जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धेचा समारोप : विजेते 84 दिव्यांग विद्यार्थी करणार राज्य पातळीवर बीड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व
सांस्कृतिक कार्यक्रमातून दिव्यांग विद्यार्थ्यांचे दमदार सादरीकरण - समाजकल्याण अधिकारी रवींद्र शिंदे

क्रीडा स्पर्धेत दिवैव्यांग विद्यार्थ्यांकडून विशेष कामगिरी अंबाजोगाई (प्रतिनिधी)
जिल्हा समाज कल्याण कार्यालय, जिल्हा परिषद, बीड आणि सौ.सुमतीबाई गुणाले शिक्षण प्रसारक मंडळ, धानोरा (ता.अंबाजोगाई) यांच्या संयुक्त विद्यमाने बीड जिल्ह्यातील दिव्यांगांच्या विशेष शाळा / कार्यशाळेतील मुला – मुलींच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन 9 व 10 जानेवारी 2023 रोजी अंबाजोगाईत करण्यात आले होते. या स्पर्धेचा समारोप मंगळवारी झाला. या स्पर्धेत 44 शाळांमधील 450 दिव्यांग विद्यार्थी व विद्यार्थीनी सहभागी झाले होते. यातील विजेते 84 दिव्यांग विद्यार्थी हे बालेवाडी (जि.पुणे) येथे होणाऱ्या राज्य पातळीवरील स्पर्धेत आता बीड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार असल्याची माहिती स्पर्धेचे संयोजक रवींद्र शिंदे (जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद,बीड) वैसाका अंकुश नखाते आणि सौ.सुमतीबाई गुणाले शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव दिनकर गुणाले यांनी दिली आहे.
दिव्यांग शाळेतील मुला – मुलींच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचा समारोप मंगळवार, दिनांक 10 जानेवारी रोजी दुपारी 4 वाजता अंबाजोगाई शहरातील योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या भव्य मैदानावर पारीतोषिक वितरणाने झाला. तत्पूर्वी सोमवारी राञी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात दिव्यांग विद्यार्थ्यांनी अतिशय शिस्तबद्ध व बहारदार पद्धतीने शानदार सादरीकरण केले. समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा समाजकल्याण अधिकारी रवींद्र शिंदे हे होते, या प्रसंगी व्यासपीठावर गटविकास अधिकारी सौ. समृद्धी दिवाने, स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. विश्वजीत पवार, योगेश्वरी शिक्षण संस्थेचे संचालक प्रा. माणिकराव लोमटे, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता अंकुश नखाते, सहाय्यक सल्लागार रितेश गाडे, शासकीय आश्रमशाळेच्या अधिक्षक अस्मिता जावळे, सहाय्यक लेखाधिकारी सातपुते साहेब, सौ.सुमतीबाई गुणाले शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव संयोजक दिनकर गुणाले, बाबासाहेब परांजपे प्रतिष्ठानचे सचिव संभाजीराव लांडे, आयुर्मंगलम निवासी मूकबधिर विद्यालयाचे प्राचार्य लक्ष्मीकांत ऊर्फ अलोक कुलकर्णी, मुख्याध्यापक कराड या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळेस मान्यवरांकडून विजेत्या संघांना पारीतोषिके देण्यात आली. तत्पूर्वी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना डॉ.विश्वजीत पवार म्हणाले की, दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सहभागाने आपला ही उत्साह वाढला आहे. खरोखरच दिव्यांग मुले ही गुणांची खाण आहेत, त्यामुळेच तर ती विशेष आहेत. सध्या समाजात कुणी तरी दुसरे आपले कौतुक करेल अशी परिस्थिती नाही, तेव्हा अशा काळात आपणच आपले मनोबल वाढवा, शारिरीक दुर्बलतेवर मात करून आयुष्यात पुढे जा असे प्रतिपादन डाॅ.पवार यांनी केले. वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता अंकुश नखाते यांनी दिव्यांग निधीतून विजेत्यांना राज्यपातळीवर प्रतिनिधित्व करण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य मिळवून देण्याची ग्वाही दिली. योगेश्वरी शिक्षण संस्थेचे संचालक प्रा.