बीड जिल्ह्यातील कुणबी नोंदी शोधण्यासाठी खा.रजनीताई पाटील यांच्या मध्यस्थीने तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची हैद्राबाद येथे भेट घेणार – राजेसाहेब देशमुख
मोडी लिपी अभ्यासकाच्या मदतीने परळीत शोधल्या 616 कुणबी नोंदी_

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
परळी तालुक्यातील अनेक गावांमध्ये मराठा कुणबी नोंदी सापडतील. कारण, मागील 3 दिवसांत प्रशासनाने केलेल्या सहकार्यामुळे, मोडी लिपी अभ्यासकाच्या मदतीने व राजेसाहेब देशमुख आणि परळी तालुक्यातील सकल मराठा समाज बांधवांच्या पुढाकाराने परळीत 616 कुणबी नोंदी सापडल्या आहेत. बीड जिल्ह्यातील मराठा बांधवांच्या उर्वरित कुणबी नोंदी शोधण्यासाठी खा.रजनीताई पाटील यांच्या मध्यस्थीने लवकरच तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांची हैद्राबाद येथे शिष्टमंडळासह जाऊन भेट घेणार आहोत अशी माहिती राजेसाहेब देशमुख यांनी दिली आहे.
परळी तालुक्यात मराठा कुणबी समाज मोठ्या संख्येने असूनही नोंदी सापडत नाहीत. त्या शोधण्यासंदर्भात राजेसाहेब देशमुख यांच्याकडे अनेक सकल मराठा कुणबी समाज बांधवांनी संपर्क साधून विनंती केल्यावर देशमुख यांनी पुढाकार घेत वैभव जगताप (नाशिक) या मोडी लिपी अभ्यासकांच्या मदतीने परळीतील भूमी अभिलेख कार्यालयात 9, 10 व 11 जानेवारी 2024 रोजी स्वतं: वेळ देवून, सकल मराठा समाज बांधवांसह हजर राहून प्रशासनाचे सहकार्य घेवून तब्बल 616 कुणबी नोंदी शोधून काढल्या आहेत. मनोजदादा जरांगे पाटील यांच्या सक्षम नेतृत्वात राज्यासह बीड जिल्ह्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या अनुषंगाने सर्वस्तरांतून कुणबीच्या नोंदी शोधण्याची मोहीम सुरू आहे. परळीत मोडी लिपी तज्ज्ञ उपलब्ध नसल्याने नोंदी शोधणे हे मोठे आव्हान वाटत होते. अखेर गुरूवारी तीन दिवसांच्या परिश्रमाने कुणबीच्या 616 नोंदी सापडल्या. नोंद सापडल्यामुळे परळी तालुक्यातील सकल मराठा समाजात आनंदाला उधाण आले आहे. याबाबत आमच्या प्रतिनिधीशी बोलताना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी सांगितले की, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाच्या कुणबी नोंदी मोठ्या प्रमाणात सापडत असताना बीड जिल्ह्यामध्ये मात्र या कुणबी नोंदी शोधण्याचे काम प्रशासनाकडून म्हणावे तेवढ्या गतीने होताना दिसून येत नाही. बीड जिल्ह्यात मराठा कुणबी समाज मोठ्या संख्येने राहत आहे. असे असताना ही मराठा कुणबी नोंद का सापडत नाही. म्हणून याबाबत आम्ही माहिती घेतली असता मोडी लिपी भाषा जाणणारे तज्ज्ञ याकामी आवश्यक आहेत. म्हणून मी वैभव जगताप (नाशिक) या मोडी लिपी अभ्यासकांच्या मदतीने परळीतील भूमी अभिलेख कार्यालयात 9, 10 व 11 जानेवारी 2024 रोजी सकल मराठा समाज बांधवांसोबत हजर होतो. प्रशासनाचे सहकार्य घेवून परळी तालुक्यातील पाडूळी – 49, हिवरा – 64, पिंपरी (बु.) – 76, तेलसमुख – 44, डाबी – 02, तळेगाव – 01, बेलंबा- 09, कौठळी – 33, टाकळी देशमुख – 12, कौडगाव घोडा – 80, कौडगाव साबळा – 33, बोरखेड – 53, कौडगाव हुडा – 55, गोवर्धन – 38, जयगाव – 23, इंजेगाव – 11, ममदापूर – 33 अशा एकूण तब्बल 616 कुणबी नोंदी शोधून काढण्यात आम्हाला यश आले. सन 1880 साली तत्कालीन निजाम सरकारने मराठवाड्यात केलेल्या तपशीलवार जनगणनेचे सर्व रेकॉर्ड हे हैद्राबाद येथील सालारजंग म्युझियम मध्ये सुरक्षित जतन करून ठेवलेले आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यातील मराठा बांधवांच्या उर्वरित कुणबी नोंदी शोधण्यासाठी खा.रजनीताई पाटील यांच्या मध्यस्थीने लवकरच तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांची हैद्राबाद येथे शिष्टमंडळासह जाऊन भेट घेणार आहोत. अशी माहिती राजेसाहेब देशमुख यांनी दिली आहे. सकल मराठा समाज बांधव व राजेसाहेब देशमुख यांनी सातत्यपूर्ण पुढाकार घेऊन मोडी लिपी अभ्यासक व तज्ज्ञ वैभव जगताप (नाशिक) यांना परळी येथे बोलावून घेतले. आणि भुमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी गायकवाड साहेब यांच्या सहकार्याने जुने रेकॉर्ड काढून, ते सतत 3 दिवस तपासून नोंदी शोधल्या. यावेळी परळी तालुका मराठा समन्वयक दत्ता गव्हाणे, शिवाजी देशमुख, केशव साबळे, बाबा शिंदे, ऍड.अर्जुन सोळंके, साईराज देशमुख हे सकल मराठा समन्वयक उपस्थित होते.
*बीड जिल्ह्यातील मराठा बांधवांच्या उर्वरित कुणबी नोंदी शोधणार – राजेसाहेब देशमुख*
परळी येथे तब्बल 616 कुणबी नोंदी सापडल्या आहेत. अजून ही कुणबी नोंदी शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. व आणखीन ही हजारो कुणबी नोंदी सापडतील. याकरिता खा.रजनीताई पाटील यांच्या मध्यस्थीने लवकरच तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांची हैद्राबाद येथे शिष्टमंडळासह जाऊन भेट घेणार आहोत. त्या ठिकाणी जाऊन नोंदी शोधण्याचा प्रयत्न व पाठपुरावा करणार आहोत. मनोजदादा जरांगे पाटील यांच्या समर्थ नेतृत्वाखाली मराठा समाज म्हणून आपण एकत्र येत आहोत आणि गरजवंत मराठा समाजाला न्याय कसा मिळेल याची धडपड व प्रयत्न सकल मराठा समाज म्हणून आपण करूयात.