आपला जिल्हावैभवशाली महाराष्ट्र न्युजसामाजिक

कौतुक सोहळा: नक्षत्रा महिला गटाद्वारे ग्रामीण महिलांना रोजगार

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज विशेष

 

केज(माळेगाव/प्रतिनिधी): नक्षत्रा महिला गटाच्या माध्यमातून खोलेश्वर महाविद्यालय अंबाजोगाई येथे बुधवार दि २२ रोजी ग्रामीण महिला उद्योजिका कौतुक सोहळा संपन्न झाला. यावेळी मंचावर डॉ. उपेंद्र कुलकर्णी (प्रकल्प प्रमुख, दीनदयाल शोध संस्थान बीड), अक्षय मुंदडा (सामाजिक कार्यकर्ते अंबाजोगाई), समृद्धी दिवाने-काळे (गट विकास अधिकारी, अंबाजोगाई), संध्या कुलकर्णी (सामाजिक कार्यकर्त्या छ. संभाजीनगर) व सनतकुमार बनवसकर (मुख्य कार्यकारी अधिकारी, दीनदयाळ नागरी सहकारी बँक अंबाजोगाई) यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना नक्षत्रा महिला गटाच्या अध्यक्षा उमा दीक्षित यांनी सांगितले कि, वर्ष २०२३ ‘अंतरराष्ट्रीय भरडधन्य वर्ष’ म्हणून साजरे होत आहे. दीनदयाल शोध संस्थान कृषि विज्ञान केंद्रामार्फत ज्वारी व बाजरी मूल्यवर्धित उत्पादने, शेवगा पावडर, दिवाळीसाठी गोमय पणत्या तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते. ग्रामीण महिला कामात कुशल आणि खूप मेहनती असून त्यांनी केलेल्या उत्पादनामध्ये चांगल्या गुणवत्तेसोबतच भारतीय संस्कृतीची झलक दिसून येते. नक्षत्रा महिला गटातील सदस्यांनी दिवाळीनिमित्य भरडधान्याचे मूल्यवर्धित पदार्थ (ज्वारी-शेव, बाजरी-कापण्या, मिलेट-मिक्स, खारवड्या) व ज्यूट बॅग तयार करून ‘दीपावली गिफ्ट कीट’ उत्पादित केल्या. पुणे, परभणी, संभाजीनगर, बेंगलोर, अंबाजोगाई व मुंबई येथे ५०० कीटची विक्री करण्यात आली. विक्रीतून महिलांना आर्थिक मिळकत प्राप्त झाली. ६ गावातील ४० महिलांना १० दिवसात १७५००० रुपये विक्रीतून मिळाले. गटातील सदस्य महिलांचा पुढील कार्यासाठी उत्साह वाढावा यासाठी कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला असल्याचे सांगितले. यावेळी विक्री रकमेचे धनादेश वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

अक्षय मुंदडा यांनी संबोधित करताना सांगितले कि, महिला गटाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर पदार्थाचे उत्पादन करून मोठी बाजारपेठ मिळू शकते. यासारखे अभिनव प्रयोग दरवर्षी करण्यात यावेत असे आवाहन त्यांनी केले. समृद्धी दिवाने-काळे यांनी मार्गदर्शन करताना महिला गटासाठी उपलब्ध असलेल्या शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. संध्या कुलकर्णी यांनी ‘एक गाव एक पदार्थ’ संकल्पना समोर ठेवून पदार्थ तयार करण्याचे आव्हान महिलांना केले. गटाला बाजारपेठ प्राप्तीसाठी भविष्यातही मदत करण्याचे आश्वासन दिले.

अध्यक्षीय समारोप करतांना डॉ. कुलकर्णी म्हणाले कि, ‘दीपावली गिफ्ट कीट’ उत्पादन करण्यापासून ते बाजारपेठ उपलब्ध होण्यापर्यंत जे काही चांगले-वाईट अनुभव आले त्याची नोंद करावी व आलेल्या अडचणीवर भविष्यात मार्ग शोधून सतत प्रगतशील होत राहावे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुनम पत्की (सदस्या, नक्षत्रा महिला गट) व आभार प्रदर्शन रोहिणी भरड (शास्त्रज्ञ कृषि विज्ञान केंद्र अंबाजोगाई) यांनी केले. कार्यक्रमाला नक्षत्रा महिला गटाच्या इतर सदस्या डॉ. अनघा पाठक, प्रतिभा देवळे, विजयश्री शेवतेकर व लक्ष्मी बोरा या उपस्थित होत्या.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.