मी आज स्वप्नातच आहे असे वाटते
शब्दांकन - प्रसाद दादा चिक्क्षे ज्ञान प्रबोधिनी अंबाजोगाई

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज सामाजिक
संपादकीय विशेष लेख
अगदीच शिक्षणाचा श्रीगणेश होतो त्यावेळी ‘अ’ अननसाचे किंवा ‘A’ अँपलचे म्हणून शिकवतो. लहान वयातच आपल्या सारख्या पांढरपेशा वर्गातील मुलांना अननसाची आणि अँपलची प्रत्यक्ष खाऊन पण ओळख होते. मी वस्तीवरील मुलांना सहज विचारले होते की तुमच्या घरी कोणती फळ वडील किंवा पाहुणे घेऊन येतात.सर्वांचे एकच उत्तर केळी. बाकीच्या फळांची मुलांना फारशी ओळखच नव्हती. त्यावेळी पासून आपण मुलांना दर आठवड्याला फळ खाण्यासाठी देतो. ते फळ कोणत्या रंगाचे आहे. त्याची चव कोणती. त्यातून शरीराला काय फायदा होतो. त्याचे इंग्रजीतील नाव काय.त्याची किंमत किती. ते मोजतात कसे. त्याचे झाड कसे असते. कोणत्या ऋतूत ते फळ येते. अशा अनेक गोष्टी मुलं शिकतात आणि शेवटी सगळे मिळून ते फळ खातात.
पूजा नावाची एक खूपच चौकस मुलगी. आठवीत असताना तिला शिक्षण थांबवावे लागले. तिची मोठी बहीण अभ्यासात चांगलीच प्रगत असल्याने पूजाच्या वाट्याला मोठ्या घरातील स्वयंपाक आणि घरकाम आले. तशी ती शाळेत फार रमलीच नाही. आता आपल्या आनंद शाळेत आल्यापासून ती चांगला अभ्यास करायला लागली. ती अजिबात लाजरीबुजरी नाही.मनात एक आणि पोटात एक असे पण नाही. जे काही विचारू ते मोकळेपणाने ती सांगणार.
मी सगळ्या मुलांना विचारले अजून कोणते फळ आपण खाल्ले नाही ? सगळेच शांत होते. ‘ड्रैगन फळ आपण नाही खाल्ले’ पूजाने चटकन उत्तर दिले. तुम्हाला ते खायला आवडेल का ? सगळ्यांचा जोरदार प्रतिसाद होता. माझ्यासह कुणीच ते फळ खाल्ले नव्हते. काही दिवस गेले आज वस्तीवर जाताना मला ते फळ दिसले.आधी माझे शिक्षण. ते कापायचे कसे पासून सर्व काही. सगळे शिकल्यावर ते मुलांना शिकवायचे.
वस्तीवर माझ्या बरोबर पृथ्वीराज नावाचा नवीन दादा हराळीहुन आला होता. पहिले नमस्ते झाल्यावर आमचे ड्रैगन फळांचे शिक्षण झाले व शेवटी आनंदात गुलाबी ओढ करत ते खाणे पण झाले. पूजा काही काळात ते सुरेख सोलायला आणि कापायला शिकली. शेवट झाल्यावर बाईसाहेब म्हणतात, “मी आज स्वप्नातच आहे असे वाटते.”
नागरीवस्ती आणि भटक्या आणि विमुक्त बांधवांच्या कामासाठी आपली मदत जरूर असू द्या !!
शब्दांकन -:
श्री प्रसाद दादा चिक्क्षे {समाजसेवक ज्ञान प्रबोधिनी अंबाजोगाई}