श्रीराम जन्मभूमी हे राष्ट्रमंदिर आहे – सुप्रसिद्ध सिनेअभिनेते राहुल सोलापूरकर
मंगल कलश पुजन व दर्शन ; दिनदर्शिका प्रकाशन

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज विशेष
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
दीनदयाळ नागरी सहकारी बँकेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही 10 जानेवारी ते 12 जानेवारी 2024 या कालावधीत तीनही दिवस युगपुरूष स्वामी विवेकानंद यांच्या 161 व्या जयंतीनिमित्त व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रबोधनपर व्याख्यानमालेचा समारोप शुक्रवार, दि.12 जानेवारी रोजी सुप्रसिद्ध सिनेअभिनेते तथा व्याख्याते राहुल सोलापूरकर (पुणे) यांच्या ‘श्रीराम जन्मभूमी – इतिहास राष्ट्र मंदिराचा’ या विषयावरील व्याख्यानाने झाला.
कार्यक्रमाची सुरूवात भारतमाता, राजमाता जिजाऊ माँ साहेब, युगपुरूष स्वामी विवेकानंद, पंडित दीनदयाळजी उपाध्याय यांच्या प्रतिमापूजन आणि दीपप्रज्ज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर मंगल कलश पुजन करण्यात आले. तर बॅंकेच्या वतीने मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर प्रमुख व्याख्याते म्हणून सुप्रसिद्ध सिनेअभिनेते राहुल सोलापूरकर, बँकेचे अध्यक्ष ऍड.मकरंद पत्की, उपाध्यक्ष ऍड.राजेश्वर देशमुख, संचालक सर्वश्री रा.गो.धाट, संचालिका शरयूताई हेबाळकर, इंजि.बिपीन क्षिरसागर, मकरंद कुलकर्णी सोनेसांगवीकर, प्रा.जयकरण सुरेशकांबळे, बाळासाहेब देशपांडे, तज्ज्ञ संचालक ऍड.अशोक कुलकर्णी, प्रमुख पाहुणे संदिप लाहोटी, पंडित उध्दवराव आपेगावकर व मुख्यकार्यकारी अधिकारी सनतकुमार बनवसकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. तृतीय पुष्प गुंफताना सुप्रसिद्ध सिनेअभिनेते राहुल सोलापूरकर यांनी सांगितले की, श्रीराम जन्मभूमी अयोध्या हे सर्व हिंदूंसाठी एक सांस्कृतिक तीर्थक्षेत्र आहे. अनेक ऐतिहासिक, पौराणिक संदर्भ देत सोलापूरकर यांनी विषयाची अभ्यासपूर्ण मांडणी केली. सुमारे अडीच हजार वर्षांचा कालखंड उभा केला. इसवी सन पूर्व काळापासून हिंदू अयोध्यातील श्रीराम मंदिर निर्माण, जिर्णोद्धार, संरक्षण, दर्शन, उपासना आदी बाबींसाठी लढा देत आहेत. याकामी लाखो हिंदू बांधवांना आपल्या प्राणांचे बलिदान द्यावे लागले आहे. हे विसरता येणार नाही. रामायण, महाभारत, सनातन वैदिक तत्वज्ञान, बौद्ध तत्वज्ञान, जैन तत्वज्ञान, ग्रीक आणि इस्लामी राजवटींचे सातत्यपूर्ण आक्रमण, त्यांची कार्यपद्धती, धर्मांतरण, महिलांवरील अन्याय अत्याचार, हिंदूंची प्रसिद्ध मंदिरे पाडून तत्कालीन समाज मनावर निर्माण केलेली दहशत, तत्कालीन इस्लामी राजवटीला विरोध करण्यासाठी गुरूगोविंद सिंग, साधू, संत, महंत, आचार्य, बैरागी, राजे, महाराजे, स्त्रिया, समाज आणि समाज नेतृत्व यांनी दिलेला लढा. इस्लामी शासकांचा अनागोंदी कारभार, झिजीया सारख्या कराच्या रूपाने लुट होत असताना अशा ही संकटकाळात धर्म प्रतिष्ठापना, मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी तत्कालीन समाजाने प्रखर राष्ट्रवाद जोपासला. तर सोलापूरकर यांनी प्रभू श्रीराम यांचे जन्मस्थान अयोध्या नगरीच्या एकविसशे वर्षांचा इतिहास तपशीलवार समजावून सांगितला. श्रीराम मंदिर उभारणीसाठी स्वातंत्र्यानंतर ही सत्तर वर्षांहून अधिक वर्षांचा कालावधी लागला याबाबत सोलापूरकर यांनी खंत व्यक्त केली. श्रीराम जन्मभूमी हे राष्ट्रमंदिर आहे असे ही त्यांनी सांगितले. तर समारोपपर मनोगत व्यक्त करताना याबाबत बँकेचे उपाध्यक्ष अॅड.राजेश्वर देशमुख यांनी सांगितले की, दीनदयाळ बँकेने या वर्षी दुष्काळजन्य परिस्थिती असताना सुध्दा एक परिवार म्हणून काम केले. उत्तम टीमवर्क करून नुकताच 503 कोटींच्या ठेवींचा टप्पा पूर्ण केला आहे. एकूण व्यवसायाचा 825 कोटींचा पल्ला ही गाठला आहे. लवकरच 31 मार्च 2024 अखेरपर्यंत 1000 कोटी रूपयांच्या व्यवसायाचे लक्ष बँकेने समोर ठेवले आहे. लवकरच ते ही साध्य होईल. आर्थिक क्षेत्रात कार्य करीत असताना सामाजिक बांधिलकी जोपासत समाजाचे आपण काही देणे लागतो. याच जाणिवेने बॅंकेने मागील 21 वर्षांपासून एक वसा जोपासला आहे. व्याख्यानमालेच्या माध्यमातून वैचारिक स्थिती सुधारावी, खरा इतिहास लोकांसमोर यावा, यासाठी दीनदयाळ नागरी सहकारी बँकेने कोविड काळासह अव्याहतपणे हे कार्य सुरू ठेवले आहे. या उपक्रमाचे हे 22 वे वर्ष आहे. या उपक्रमांतर्गत आजपावेतो सदर व्याख्यानमालेत विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींनी रसिकांना वैचारिक मेजवानी देवून वेळोवेळी आपले अनमोल विचार मांडले आहेत. अशी माहिती उपाध्यक्ष अॅड.देशमुख यांनी दिली. तर याप्रसंगी पंडित उध्दवबापू आपेगावकर यांनी सोलापूरकर यांच्याविषयीचा अनुभव कथन केला. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीनदयाळ नागरी सहकारी बँकेने तयार केलेल्या “दिनदर्शिका – 2024” चे प्रकाशन करण्यात आले. प्रारंभी पाहुण्यांचा परिचय बँकेच्या संचालिका शरयूताई हेबाळकर यांनी करून दिला. तर सूत्रसंचालन ओंकार कुलकर्णी यांनी केले. उपस्थितांचे आभार तज्ज्ञ संचालक ऍड.अशोक कुलकर्णी यांनी मानले. विश्वजीत धाट यांनी पद्य सादर केले. बँकेच्या वतीने 12 जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ माँसाहेब, युगपुरूष स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. या व्याख्यानमालेस तीन ही दिवस विविध क्षेत्रातील मान्यवर, अंबाजोगाई शहर व परिसरातील रसिक, श्रोते, ज्येष्ठ नागरिक, माता, भगिनी आणि युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.