विजेचा लपंडाव;आठ गावातील शेतकरी त्रस्त

माळेगाव /प्रतिनिधी
शेतकरी नेहमीच पावसाचा खंड, अतिवृष्टी, दुष्काळ, प्रतिकूल वातावरण, बाजार भाव,महागाई आशा कोणत्या ना कोणत्या संकटाशी सामना करत असतो. त्यात आणखी भर म्हणून वीज संकटाचा सामना शेतकऱ्यांना व वीज ग्राहकांना करावा लागत आहे.
केज तालुक्यातील माळेगाव,सुकळी, गोटेगाव, सुर्डी,सोनेसांगवी,मांगवडगाव,लाखा,सातेफळ या गावांना ३३/११केव्ही माळेगाव सप्टेशन वरून वीज पुरवठा होतो. मात्र ठरवून दिलेल्या वेळेतही काही दिवसापासून घरगुती व शेतीपंपांचा वीज पुरवठा अचानक तासान तास खंडित होत आहे.त्यामुळे शेतकरी व वीज ग्राहक त्रस्त आहेत.
सध्या पाणीसाठा मुबलक प्रमाणावर उपलब्ध आहे. उन्हाचा पारा वाढल्याने पिकांना पाण्याची जास्त गरज असते. मात्र लाईट अभावी पिकांना पाणी देता येत नसल्यामुळे भाजीपाला,ऊस,फळबागा पिके पाण्याअभावी सुकू लागले असून पिकांचे नुकसान होत आहे.अखंडितपणे वीज पुरवठा होत नसल्याने उन्हाळ्यात पिके जगवायची कशी असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.सध्या माळेगाव परिसरात लोडशेडिंगचि वेळ सोडूनही दिवस-रात्री केव्हाही अचानक वीज गायब होत असल्याने विजेचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे शेतकरी हातबल झाले असून महावितरणच्या कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे. लाईटच्या प्रश्नाकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे.ठरवून दिलेल्या वेळेत नियमितपणे रोज आठ तास वीज पुरवठा अखंडपणे व उच्चदाबाने सुरुळीत करावा.अन्यथा महावितरण कार्यालयासमोर बोंब मारो आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी महावितरण युसुफवडगाव शाखेचे सहाय्यक अभियंता जाधव यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले की,सध्या विजेची मागणी वाढली आहे त्यामुळे ओव्हरलोड होऊन वीजपुरवठा खंडीत होतो आहे. माळेगाव सप्टेशन साठी आणखी एक पाच एचपी ट्रान्सफॉर्मर चि आवश्यकता असून त्याची मागणी केलेली आहे.तोपर्यंत यापुढे एक दिवसाआड शेती शेतीपंपांना वीज पुरवठा करण्यात येईल.
” माझा चार एकर ऊस आहे.कडक उन्हाळा सुरू असल्याने त्याला पाणी देणे गरजेचे आहे. पण त्यासाठी लाईटच टिकत नाही. कधी जाईल याचा भरवसा देता येत नाही. आठ दिवस झाले तरी एक एकर ऊस भिजतो आहे.रात्री जागरण करूनही भिजन पूर्ण होत नसल्याने परेशान आहे.”दत्ता गिरी, शेतकरी सुकळी
बातमी संकलन पत्रकार बळीराम लोकरे