आपला जिल्हाक्रीडा व मनोरंजनमहाराष्ट्र

दिव्यांग शाळेतील मुला-मुलींच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचे 9 व 10 जानेवारी रोजी अंबाजोगाईत आयोजन

450 दिव्यांग विद्यार्थी व विद्यार्थीनी सहभागी होणार

अंबाजोगाई (प्रतिनिधी)

जिल्हा समाज कल्याण कार्यालय, जिल्हा परिषद, बीड आणि सौ.सुमतीबाई गुणाले शिक्षण प्रसारक मंडळ,धानोरा (ता.अंबाजोगाई) यांच्या संयुक्त विद्यमाने बीड जिल्ह्यातील दिव्यांग शाळेतील मुला – मुलींच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन 9 व 10 जानेवारी 2023 रोजी अंबाजोगाईत करण्यात आले आहे. या स्पर्धेत 450 दिव्यांग विद्यार्थी व विद्यार्थीनी सहभागी होणार आहेत अशी माहिती स्पर्धेचे संयोजक रवींद्र शिंदे (जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद,बीड) वैसाका अंकुश नखाते आणि सौ.सुमतीबाई गुणाले शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव दिनकर गुणाले यांनी दिली आहे.

दिव्यांग शाळेतील मुला – मुलींच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन 9 जानेवारी रोजी सकाळी 09.30 वाजता अंबाजोगाई शहरातील योगेश्वरी शिक्षण संस्थेचे भव्य मैदानावर पथसंचलनाने होणार असून यावेळेस बीडचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, बीड जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अजित पवार, बीड जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी वासुदेव साळुंके, बीड जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी शिवप्रसाद जटाळे, जिल्हा क्रीडा अधिकारी सुहासिनी देशमुख, जिल्हा समाज कल्याण अधिकारी रवींद्र शिंदे, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता अंकुश नखाते, सौ.सुमतीबाई गुणाले शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव संयोजक दिनकर गुणाले या मान्यवरांसह इतरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. 9 जानेवारी रोजी सायं 6.30 वाजता सौभाग्य मंगल कार्यालय अंबाजोगाई येथे सांस्कृतिक समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचा समारोप 10 जानेवारी रोजी दुपारी 3.30 वाजता पारीतोषिक वितरण समारंभाने होईल. बक्षीस वितरण व समारोप समारंभासाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनील यादव, अतिरिक्त पोलीस अधीक्षक कविता नेरकर मॅडम, उपजिल्हाधिकारी शरद झाडके, गटविकास अधिकारी समृद्धी दिवाणे, तहसीलदार बिपिन पाटील, स्वाराती शासकीय रूग्णालय व महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.भास्कर खैरे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अशोक साबळे, पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, गटशिक्षणाधिकारी शेख चाँद, योगेश्वरी शिक्षण संस्थेचे सचिव गणपत व्यास आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. याबाबत आमच्या प्रतिनिधीशी बोलताना स्पर्धेचे संयोजक रवींद्र शिंदे (जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, बीड) आणि सौ.सुमतीबाई गुणाले शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव दिनकर गुणाले यांनी दिलेली माहिती अशी की, दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या आदेशानुसार शासकीय, अनुदानित, विना अनुदानित व कायमस्वरूपी विना अनुदानित दिव्यांगांच्या विशेष शाळा/ कर्मशाळांमधील दिव्यांग विद्यार्थी व प्रशिक्षणार्थी यांच्यातील क्रिडा, कलागुणांना वाव मिळावा व त्यांना खेळात सहभाग घेण्याची संधी मिळावी, या विधायक उद्देशाने दरवर्षी दिव्यांग मुला-मुलींच्या जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धेचे आयोजन संदर्भांकित शासन निर्णयान्वये करण्यात येते. सदर जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धा मधील मुला – मुलींचे खेळ प्रकार. वयोगट इत्यादीबाबत तपशील असा की, (अ) सदर जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धामध्ये वरील नियमावलीचा अवलंब करून दिव्यांगाच्या प्रवर्गानुसार (१) मुकबधीर मुले-मुली, (२) मतिमंद मुले – मुली, (३) पुर्णत: अंध व अंशतः अंध मुले – मुली, (४) अस्थिव्यंग मुले – मुली, अशा चार प्रवर्गासाठी त्यांच्या वयोगटानुसार मुला – मुलींकरिता स्वतंत्र जिल्हास्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात येतात. सदर जिल्हास्तरीय स्पर्धामध्ये धावणे, लांब उडी, गोळाफेक, साॅफ्ट बाॅल थ्रो, स्पाॅट जंप, पळत येवून लांब उडी, बुध्दीबळ, पासिंग दि बाॅल, भरभर चालणे, बादलीत बाॅल टाकणे, व्हीलचेअर रेस आणि व्हीलचेअर वर बसून – गोळाफेक, साॅफ्ट बाॅल थ्रो या विविध स्पर्धांचा समावेश आहे. सदरील जिल्हास्तरीय स्पर्धा मध्ये प्रथम विद्यार्थी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र राहील असे प्रसिद्ध पत्रकात नमूद करण्यात आले.

================

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.