आपला जिल्हासामाजिकसांस्कृतिक

छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श राज्यकर्ते होते – डॉ.पांडुरंग बलकवडे

सहकार भारती स्थापना दिवस ; मान्यवरांची उपस्थिती

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज विशेष

=======================

अंबाजोगाई (प्रतिनिधी)

दीनदयाळ नागरी सहकारी बँकेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही 10 जानेवारी ते 12 जानेवारी 2024 या कालावधीत तीनही दिवस दररोज सायंकाळी 6.30 वाजता युगपुरूष स्वामी विवेकानंद यांच्या 161 व्या जयंतीनिमित्त व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. व्याख्यानमालेचे द्वितीय पुष्प गुंफताना प्रसिद्ध व्याख्याते डॉ.पांडुरंग बलकवडे यांनी “लोककल्याणकारी शिवराय व त्यांची राजनिती” या विषयावर आपले अभ्यासपूर्ण चिंतन मांडले.

 

कार्यक्रमाची सुरूवात भारतमाता, स्वामी विवेकानंद, पंडित दीनदयाळजी उपाध्याय, लक्ष्मणराव इनामदार यांच्या प्रतिमापूजन आणि दीपप्रज्ज्वलनाने करण्यात आली. बॅंकेच्या वतीने मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर प्रमुख व्याख्याते डॉ.पांडुरंग बलकवडे, बँकेचे अध्यक्ष ऍड.मकरंद पत्की, उपाध्यक्ष ऍड.राजेश्‍वर देशमुख, संचालक सर्वश्री रा.गो.धाट, इंजि.बिपीन क्षिरसागर, मकरंद कुलकर्णी सोनेसांगवीकर, प्रा.जयकरण सुरेशकांबळे, तज्ज्ञ संचालक ऍड.अशोक कुलकर्णी व मुख्यकार्यकारी अधिकारी सनतकुमार बनवसकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. द्वितीय पुष्प गुंफताना डॉ.पांडुरंग बलकवडे (पुणे) यांनी सांगितले की, आजच्या व्याख्यानातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी कार्याचा जागर होत आहे. 350 वर्षांपूर्वी महाराजांनी जे महान कार्य केले त्याची पार्श्वभूमी, शिवरायांचे अज्ञात पैलू समजून घ्या, अखंड भारत देशासाठी महाराजांनी हिंदवी स्वराज स्थापन केले. यासाठी मुघल, आदिलशहा, कुतूबशहा, इंग्रज, फ्रेंच, डच, पोर्तुगीज यांच्यासह अनेक बलाढ्य शत्रूंशी मोठा संघर्ष केला. त्यांच्यासारख्या युगपुरूषांमुळे भारताची प्राचीन संस्कृती टिकून आहे. तथागत गौतम बुद्ध, भगवान महावीर, गुरू नानक, संत ज्ञानेश्वर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महापुरूषांनी आपले विचार स्वातंत्र्य जोपासत परिवर्तनाचा सिध्दांत मांडला. जर शिवराय नसते तर हिंदू समाज व संस्कृती ऱ्हास पावली असती, त्यामुळे शिवरायांचे भारतीय समाजावर फार मोठे उपकार आहेत. हिंदवी स्वराज स्थापन होण्यापूर्वीची पार्श्वभूमी, परस्थिती, इस्लामी राजवटीचे आक्रमण, त्यांची कार्यपद्धती, धर्मांतरण, महिलांवरील अन्याय अत्याचार, हिंदूंची हजारो मंदिरे पाडून तत्कालीन समाज मनावर निर्माण केलेली दहशत, इस्लामी राजवटीला विरोध करण्यासाठी सक्षम नसलेला तत्कालीन भूकेकंगाल समाज आणि समाज नेतृत्व, सर्वत्र माजलेली अनागोंदी, लुट अशा काळात राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचे संस्कार आणि शहाजीराजांच्या पाठबळावर तसेच अठरापगड जाती धर्माच्या मावळ्यांना सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज स्थापन केले. महाराजांनी कृषी क्रांती घडवून आणली व शेतीत सुधारणा केली, शेतकरी, कष्टकरी यांना कसायला जमिनी, शेती औजारे, बियाणे, अन्नधान्य दिले. गुन्हेगारांना कठोर शिक्षा करून महिलांचे रक्षण केले त्यांना प्रतिष्ठा मिळवून दिली. स्वराज्यात न्याय व्यवस्था, अष्टप्रधान मंडळ, सागरी सिमेच्या रक्षणासाठी आरमार उभारणी, राजमुद्रा निर्मिती, स्वभाषेत राज्य कारभार, भाषा शुद्धीकरण, धर्म प्रतिष्ठापना, मंदिरांचा जीर्णोद्धार, प्रखर राष्ट्रवाद, रयतेचे कल्याण केले. तत्कालीन समाजात अर्थक्रांती केली. आर्थिक दुर्बलता नष्ट करून सामाजिक अप्रतिष्ठेची दरी कमी केली. यातून महाराजांनी नवराष्ट्रवाद निर्माण केला. गनिमी कावा हे युद्ध तंत्र विकसित करून अनेक बलाढ्य शत्रूंवर विजय मिळवला. शिवरायांकडे प्रभू श्रीराम यांचे चारित्र्य व भगवान श्रीकृष्ण यांची राजनिती होती. त्यामुळे शिवरायांना शरण जा, त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील कोणताही एक गुण आत्मसात केल्यास आपण ही जीवनात यशस्वी व्हाल असे आवाहन प्रसिद्ध व्याख्याते डॉ.बलकवडे यांनी केले. प्रारंभी बँकेचे संस्थापक अध्यक्ष व संचालक रा.गो.धाट यांनी लक्ष्मणराव इनामदार यांच्या पवित्र स्मृतीचे स्मरण करून “सहकार भारती स्थापना दिवस” निमित्त मागील 45 वर्षांपासून सहकार भारती सहकार क्षेत्रात करीत असलेल्या कार्याची माहिती दिली. पाहुण्यांचा परिचय बँकेचे अधिकारी अनंतराव देशपांडे यांनी करून दिला. तर सूत्रसंचालन ओंकार कुलकर्णी यांनी केले. उपस्थितांचे आभार सुदर्शन टाक यांनी मानले. विश्वजीत धाट यांनी पद्य सादर केले. यावेळी अंबाजोगाईतील विविध क्षेत्रातील मान्यवर, महिला भगिनी, ज्येष्ठ नागरिक, युवक, रसिक श्रोते उपस्थित होते. या प्रबोधनपर व्याख्यानमालेचा समारोप शुक्रवार, दि.12 जानेवारी रोजी सुप्रसिद्ध सिनेअभिनेते तथा व्याख्याते राहुल सोलापूरकर (पुणे) यांच्या ‘श्रीराम जन्मभूमी – इतिहास राष्ट्र मंदिराचा’ या विषयावरील व्याख्यानाने होईल. 12 जानेवारी रोजी युगपुरूष स्वामी विवेकानंद यांची जयंती बँकेच्या वतीने साजरी करण्यात येईल. तरी अंबाजोगाई शहर व परिसरातील रसिक, श्रोते, नागरिक, माता, भगिनी आणि युवक वर्गाने सहकुटूंब, सहपरिवार उपस्थित राहून युगपुरूष स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा असे आवाहन दीनदयाळ नागरी सहकारी बँकेच्या वतीने करण्यात आले आहे.

 

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.