
वैभवशाली महाराष्ट्र न्यूज / कृषी विशेष
बातमी संकलन (पत्रकार -बळीराम लोकरे)
माळेगाव:केज तालुक्यातील माळेगाव परिसरात सध्या ऊस तोडणीची लगबग (हंगाम २०२३-२४ )सुरू आहे.या वर्षी पावसाचे प्रमाण अतिशय झाले.तसेच हुमणी,मर,काणी इत्यादी कीड रोगांचा प्रादुर्भाव झाल्याकारणाने ऊसाची वाढच होऊ शकली नाही.परिणामी गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी एकरी ५० टक्के इतकी ऊस उत्पादनात घट झाली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला असून पिकांच्या सततच्या नुकसानीमुळे शेतकरी हतबल झाले आहेत.
ऊस हे नगदी आणि भरवासाचे पीक म्हणून ओळखले जाते.मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असल्याने गेल्या वर्षी शेतकरी ऊस लागवडीकडे वळला मात्र इथेही संकटं शेतकऱ्यांची पाठ सोडत नाहीत. कधी पावसाचा खंड, पावसाचे असमान वितरण ,सतत वातावरणातील बदलामुळे यावर्षी उसाच्या वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले नाही. याशिवाय हुमणी आळी चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाल्याने ऊसाची वाढ खुंटली.त्यात आणखी भर म्हणजे रानडुकरांचा नेहमीचा उच्छाद राहिला तसेच बोर विहिरीच्या पाण्याने सुद्धा तळ गाटला.आणि सध्या पाहिजे तेवढी पाण्याची उपब्धता नसल्याने पाण्याअभावी ऊस वाळून जात आहे. अशा अनेक प्रकारच्या संकटांची मालिका निर्माण झाल्याने यावर्षी उसाच्या उत्पादनात ५० इतकी मोठी घट होत आहे. दरवर्षी सातत्याने उत्पन्नात होणारी घट शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी आहे.
घटत्या उत्पादनात ऊस दराचा आधार?
केज कळंब तालुक्यात उसाचे क्षेत्र पुरेसे असले तरी अत्यल्प पावसामुळे अपेक्षित वाढ झाली नाही.मात्र विभागातील सर्व कारखाने सुरू झाल्याने त्यांना उसाची कमतरता भासणार आहे.यावर्षी गाळप हंगाम केवळ तीन महिने चालेल असा अंदाज वर्तविला जात आहे.त्यामुळे इतर कारखान्यापेक्षा आम्ही ज्यादा ऊसदर देण्याचे आश्वासन देऊन आपल्या कारखान्याकला जास्तीत जास्त ऊस गाळप करण्याचा प्रकार दिसून येत आहे.यंदा खरीप पिके गेली तर रब्बी हंगामही अधांतरी आहे. अशा दुष्काळ सदृश्य परिस्थितीत साखर कारखाने चांगला ऊस दर देऊन शेतकऱ्यांना आधार देणार का? याकडे लक्ष लागले आहे.
शेतकरी म्हणतात
“यंदा कमी पाऊस पडला त्यामुळे ऊसाची वाढ झाली नाही. आता पाण्याअभावी ऊस वाळून जात असल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी उत्पादनात निम्म्याने घट झाली आहे.गेल्या वर्षी खोडवा उसाला एकरी ४४ टनाचा उतारा आला होता. यावर्षी तो २२ टनावर येऊन ठेपला आहे. आता साखर कारखान्यांनी चांगला ऊस दर द्यावा व उत्पन्नतील तूट कमी करावी ” ऊस उत्पादक शेतकरी,माळेगाव