खोलेश्वर प्राथमिक विद्यालयाच्या प्रगती विभागाने स्नेहसंमेलनात साकारली शिवनेरी किल्ल्याची प्रतिकृती
भारतवर्ष की, शौर्यगाथा साजरी करून विद्यार्थी आनंदले

वैभवशाली महाराष्ट्र न्युज
सांस्कृतिक वारसा
================
अंबाजोगाई (वार्ताहर)
शहरातील खोलेश्वर प्राथमिक विद्यालयाच्या प्रगती विभागाने स्नेहसंमेलनात शिवनेरी किल्ल्याची प्रतिकृती साकारली, तसेच भारतवर्ष की, शौर्यगाथा साजरी करून विद्यार्थी आनंदल्याचे सुखद चिञ पहावयास मिळाले.
रविवार, दिनांक 8 जानेवारी 2023 रोजी
खोलेश्वर प्राथमिक विद्यालय, प्रगती विभाग येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य स्वरूपात स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. “देशभक्ती, भारतीयत्व व संस्कृती संस्कार” या ध्येयांशी एकरूप झालेली भारतीय शिक्षण प्रसारक संस्था आणि या संस्थेच्या श्री खोलेश्वर प्राथमिक विद्यालय प्रगती विभागाचे अभिव्यक्ती सादरीकरण अगदी तसेच ध्येयाशी एकरूप झालेले अनुभवयास मिळाले. अशा उपक्रमातून राष्ट्रभक्त समाजाची निर्मिती होत असल्याची प्रचिती प्रचंड संख्येने उपस्थित असलेल्या पालकवर्ग तसेच प्रेक्षकांना ही आली. वेगवेगळ्या गीतातून समाज पुरूषांचे दर्शन झाले, हे संमेलन खरोखरच समाजातील इतर शाळांनी अनुकरण करण्याजोगे वाटले. प्रवेशद्वारापासूनच वीर रसाची निर्मिती होत होती. बालचमुंनी मावळ्यांच्या वेशात ढोल ताशांच्या गजरात केलेले स्वागत आणि त्यानंतरची अतिशय शौर्यदायी रांगोळी रेखाटन, ज्यामध्ये “राजे” वाचून मनात छञपती शिवाजी महाराजांना प्रणाम करूनच आपण पुढे प्रवेश करतो, त्यापुढे तोफेच्या सलामीने केले पाहुण्यांचे स्वागत, नंतर प्रत्येक शिक्षकांच्या हातातून मशालीचे हस्तांतरण झाल्यानंतर मशाल प्रज्ज्वलन करून केलेले उद्घाटन खूप तेजस्वी भाव जागृत करून गेले. किल्ल्याच्या प्रवेशद्वारातून प्रवेश करून आपण भव्य दिव्य अशा गडावर प्रवेश करीत आहोत की काय अगदी अशीच काहीशी भावना प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली होती. अतिशय उत्कृष्ट आणि माता पालकांचा उत्स्फूर्त सहभाग वाढवणारी सचिञ प्रदर्शनी, त्यानंतर दिवसभराच्या कार्यक्रमाची सुरूवातच अत्यंत छोट्या बालविरेने गायिलेल्या पोवाड्याने झाली व तो शौर्य आसमंतात रस मिसळून गेला. पुजनीय स्वामी रामानंद तीर्थ यांच्या आदरणीय पुतणी डॉ.मंदाताई यांचा झालेला हृद्य सत्कार, तो ही मराठवाडा मुक्ती संग्रामाची आठवण करून देणारा होता. छोट्या मुलीने गीतेचे अतिशय स्पष्ट उच्चारात पठण केले. व अतिशय लहान वयापासून जे भारतीय संस्कार आपण देण्याचा प्रयत्न करतो त्याची प्रचिती पाहुण्यांना येत गेली. नंतर शौर्याची पदोपदी जाणीव देणारी अप्रतिम प्रात्यक्षिके होत गेली, प्रत्येक गोष्टीच्या मागे एक जाज्वल्य विचार जाणवत होता, प्रत्येक कृतीच्या मागे सुक्ष्म नियोजन दिसत होते. तोच शौर्य रस संध्याकाळच्या कार्यक्रमात ही सर्व सांस्कृतिक कार्यक्रमातून एका असिम अशा उंचीवर गेला. समोर उभे असलेले विविध राष्ट्रनेते यांच्या वेशभूषेतील बालक, सर्वच काही भव्य दिव्य दिमाखदार होते. कार्यक्रमासाठी शिवनेरी किल्ल्याचा भव्य देखावा (प्रतिकृती) तयार करण्यात आला होता. बालकांमध्ये विविध प्रकारचे चांगले संस्कार घडतात. स्नेहसंमेलनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण त्या सशक्त संकल्पनेला आधारित गीत व त्याला अनुरूप नृत्य होते. या कार्यक्रमासाठी भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुरेंद्र अलुरकर, कार्यवाह डॉ.हेमंत वैद्य, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी प्रा.चंद्रकांत मुळे,
विद्यासभा उपाध्यक्ष तथा केंद्रीय शिक्षक प्रतिनिधी उमेश जगताप, केंद्रीय कार्यकारिणी सदस्या
डॉ.सौ.कल्पनाताई चौसाळकर, केंद्रिय कार्यकारिणी सदस्य रामभाऊ कुलकर्णी, अविनाश तळणीकर, श्री खोलेश्वर शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष विजय वालवडकर, कार्यवाह इंजि.बिपिन क्षीरसागर,श्री खोलेश्वर प्राथमिक विद्यालय शालेय समितीचे अध्यक्ष उन्मेशजी मातेकर, शाळेचे मुख्याध्यापक आप्पाराव यादव तसेच प्रगती विभागाच्या विभागप्रमुख सौ.वर्षाताई मुंडे आणि सर्व शिक्षक बंधू व भगिनी, पालकवर्ग हे उपस्थित होते.