भगवान महावीर जयंतीनिमित्त अंबाजोगाईत रक्तदान शिबीर, शोभायात्रा, जन्म कल्याणक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
मंगळवार, दिनांक 4 एप्रिल रोजी विशेष समारंभात होणार 'सम्यक सन्मान'चे वितरण

अंबाजोगाई (प्रतिनिधी)
संपूर्ण जगाला ‘अहिंसा’ तसेच ‘जगा आणि जगू द्या’ हा महान संदेश देणाऱ्या भगवान महावीरांची जयंती अंबाजोगाई शहरात प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. या निमित्ताने भव्य रक्तदान शिबीर, शोभायात्रा, जन्म कल्याणक, सांस्कृतिक कार्यक्रम या विविध उपक्रमांसह ‘सम्यक सन्मान’ वितरण समारंभाचे आयोजन मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले आहे.
‘सम्यक सन्मान’ वितरण समारंभाचे आयोजन मंगळवार, दिनांक 4 एप्रिल 2023 रोजी सकाळी 11 वाजता अंबाजोगाई शहरातील विमलनाथ सभागृह, जैन मंदिर, जैन गल्ली येथे संपन्न होणार आहे. यावर्षी पासून भगवान महावीर जयंतीनिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा यथोचित गौरव ‘सम्यक सन्मान’ देऊन करण्यात येणार आहे. यामध्ये सामाजिक क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल बीड येथील ‘इन्फंट इंडिया’ या संस्थेचे प्रमुख दत्ता मामा बारगजे, कृषि क्षेत्रातील प्रयोगशील कार्यासाठी डिघोळअंबा येथील प्रगतिशील शेतकरी विद्याताई रूद्राक्ष यांना आणि शिक्षण क्षेत्रातील उपक्रमशील कार्यासाठी वेरूळ येथील गुरूकूलचे गुलाबचंद बोराळकर या सर्व मान्यवरांना आमदार सौ.नमिताताई मुंदडा यांच्या हस्ते ‘सम्यक सन्मान’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बीड विभागाचे धर्मादाय उप आयुक्त महावीर जोगी हे असणार आहेत. तर या प्रसंगी अंबाजोगाई येथील अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर पवार या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. तरी सर्व अंबाजोगाईकरांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन सकल जैन समाज, भगवान महावीर जयंती महोत्सव समिती, अंबाजोगाई यांच्या वतीने करण्यात येत आहे.