माणिकराव लोमटे यांनी जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धेचे उत्कृष्ट आयोजन व नियोजन केल्याबद्दल संयोजकांचे अभिनंदन केले. गटविकास अधिकारी सौ.समृध्दी दिवाणे यांनी जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत विशेष कामगिरी करणाऱ्या दिव्यांग विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या राज्य पातळीवरील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय समारोप करताना जिल्हा समाजकल्याण अधिकारी रवींद्र शिंदे म्हणाले की, शासनाच्या दिव्यांग विभागाकडून चांगले काम करण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत, स्पर्धेचे उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल त्यांनी संयोजन समितीचे कौतुक केले, या स्पर्धेत 44 शाळांमधील 450 दिव्यांग विद्यार्थी व विद्यार्थीनी सहभागी झाले होते. यातील विजेते 84 दिव्यांग विद्यार्थी हे बालेवाडी (जि.पुणे) येथे होणाऱ्या राज्य पातळीवरील स्पर्धेत आता बीड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार असल्याची माहिती देवून स्पर्धेचे संयोजक तथा जिल्हा समाजकल्याण अधिकारी रवींद्र शिंदे यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन द्रौपदी सूर्यवंशी मॅडम व मानवविकास मूकबधीर विद्यालयाचे मुख्याध्यापक आनंद टाकळकर यांनी केले, तर उपस्थित सर्वांचे आभार स्पर्धेचे संयोजक व सौ.सुमतीबाई गुणाले शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव दिनकर गुणाले यांनी मानले. दिव्यांगाच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्व मुख्याध्यापकांनी, कर्मचाऱ्यांनी तसेच संयोजन समितीच्या सर्व सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले.
*दिव्यांग क्रीडा स्पर्धेतील विजेते संघ :*
================
सर्वसाधारण विजेतेपद पटकावणारे संघ पुढीलप्रमाणे 1) प्रज्ञाचक्षू अंध विद्यालय,बीड – प्रथम (अंध प्रवर्ग), 2) अस्थिव्यंग निवासी विद्यालय,नेकनूर – प्रथम (अस्थिव्यंग प्रवर्ग), 3) मतिमंद निवासी विद्यालय, उमरी,ता.केज – प्रथम (मतिमंद प्रवर्ग) आणि 4) मानवविकास मूकबधीर विद्यालय, अंबाजोगाई – प्रथम (मूकबधीर प्रवर्ग) हे विजेते ठरले. या सोबतच सांस्कृतिक स्पर्धेतील समूहनृत्य, अभिनयात अंध, अस्थिव्यंग, मतिमंद आणि मूकबधीर प्रवर्गातील विजेत्यांना ही मान्यवरांकडून वैयक्तिक पारीतोषिके देण्यात आली. जिल्हास्तरीय दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धेत जिल्ह्यातील सर्व दिव्यांगांच्या शाळांचे मुख्याध्यापक विशेष शिक्षक क्रीडा शिक्षक व दिव्यांग विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रवर्गानुसार स्पर्धा :
================
जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धामध्ये शासन निर्देश व नियमावलीचा अवलंब करून दिव्यांगाच्या प्रवर्गानुसार (१) मुकबधीर मुले – मुली, (२) मतिमंद मुले – मुली, (३) पुर्णत: अंध व अंशतः अंध मुले – मुली, (४) अस्थिव्यंग मुले – मुली, अशा चार प्रवर्गासाठी त्यांच्या वयोगटानुसार मुला – मुलींकरिता स्वतंत्र जिल्हास्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात येतात. सदर जिल्हास्तरीय स्पर्धामध्ये धावणे, लांब उडी, गोळाफेक, साॅफ्ट बाॅल थ्रो, स्पाॅट जंप, पळत येवून लांब उडी, बुध्दीबळ, पासिंग दि बाॅल, भरभर चालणे, बादलीत बाॅल टाकणे, व्हीलचेअर रेस आणि व्हीलचेअर वर बसून – गोळाफेक, साॅफ्ट बाॅल थ्रो या विविध 84 क्रीडा प्रकारातील स्पर्धांचा त्यांच्या प्रवर्ग आणि वयोगटानुसार समावेश होता.