श्री योगेश्वरी कनिष्ठ महाविद्यालयात भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना अभिवादन
भारतीय तरूणांनी मिसाईल मॅन डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचे प्रेरणादायी विचार आत्मसात करावेत - विश्वविक्रमवीर प्रशिक्षक सर नागेश जोंधळे यांचे प्रतिपादन

वैभवशाली महाराष्ट्र न्युज नेटवर्क
================
अंबाजोगाई (वार्ताहर)
21 व्या शतकात होऊ घातलेले अमुलाग्र बदल तसेच विज्ञान व तंत्रज्ञानाने केलेली प्रगती पाहता ‘मिसाईल मॅन’ म्हणून सर्व जगाला सुपरिचित असलेले भारताचे लोकप्रिय राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचे विचार भारतीय तरूणांना आंतरराष्ट्रीय पातळीवर झेप घेण्यासाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन ‘आई सेंटर’चे संचालक, विश्वविक्रमवीर प्रशिक्षक तथा ॲमेझॉन बेस्ट सेलिंग लेखक सर नागेश जोंधळे यांनी केले.
शहरातील श्री योगेश्वरी कनिष्ठ
महाविद्यालयातील डॉ.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त भाषा विभाग आयोजित “प्रभावी इंग्रजी संभाषण कौशल्य व करिअरच्या संधी” या कार्यक्रमात अकरावी वर्गातील तरूणांना मार्गदर्शन करताना सर जोंधळे बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य व्ही.एन.जोशी तर यावेळेस विचारमंचावर सोहम एज्युकेशन कौन्सिलिंग सेंटरचे संचालक प्रा.राहुल सुरवसे, भाषा विभागाचे प्रा.सचिन कराड यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना विश्वविक्रमवीर सर नागेश जोंधळे म्हणाले की, आपल्या भारतातील तरूण हे खूप महत्त्वकांक्षी आहेत. त्यांच्यातील गुणवत्ता व सृजनशीलता यामुळे संपूर्ण जगामध्ये माहिती तंत्रज्ञाना सोबतच मेडिकल, इंजिनिअरिंग, उद्योजकता यात नाविन्यपूर्ण संशोधन करून तसेच, शिक्षण, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक अशा इतर क्षेत्रांमध्ये ही कमालीचे योगदान देत आहेत. तरूण वयात आपण निवडलेल्या शाखेतील ज्ञानसंपदा सोबतच प्रभावी संभाषण कौशल्य, व्यक्तिमत्व विकास, नेतृत्व कौशल्य यावर भर देऊन करिअरच्या विविध संधी याचाही अभ्यास करून आपण आपले जिवनमान अधिक उंचावू शकतो असे नमूद केले. जगात सर्वांत तरूण देश म्हणून आपल्या भारताची ओळख आहे. सद्यस्थितीत तरूण हा खूप जागरूक आहे. तो टी.व्ही, कॉम्प्युटर, लॅपटॉप, मोबाईलसह इंटरनेट, सोशल मीडिया, युट्युबचाही चांगला उपयोग करीत आहे. आपले ध्येय गाठण्यासाठी काय चांगले व काय वाईट याचीही सजगता येणे गरजेचे आहे. यासाठी नियोजन, निर्णय क्षमता व निरीक्षण क्षमता खूप महत्त्वाची असल्यामुळे तो अभ्यासावर लक्ष केंद्रित करून आपले स्वतःचे, आई – वडिलांचे व गुरूजनांचे स्वप्न साकारण्यासाठी जिद्द व चिकाटीने प्रामाणिकपणे प्रयत्न करतानाचे चित्र सभोवताली दिसत आहे. याचे समाजभान ठेवून आमच्या ‘इन्फॉर्मेशन एक्सचेंज सेंटर’ अर्थात ‘आई सेंटर’चे मिशन “सशक्त राष्ट्र निर्मितीसाठी तरूणांना सक्षम बनविणे” असून यासाठी डॉ.अब्दुल कलाम यांच्या जयंतीचे औचित्य साधून 6 ते 15 ऑक्टोबर 2022 या दहा दिवसांच्या कालावधीत आम्ही अंबाजोगाई व परिसरातील बारा शाळांना भेट देत 3400 पेक्षा अधिक तरूणांना प्रोत्साहित केले, त्यांना नविन संकल्प पूर्ण करण्यासाठी योगदान देता आल्याचे आम्हाला मोठे समाधान वाटते असे विचार त्यांनी व्यक्त केले व हीच खरी देशभक्ती तसेच आपल्या महामानवांच्या विचारांची प्रत्यक्षात अंमलबजावणी करताना सर नागेश जोंधळे यांनी कृतज्ञ असल्याचे सांगितले. अध्यक्षीय समारोप करताना उपप्राचार्य प्रा.व्ही.एन.जोशी यांनी सांगितले की, डॉ.अब्दुल कलाम यांचे संपूर्ण आयुष्य देशसेवा व तरूणांसाठी समर्पित केले होते. येथील भाषा विभागाने पुढाकार घेत अशा महत्त्वपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करून विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच आत्मविश्वास वाढीसाठी, सभाधिटपणा, त्यांच्यातील संभाषण कौशल्य आणि पुढाकार घेण्यासाठी प्रेरणा देऊन आपल्या प्रभावशाली मार्गदर्शनातून सर नागेश जोंधळे यांनी सर्वांना बोलके केले व त्यांच्यात नविन उत्साह संचारित केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील तेज, डोळ्यांतील चमक व महत्त्वकांक्षा स्पष्ट दिसत असल्याचे सांगितले. त्यांनी सहभागी मुलांचे, भाषा विभागाच्या संपूर्ण टीमचे कौतुक व अभिनंदन करत यापुढेही विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी असे प्रेरक कार्यक्रम घेणार असल्याचे सांगितले. यावेळेस प्रभावी सूत्रसंचालन करत आपल्या प्रभावी सादरीकरणाची चुणूक दाखवित सर्व उपस्थितांची मने जिंकणारी व ‘आई सेंटर आयकॉन’ पुरस्कार प्राप्त कु.श्रद्धा शिवाजीराव शिंदे हिचे विशेष कौतुक करत कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन करणारे कु. गायत्री सरदेशमुख व कु. रसिका घोडके या तरुणींचाही सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थीप्रिय प्रा.सचिन कराड यांनी केले, तर उपस्थित मान्यवर आणि विद्यार्थ्यांचे आभार प्रा.नवनाथ भोजने यांनी मानले. यावेळी प्रा.धनराज डोंगरदिवे, प्रा. अशोक पांडे, प्रा.अनंत जोशी, प्रा.रेखावार, प्रा.माले यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.