प्रेम करणे म्हणजे नेमके काय असते ?
कुलदीप दहा वर्षांच्या असेल. तीन दिवस शाळेत जातो आणि चार दिवस कामाला.

संपादकीय लेख
कुलदीप दहा वर्षांच्या असेल. तीन दिवस शाळेत जातो आणि चार दिवस कामाला.
“शाळेत नियमित जात जा न कुलदीप.”
“दादा मी काम नाही केलं तर घरातील सर्वांना जेवायला नाही मिळायचे न !!”
मी थोडा अस्वस्थच झालो. केवळ दहा वर्षांच्या वयात ह्या चिमण्या लेकराला शिकण्या आणि खेळण्या ऐवजी दिवसभर काम करावे लागते. कुलदीप सकाळीच उठतो,सगळं काही आवरले की तो 8 वाजता भंगार वाल्याकडे वडिलांच्या सोबत काम करायला जातो. परत येण्याची वेळ संध्याकाळी सहा वाजता. एवढा छोटा हा पोर चक्क 9 तास काम करतो !! काळजात धडकी भरते.
एवढ्या लहान वयात त्याच्यात अकाली प्रौढत्व आल्यासारखे वाटते. तो वस्तीवरील फारच समजदार मुलगा. कुठला हट्ट नाही.कधी राग नाही न चिडचिड नाही. तो एकदम खुश असलेला पण मी फारच कमी वेळा पाहिलं.
आज वस्तीवर गेलो आणि सरळ कुलदीपला म्हणालो चल जाऊ फिरायला.
“कुठे जायचे ?”
“अरे घुमेंगे फिरेंगे एश करेंगे और क्या !!”
तो पटकन उडी मारून माझ्या मागे बसला. आम्ही थेट फळवाला गाठला. वडारवस्तीवर जायचे होते. तेथील मुलांच्यासाठी व कुलदीपसाठी सफरचंद घेतली. वडारवस्तीवर अर्चना नावाची गुणी मुलगी आहे तिला रंग पेन्सिल व चित्र द्यायचे होते. तिथल्या मुलांशी मस्त गप्पा मारल्या. बांधवांनी केलेली जाती,उखळ सारख्या दगडी वस्तू पाहिल्या. त्यानंतर थेट कुलदीपचा फेव्हरेट वडा पावचा गाडा गाठला. त्याला तो सुखद धक्का होता. आपल्यावर प्रेम करणाऱ्याने आपल्यासाठी काही न मागता काही करणे खूपच सुखद भावना देऊन जाते हे मी आता शिकतोय !! वडा पाव आणि पॅटिस खाल्ल्यावर मग आम्ही परत वस्तीवर आलो. कुलदीप आणि इतर मुलांना सकाळ सकाळी फ्रेश तोंड धुण्यासाठी मस्त ब्रश आणि पेस्ट दिले. सगळी मंडळी भारीच खुश !! ब्रश आणि पेस्ट मिळाल्यावर इतका आनंद या लेकरांना होतो हे पाहून नवल वाटले.
“चल कुलदीप आता काय करायचे ?”
त्याला काही सुचत नव्हते. मला एक माहित होते की मुलांना माझ्या घरी यायला आवडते. मी कुलदीपला घेऊन माझ्या घरी आलो. तो एकदम खुश !! माझ्या आईला भेटल्यावर त्याच्या चेहऱ्यावर वेगळीच चमक होती आणि माझ्या आईच्या चेहऱ्यावर सुद्धा !!
आमचे मोठे बंधू राजेसाहेब किर्दंत माझी घरी वाट पाहत होते. त्यांना मला छान कपडे घ्यायचे होते. त्यांच्या मुलाचे लग्न ठरले होते त्यासाठी !!
“राजेसाहेब मला आनंद झाल्यावर तुम्ही जास्त आनंदी व्हाल की मला कपडे केल्याने तुम्ही आनंदी व्हाल ?”
“तुम्हाला आनंद झाल्यावर !!”
“मग आपण न या कुलदीपला मस्त स्वेटर घेऊ !!”
आम्ही दोघे आणि कुलदीप मग स्वेटर घेण्यासाठी निघालो. कुलदीपला आवडेल असे मस्त स्वेटर घेतले. उबदार स्वेटर घातल्यावर कुलदीपच्या चेहऱ्यावरील ओसंडून जाणारा आनंद मी पहिल्यांदाच पाहिला होता !! त्याच्यासाठी आजचा दिवस अविस्मरणीय नक्कीच होता कारण त्याच्यावर प्रेम करणाऱ्या प्रसाददादाने एकानंतर एक खूप अनपेक्षित सुखद क्षण त्याला दिले होते !!
‘आज मै उप्पर आसमा नीचे’ अशीच काहीशी अवस्था माझी, कुलदीप आणि राजेसाहेबांची झाली होती. प्रेम करणे म्हणजे नेमके काय असते ? हे मी आज कुलदीप बरोबर शिकत होतो !!