखनिय कारकिर्दीची दखल घेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकॅडमी, लातूर यांच्या वतीने त्यांनी लिहिलेल्या ‘बुध्द प्रबुद्ध विचारांच्या पाऊलखुणा’ या ग्रंथास सन-२०२५ साठीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. या बाबत अकॅडमीचे सचिव प्रकाश घादगिने यांनी कळविले आहे. त्यानुसार या पुरस्काराचे वितरण शनिवार, दि. २६ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी ५ या वेळेत डॉ.भालचंद्र ब्लड बँक, बसस्टँड मागे, लातूर येथे आयोजित डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकादमीचे पहिले साहित्य संमेलनात मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. प्रा.गौतम गायकवाड यांना यापुर्वीही डॉ.जगजीवनराम लेखक पुरस्कार (नेपाळ), प्रेरणा समीक्षा पुरस्कार (पुणे), समाजभुषण पुरस्कार (सोलापुर), उत्कृष्ट लेखक पुरस्कार (लातूर) आणि व्ही.जे.आरक या ग्रंथास राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. उपप्राचार्य प्रा.गायकवाड यांचे २१ हून अधिक पुस्तके, विविध वृत्तपत्र, नियतकालिकांतून लेखन, दहा पेक्षा अधिक ग्रंथांचे संपादन, त्यांनी केले आहे. या सोबतच सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि धार्मिक कार्यात त्यांचा सक्रीय सहभाग राहिला आहे. अनेक चर्चासत्रात सहभाग घेत विविध नियतकालिकांतून त्यांचे तिनशेहून अधिक लेख प्रकाशित झाले आहेत. नवोदित साहित्यिक, कवी यांना प्रोत्साहन देण्याचे तसेच त्यांच्या ग्रंथ प्रकाशनासाठी प्रसंगी सर्वोतोपरी भरीव सहकार्य करण्याचे कार्य देखिल प्रा.गायकवाड यांनी वेळोवेळी केले आहे. व्ही.जे.आरक सेवाभावी संस्था आणि परिवर्तन साहित्य मंडळाचे ते अध्यक्ष ही आहेत. तसेच ‘परिवर्तन संशोधन’ मासिकाचे कार्यकारी संपादक आहेत. परिवर्तन साहित्य संमेलनाच्या आयोजनात त्यांचा पुढाकार आहे. आगामी काळात ११ विविध विषयांशी संबंधीत ग्रंथ, काव्य संग्रह, प्रवर्तनवादी चळवळीला बळ देणाऱ्या ग्रंथाचे लेखक म्हणून ही ते ओळखले जातात. या सर्व विषयांवरील त्यांच्या ग्रंथसंपदा प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. उपप्राचार्य प्रा.गौतम केरबा गायकवाड हे सध्या अंबाजोगाईतील खोलेश्वर महाविद्यालयाचे उपप्राचार्य आणि मराठी भाषा विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. मागील ३३ वर्षांपासून ते अध्यापनाचे कार्य करीत आहेत. त्यांनी नाटक, कथा, कविता, प्रासंगिक, संशोधन, संपादन आदी विपुल ग्रंथ व साहित्य संपदा निर्मिली आहे. त्यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकॅडमी, लातूर यांच्या वतीने त्यांनी लिहिलेल्या ‘बुध्द प्रबुद्ध विचारांच्या पाऊलखुणा’ या ग्रंथास सन-२०२५ साठीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याबद्दल उपप्राचार्य प्रा.गौतम गायकवाड यांचे सामाजाच्या सर्वस्तरांतून अभिनंदन होत आहे.