आयुष्यात काय व्हायचंय हे अगोदर ठरवा, त्यासाठी जीवाचे रान करा
लोकनेते मुंडे साहेबांमुळेच माझे जीवन घडले - उद्योजक विवेक देशपांडे यांचे प्रतिपादन

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज विशेष
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना आपल्या जीवनाची दिशा ठरवणे महत्वाचे असुन आयुष्यात काय व्हायचं आहे ? याची निश्चिती करून अजेंडा डोळ्यांसमोर ठेवला तर त्यासाठी कठोर परिश्रम घेण्यासाठी मागे पडता कामा नये, योग्य संधी निश्चित येवु शकते, त्यासाठी आत्मानंद आणि स्वत्व शोधण्याचा प्रयत्न केला तर यशाची गुरूकिल्ली खऱ्या अर्थाने सकारात्मकता होय. क्रिएटिव्ह माइंड नेहमी माणसाला आनंद देवून उत्साह भरवते. नकारात्मकते मध्ये सकारात्मकता जर शोधली तर केलेला संकल्प सिद्धीस जावू शकतो असे प्रतिपादन संभाजीनगर येथील प्रसिद्ध उद्योगपती विवेक देशपांडे यांनी केले. मी आयुष्यात शुन्य होतो. पण, याच कर्मभुमीत स्व.गोपीनाथराव मुंडे यांचा लाभलेला परिसस्पर्श जीवनाच्या उद्धारासाठी कारणीभुत ठरला हे सांगायला देशपांडे विसरले नाहीत.
खोलेश्वर महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेह संमेलन उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्यवाह डॉ.हेमंत वैद्य होते. तर व्यासपीठावर राम कुलकर्णी, अविनाश तळणीकर, सौ.वर्षाताई मुंडे, आप्पाराव यादव, ऍड.मकरंद पत्की, किरणदादा कोदरकर, मदन नरवडे, प्राचार्य डॉ.मुकुंद देवर्षी, उपप्राचार्य तथा स्नेहसंमेलन प्रमुख प्रा.डॉ.बिभीषण फड आदी मान्यवरांची उपस्थिती होती. सरस्वती पुजनानंतर उपस्थित मान्यवर पाहुण्यांचा महाविद्यालयाच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना महाविद्यालयीन विकास समितीचे अध्यक्ष राम कुलकर्णी म्हणाले की, खोलेश्वर महाविद्यालयाला यशाची आणि गुणवत्तेची 50 वर्षांची परंपरा लाभलेली आहे. समाजातील लोकांचा विश्वास हिच आमच्यासाठी कार्याची पावती असुन विद्यार्थी जेव्हा शिक्षण घेवुन बाहेर पडतात तेव्हा त्यांचा सर्वांगिण व्यक्तिमत्व विकास झालेला निश्चित दिसून येतो असे ते म्हणाले. यावेळी किरण कोदरकर आणि ऍड.मकरंद पत्की यांच्या भाषणानंतर विवेक देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल असे मौलिक विचार मांडले. यशाची अनेक उदाहरणे सांगताना त्यांनी तरूण वयातच सकारात्मक विचाराची दिशा आपण पकडली पाहिजे असे सांगून ध्येयवादाने आपण जर पुढे गेलो तर ठरवलेले फळ निश्चित मिळू शकते असा विश्वास व्यक्त केला. मात्र त्यासाठी कठोर परिश्रमाचे अधिष्ठान महत्वाचे असुन परिस्थिती कशीही असली तरी आपण जर चांगला विचार केला तर नकारात्मकतेला हरवू शकतो असे त्यांनी सांगितले. विद्यार्थी दशेत जीवनाचा संकल्प केला पाहिजे, आपल्याला आयुष्यात नेमकं काय व्हायचंय ? हे जर मनात ठरवलं तर त्याच दृष्टीने योग्य पाऊल पडु शकते, मनातला आत्मविश्वास आणि दृढसंकल्प अंगी बाळगणे महत्वाचे. आत्मनिर्भर हा मार्ग स्वावलंबी जीवनाचा असून देशात तशाच प्रकारची व्यवस्था आल्याने आजचा तरूण खऱ्या अर्थाने उज्ज्वल यशाकडे वाटचाल करीत असल्याचेही ते म्हणाले. आज मला प्रसिध्द उद्योगपती म्हणून समाजात प्रतिष्ठा मिळत असली तरी याचे सर्व श्रेय लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे यांना असून जेव्हा अंबाजोगाई शहरात विद्युत मंडळात मी नौकरी करत होतो त्यावेळी साहेबांचा आलेला सहवास खऱ्या अर्थाने मला वैयक्तिक जीवन उद्धारासाठीच कारणीभूत ठरला. साहेबांसोबतच्या अनेक आठवणी सांगताना त्यांना भावना आवरता आल्या नाहीत. यावेळी त्यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना स्वच्छ पाणी मिळावं म्हणून सुमारे दिड लाख रूपये खर्चाचे वॉटर फिल्टरसाठी योगदान देण्याचं जाहिरपणे सांगितलं. उपस्थितांचे आभार उपप्राचार्य प्रा.बिभीषण फड यांनी मानले. प्रा.शैलेष पुराणिक यांनी वैयक्तिक पद्य सादर केले. तर कल्याण मंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली.