अंबाजोगाईकरांसाठी ‘हास्यमुद्रा’ कार्यक्रम ठरला आनंदी जीवनाची गुरूकिल्ली
शिबानी जोशी व अनिल हर्डीकर यांनी रसिक - श्रोत्यांना खळखळून हसवले..!

वैभवशाली महाराष्ट्र न्युज
दीनदयाळ बँकेची युगपुरूष स्वामी विवेकानंद व्याख्यानमाला
================
अंबाजोगाई (वार्ताहर)
मागील २६ वर्षांपासून “विश्वास,विकास आणि विनम्रता” या त्रिसुत्रीने आर्थिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या दीनदयाळ नागरी सहकारी बँकेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही १० ते १२ जानेवारी २०२३ या कालावधीत दररोज सायंकाळी साडेसहा या वेळेत युगपुरूष स्वामी विवेकानंद यांच्या १६० व्या जयंतीनिमित्त व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रथम पुष्प गुंफताना शिबानी जोशी व अनिल हर्डीकर यांनी अंबाजोगाईकरांना खळखळून हसवले..! तर बँकेचे सभासद, ठेवीदार आणि ग्राहक असलेल्या अंबाजोगाईकरांसाठी माञ ‘हास्यमुद्रा’ हा कार्यक्रम एक प्रकारे आनंदी जीवनाची गुरूकिल्लीच ठरला असल्याच्या बोलक्या प्रतिक्रिया यावेळेस उपस्थित रसिक – श्रोत्यांकडून ऐकावयास मिळाल्या.
प्रमुख व्याख्याते आणि हास्य कलावंत शिबानी जोशी व अनिल हर्डीकर (मुंबई) यांनी “हास्यमुद्रा” या विषयावर प्रथम पुष्प गुंफताना रामायण काळाचा संदर्भ देत तब्बल दोन तास उपस्थित रसिक श्रोत्यांना खळखळून हसवले. जीवनातले नर्मविनोदी बारकावे टिपत, किस्से, गोष्टी, प्रसंग सांगून हसणं हा माणसाचा खरा गुणधर्म असल्याचे जोशी यांनी नमूद केले, तर अनिल हर्डीकर यांनी जीवनाकडे हलक्या – फुलक्या नजरेने कसे पहावे, दिवसभरात अर्धा तास तरी मनमुराद हसावे, जो हसतो तो माणूस असतो, आज माणूस हसणे विसरत चालला आहे, हसण्याचे मानवी आयुष्यातील फायदे, विनोदाचे महत्त्व पटवून दिले. प्राचीन, अर्वाचीन, स्वातंत्र्यपूर्व ते स्वातंत्र्योत्तर काळातील विनोदावर त्यांनी भाष्य केले. ब्रिटिश लेखक तसेच श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, चिं.वि.जोशी, राम गणेश गडकरी, महात्मा गांधी, जयवंत दळवी, आचार्य अञे, पु.ल.देशपांडे, रामदास फुटाणे महेश केळुसकर यांचे सहीत विविध क्षेत्रातील विडंबन काव्य, किस्से आणि कोट्या सांगून उपस्थित रसिक-श्रोते यांचा आनंद द्विगुणित केला. व्यक्तिनिष्ठ, प्रसंगनिष्ठ विनोद, विडंबन आणि अतिशयोक्तीपूर्ण कोट्या करून अंबाजोगाईकरांची उत्स्फूर्त दाद मिळविली. आनंददायी समाज निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्न करूयात असे आवाहन शिबानी जोशी व अनिल हर्डीकर (मुंबई) यांनी केले. ते दीनदयाळ बँकेतर्फे आयोजित युगपुरूष स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेतील प्रथमपुष्प गुंफताना बोलत होते. यावेळी व्यासपीठावर बँकेचे अध्यक्ष एॅड.मकरंद पत्की, उपाध्यक्ष एॅड.राजेश्वर देशमुख, संचालिका सौ.शरयुताई शरदराव हेबाळकर, बँकेचे संचालक मकरंद सोनेसांगवीकर हे उपस्थित होते. तर या प्रसंगी भरतमुनी खुले सभागृहात बँकेचे संचालक सर्वश्री इंजि.बिपीन क्षीरसागर, प्रा.अशोक लोमटे, प्राचार्य किशन पवार आदींसह आजी – माजी संचालक, सभासद, ठेवीदार व ग्राहक उपस्थित होते. प्रारंभी प्रास्ताविक करताना बँकेचे अध्यक्ष एॅड.मकरंद पत्की यांनी सांगितले की, आर्थिक क्षेत्रात काम करताना सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून समाजाचे आपण काही देणे लागतो. या जाणिवेने अंबाजोगाईकरांना मागील २० वर्षांपासून व्याख्यानमालेच्या माध्यमातून वैचारिक मेजवानी देण्याचे काम दीनदयाळ नागरी सहकारी बँक अव्याहतपणे करीत आहे. या अनोख्या उपक्रमाचे हे २१ वे वर्ष आहे. विविध क्षेञातील राज्यातील व राज्याबाहेरील तज्ञ व नामवंत व्यक्तींनी या व्याख्यानमालेत वेळोवेळी आपले अनमोल विचार मांडलेले आहेत.अशी माहिती देवून बँकेचे अध्यक्ष एॅड.पत्की यांनी यावेळी दीनदयाळ नागरी सहकारी बँकेच्या वतीने युपीआय सेवा, काळासोबत वाटचाल, बँकींग सेवा अत्याधुनिक ठेवणे, ग्राहक हिताकरीता नवनवे बदल, तंञज्ञान स्विकारून दर्जेदार बँकिंग सेवा व सुविधा पुरविण्याचे काम बँक करते. दीनदयाळ बँकेच्या खात्यावरून इतर कोणत्याही बँकेच्या खात्यावर आता सहजपणे पैसे पाठवता येतात. आरबीआयच्या नियमांनूसारच बँक काम करते. कर्जदार, ठेवीदार यांच्या हितांचे रक्षण बँक करते, बँकेविषयी सहकार्याची भावना ठेवावी. वेळोवेळी आपल्या मौलिक सुचना करून बँकेच्या उत्कर्षासाठी सहभाग घ्यावा. कारण, आपल्या प्रतिसादावरच बँकेचे यश हे अवलंबून आहे असे बँकेचे अध्यक्ष एॅड.मकरंद पत्की यांनी सांगितले. प्रारंभी मान्यवरांनी दीपप्रज्ज्वलन तथा भारतमाता, पंडीत दीनदयाळजी उपाध्याय आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे पुजन केले. त्यानंतर कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचालन संचालक प्रा.जयकरण सुरेशकांबळे यांनी केले, तर करून बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी सनतकुमार बनवसकर यांनी नेमक्या शब्दांत प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रतिक्षा जोशी यांनी वैयक्तिक पद्य सादर केले. त्यांना जयेंद्र कुलकर्णी यांनी साथसंगत केली. उपस्थितांचे आभार ओंकार कुलकर्णी यांनी मानले. याप्रसंगी बँकेच्या वतीने महिलांकरीता विशेष आकर्षक ठेव पर्वकाळ मकरसंक्रांत ते रथसप्तमी या कालावधीत “मकरसंक्रमण ठेव योजना (व्याजदर द.सा.द.शे.८.२५ टक्के)” जाहीर करण्यात आली. याचा १३ महीन्यांकरीता ठेव संकलन कालावधी हा (१० जानेवारी २०२३ ते ३१ जानेवारी २०२३) असा आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन दीनदयाळ नागरी सहकारी बँकेच्या वतीने करण्यात येत आहे. यावेळेस बँकेचे सभासद, ग्राहक, ठेवीदार, हितचिंतक व विविध क्षेञातील मान्यवर, बंधू-भगिणी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी दीनदयाळ बँकेचे सर्व अधिकारी, कर्मचारीवृंद यांनी परीश्रम घेतले. शांतीमंत्र पठणाने कार्यक्रमाची सांगता झाली.