लोखंडी सावरगाव – माळेगाव रस्त्यासाठी २७ कोटींचा निधी मंजूर
पालखी मार्गाची दैना फिटणार; लोकप्रिय आमदार नमिताताई अक्षय मुंदडा यांच्या प्रयत्नांना यश

केज प्रतिनिधी
अंबाजोगाई – अंबाजोगाई ते कळंब मार्गावरील लोखंडी सावरगाव – माळेगाव या रस्त्याच्या कामासाठी राज्य शासनाने २७ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. आ. नमिता मुंदडा यांनी या रस्त्याच्या कामासाठी शासनदरबारी अथक पाठपुरावा सुरु ठेवला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून मागील अनेक वर्षापासून खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळणी झालेल्या या पालखी मार्गाची दैना लवकरच फिटणार आहे.
अंबाजोगाई ते कळंब हा प्रचंड रहदारीचा रस्ता आहे.पंढरपूरला जाणाऱ्या पालख्या या मार्गे जात असल्याने पालखी मार्ग म्हणूनहि हा रस्ता ओळखला जातो. मात्र मागील काही वर्षात खड्डे पडून हा रस्ता पूर्णपणे उखडला गेला होता. त्यामुळे या मार्गावरील ग्रामस्थांना, प्रवाशांना, विद्यार्थ्यांना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागले. अपघात, वाहने खिळखिळे होणे नित्याचे झाले. वाहनधारक हा रस्ता टाळून अधिक अंतराच्या केज मार्गे जाऊ लागल्याने रस्त्यावरील लहानमोठ्या व्यावसायिकांनाही याचा आर्थिक फटका बसला. त्यामुळे केज विधानसभा मतदार संघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी रस्त्याच्या कामासाठी शासनाकडे अनेक वेळेस पत्रव्यवहार करत मागणी लावून धरली. अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून शासनाने लोखंडी सावरगाव – माळेगाव या रस्त्याच्या कामासाठी २७ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. निविदा प्रक्रिया झाल्यानंतर लवकरच रस्त्याच्या कामाला सुरुवात होणार असून ग्रामस्थ, प्रवाशांची रस्त्याअभावी होणाऱ्या हालअपेष्टातून सुटका होणार आहे. या कामासाठी मंजुरी दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे आणि खा. प्रीतमताई मुंडे यांचे आ. नमिता मुंदडा यांनी आभार मानले आहेत.