आपला जिल्हाकृषी विशेष

बीड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकर्‍यांना सरसकट हेक्टरी 50 हजार रूपये नुकसान भरपाई द्या – राजेसाहेब देशमुख यांची मागणी

काँग्रेसचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

अंबाजोगाई (वार्ताहर)

बीड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकर्‍यांना सरसकट हेक्टरी 50 हजार रूपये नुकसान भरपाई द्या, नुकसानग्रस्त पिकांचे तात्काळ पंचनामे करून पीक विमा देखिल मंजूर करा अशी मागणी बीड जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

याबाबत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी अंबाजोगाईचे तहसिलदार डॉ.विपीन पाटील यांच्या मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना बुधवार, दिनांक 19 ऑक्टोबर रोजी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, बीड जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून अतिवृष्टीने धुमाकूळ घातलेला आहे. शेती पिकांचा हाता तोंडाशी आलेला घास हा निसर्गाच्या अवकृपेने हातचा निघून गेला आहे. यापूर्वी बीड जिल्ह्यामध्ये गोगलगायीच्या संकटामुळे व लम्पी आजारामुळे शेतकरी बांधव हा खूप मोठ्या संकटात सापडलेला होता. गोगलगायी, यलो मोझॅकच्या हल्ल्यामुळे दोन – तीन वेळेला पेरणी करावी लागली होती. त्यातच बीड जिल्ह्यामध्ये पिक विमा व नुकसान भरपाई अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झालेला आहे .पेरणीसाठी व मशागतीसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करणे ही त्याला अद्याप शक्य झालेले नाही. त्यातच कसे-बसे खरीप हंगामाचे पिक काढणीला आले असताना नेमके त्याचवेळी संततधार पाऊस सुरू झाला व गेल्या आठ-दहा दिवसांपासून संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये दररोज कुठे ना कुठे अतिवृष्टी, तर कुठे मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे पूरस्थिती निर्माण झालेली आहे. सोयाबीनचे पीक संपूर्णतः पाण्याखाली गेलेले असून कापूस पिकाचे सुद्धा अतोनात नुकसान झालेले आहे. संपूर्ण खरीप हंगामातील पिके नष्ट होत आलेली आहेत व यामुळे शेतकरी वर्ग हा अतिशय मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला आहे. त्यामुळे नुकसान झालेल्या शेतीच्या पिकांची तात्काळ पाहणी करून पंचनामे करावेत व नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना तात्काळ हेक्टरी 50 हजार रूपये मदत शासनाने द्यावी. अन्यथा बीड जिल्ह्यात मागील वर्षभरात मोठ्या प्रमाणावर शेतकरी बांधवांच्या आत्महत्या झाल्या आहेत. आज बीड जिल्हा हा संपूर्ण राज्यात शेतकरी आत्महत्यांमध्ये एक नंबरला असल्यामुळे या पुढील काळात शेतकरी बांधवांच्या आत्महत्यांचे प्रमाण आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे जर शेतकरी बांधवांच्या आत्महत्या रोखायच्या असतील तर झालेल्या नुकसानीचे ताबडतोब पंचनामे करून प्रती हेक्टरी 50 हजार रूपये नुकसान भरपाई शासनाने द्यावी अशी मागणी संपूर्ण बीड जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या वतीने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून करण्यात येत आहे. असे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांचेकडून देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. सदरील निवेदनावर जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, शहराध्यक्ष आसेफोद्दीन खतीब, कपिल मस्के, समीर देशपांडे, प्रविण देशमुख, संजयराव काळे, बाळासाहेब जगताप, गणेश गंगणे, श्री औचित्ते, शेख अकबर, अमर गायकवाड आदींसह इतरांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.