संतांच्या संगतीत अर्ध्या क्षणात मानवी जीवनाचे कल्याण होते – ह.भ.प. समाधान महाराज शर्मा
केज येथील स्वामी समर्थ मठामध्ये सार्ध शतकपुर्ती सोहळ्यात किर्तन सेवा संपन्न

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
केज/प्रतिनिधी
संतांच्या संगतीत अर्ध्या क्षणात मानवी जीवनाचे कल्याण होते असे प्रतिपादन भावरत्न गुरुदास सुप्रसिद्ध विविध कथाकार व महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकार ह.भ.प. समाधान महाराज शर्मा यांनी केले.ते स्वामी समर्थ मठामध्ये सार्ध शतकपुर्ती सोहळ्यात किर्तन सेवा प्रसंगी बोलत होते.केज येथील स्वामी समर्थ मठाची स्थापना प.पु.श्रीमंत नानासाहेब महाराज उर्फ महारुद्र देशपांडे यांनी दिडशे वर्षांपूर्वी केली आहे.अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराज यांनी स्वहस्ते प्रासादिक पादुका तसेच स्वामी समर्थ यांची बाल स्वरुपातील पंचधातूची मुर्ती, स्वामी समर्थ यांच्या हातातील काठी व भिरकावून मारलेला गोटा प.पु.नानासाहेब महाराज देशपांडे केजकर यांना प्रदान करून केज येथे मठ स्थापन करण्याची आज्ञा केली होती.या प्रासादिक मठाला सार्ध शतक म्हणजे दिडशे वर्ष पूर्ण होत आहेत. त्या निमित्त शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी सोहळा साजरा केला जात आहे.या निमीत्त दि.११ मे २०२५ रोजी रविवारी भावरत्न गुरुदास विविध कथाकार ह.भ.प. समाधान महाराज शर्मा हे बोलत होते.त्यांनी किर्तन सेवेसाठी
अर्ध क्षण घडता संतांची संगती । तेणें होय शांती महत्पापा ॥१॥ संतसंग देई संतसंग देई|आणिक प्रवाही घालुं नको ॥२॥
संसार मज न करणें सर्वथा । परमार्थ पुरता हाती देई ॥३॥
जनार्दनाचा एका करुणावचनीं । करी विनवणी पायांपाशीं ॥४॥ हा संत एकनाथ महाराज यांचा अभंग किर्तन सेवेसाठी घेतला होता.यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, संतांच्या संगतीत अर्ध्या क्षणात मानवी जीवनाचे कल्याण होते.संताचे ह्दय नवनीत म्हणजे लोण्यासारखे असते. संत चोखामेळा यांच्या दर्शनाने कान्होपात्रा अर्ध्या क्षणात पावन झाली.कृत युगात ध्यान, त्रेता युगात यज्ञ याग तर द्वापार युगात नाम जप व कलीयुगात कथा कीर्तन सांगितले आहे. या चार ही युगातील साधना स्वामी समर्थ मठामध्ये घडत आहेत. स्वामी समर्थ दत्त अवतार असल्याचे सांगत त्यांनी अगर स्वामी नहीं है तो जिक्र क्यों अगर स्वामी है तो फिक्र क्यों असे सांगितले.नानासाहेब महाराज देशपांडे यांच्या मुळे केजकर देशपांडे परिवार व आपण भाग्यवान आहोत स्वामी समर्थ महाराज हयात असताना त्यांनी दिलेल्या प्रासादिक वस्तू आपल्याकडे आहेत त्यामुळे स्वामी समर्थ महाराज कायम आपल्या सोबत आहेत असे त्यांनी सांगितले.या वेळी केज शहरातील तसेच महाराष्ट्र राज्या तील स्वामी भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.