मराठी कवितेतील माय-बाप या दर्जेदार ग्रंथास विद्यापीठाने विद्यावाचस्पती पदवी द्यावी – ज्येष्ठ विचारवंत सोमनाथ रोडे
मराठी साहित्य विश्व

समृद्ध महाराष्ट्राच्या सर्वांगिण बातम्यांसाठी..
=======================
वैभवशाली महाराष्ट्र न्यूज (प्रतिनिधी)
मराठी कवितेतील मायबाप या ग्रंथाला विद्यापीठाने विद्यावाचस्पती ही पदवी द्यावी कारण, हा ग्रंथ मौल्यवान व दर्जेदार आहे. लेखक हे ज्ञानाची उपासना करणारे वारकरी आहेत. बुद्ध-फुले-शाहू-आंबेडकरी विचारांचा वारसा चालवणारे लेखक म्हणजे गौतम गायकवाड आहेत. पुस्तके माणसाचे मस्तक समृद्ध करते. समृद्ध मस्तक कोणाचे ही हस्तक नसते. म्हणून त्यांच्यापुढे जग सारे नतमस्तक होते. असे एकमेव विश्व वंदनिय महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर आहेत असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ.सोमनाथ रोडे यांनी केले. ते मराठी भाषा दिनानिमित्त मराठी कवितेतील मायबाप या ग्रंथाच्या प्रकाशन प्रसंगी बोलत होते. या ग्रंथाचे मराठी साहित्य वर्तुळातून स्वागत होत आहे.
येथील प्रवर्तनवादी चळवळीत सक्रिय असलेले प्रख्यात साहित्यिक प्रा.गौतम गायकवाड लिखीत मराठी कवितेतील माय-बाप या ग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते व प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुरूवर्य शिवशंकर स्वामी गुरूजी होते. तर प्रमुख अतिथी म्हणून विचारपीठावर प्रसिद्ध साहित्यिक पंडित कांबळे, सखा गायकवाड, डॉ.मना गायकवाड, विष्णू सगर गुरूजी, उपसरपंच सुल्तानपुरे, प्रा.बी.एस.बनसोडे आणि लेखक प्रा.गौतम गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. ग्रंथ प्रकाशनानंतर पुढे बोलताना डॉ.रोडे म्हणाले की, भारतरत्न डॉ.आंबेडकर यांना त्यांचे वडील मुलीचे दागिने विकून पुस्तके घेऊन देत असत. कृष्णराव केळुस्कर गुरूजींनी बाबासाहेबांना बुद्धचरित्र वाचायला दिले. पुढे बाबासाहेबांनी बुद्ध धम्म स्वीकारत यापुढे जगाला युद्धाची नव्हे तर बुद्धांच्या विचारांची गरज आहे. असे सांगितले. अमेरिकेत केली कोलंबिया विद्यापीठाने बाबासाहेब ज्या खुर्चीवर वाचन करीत बसायचे ती खुर्ची जतन करून ठेवली आहे. बुद्ध-प्रबुद्ध विचारांचा जागर केला पाहिजे, आम्हाला महात्मा गांधींचे राम-राज्य पाहिजे, नथुराम गोडसे यांचा राम आम्हाला नको आहे. आज संविधान मूल्यांवर घाला घातला जातोय हे दुर्दैवी आहे. त्यामुळे संविधान सांभाळले पाहिजे, गांधी-आंबेडकर पुढे घेऊन जाण्यातच मानवाचे कल्याण आहे. आष्टा कासार हे देव नांदायचे गांव आहे. देवाचा निवास या गावात होतो. प्रत्येक गावात देवाची गरज आई रूपाने देव पूर्ण करतो आहे. प्रा.गायकवाड यांना आई विषयी नितांत प्रेम जिव्हाळा होता व आहे. प्रा.गायकवाड यांनी आईचं नांव वाढविले, त्यांची सागरामाय गवतमा सगळीच माणसं नसतात, उलट्या काळजाची जी माणसं आहेत. त्यांच्याशी ही माणसासारखं वागायचं, माणसांत माणूस म्हणून जगायचं, आणि माणूस म्हणूनच मरू, या मातीतून उगवत जायचं आणि हे बघ शेवटचे सांगते बापाचं पाप मुलांवर काढू नको, तो आपला धरम नाही. हे जीवनाचे तत्त्वज्ञान सांगून जाते. कुणी कसे ही वागले तरी आपण नीट वागावे. बापाचे पाप मुलांचे फेडायला लावणाऱ्या संस्कृतीचे आपण वारस नाही. हे क्षमा करण्याचे औदार्य, करूणा अगाध आहे. आई या एका शब्दांत विश्व सामावले आहे. तसे गौतमराव बाबासाहेबांना माय-बापाचे मायबाप मानतात. माय, माती, गांधी-आंबेडकर सर्वश्रेष्ठ आहेत. याप्रसंगी त्यांनी साने गुरूजी, अब्राहम लिंकन, महात्मा गांधी तसेच मराठीतील अनेक मान्यवरांच्या कवितेचे संदर्भ देऊन हा ग्रंथ प्रत्येकाने वाचावा, पुढच्या पिढीला द्यावा हा आदर्शाचा, ईश्वर मातृत्वाचा वारसा पुढे चालवला पाहिजे, हे जग उजाड होऊ न देता ते कसे टिकून राहील अशी मातृत्वात असलेली माणुसकी जपणारे हे गाव असल्याचे ही समायोचित विचार त्यांनी मांडले. याप्रसंगी साहित्यिक पंडित कांबळे म्हणाले की, माय-बाप लेकरं उभे करण्यातच आयुष्य घालवतात. तो जिव्हाळा अलिकडे दिसत नाही. संवाद झाला पाहिजे, ज्ञान-धन आणि नातेवाईक जपले व टिकवले पाहिजेत. त्यांनी मोरे यांनी आई वरील ४०० कविता शोधल्या तसेच युवराज सोनटक्केने १८० कविता यावर प्रकाशित केल्याचे म्हटले. माय-बाप वैभव आहे. या ग्रंथाची अर्पण पत्रिका मौल्यवान आहे. साहित्यिक सखा गायकवाड यांनी माय-बाप पुस्तक वाचल्याने डोळे भरून येतात. मी हा गमजा मायेचा पदर म्हणून जतन केला आहे. त्यांनी भारताचा सातबारा, मायबाप, दारात उंबर आदींचे संदर्भ दिले. तर याप्रसंगी बोलताना गुरूवर्य सगर गुरूजी म्हणाले की, माय – बापांना देणे कळते. बाप सोशिक आहे. बापाचे ही ऋण महत्त्वाचे आहेत. तर प्रा.बी.एस.बनसोडे यांनी माय-बाप ग्रेट आहेत. मायबापाचे संदर्भ देत प्रत्येकाने हे दर्जेदार पुस्तक वाचले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. अध्यक्षीय समारोप करताना गुरूवर्य शिवशंकर स्वामी गुरूजी म्हणाले की, गौतमा मी राजा असतो. तर तुझ्या हाती सोन्याचे कडे घातले असते. आम्ही दान द्यावे ऋण कसे फेडावे. तर असे जो आईची पूजा करतो. तो श्रेष्ठ आहे आता या नगरांचे नांव डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर ठेवले पाहिजे, इतके विद्वान येथे आहेत. आता यापुढे विचारांचा जागर वाढला तरच हे संविधान टिकेल. आपण हा ग्रंथ वाचावा, तसेच वागावे सागरामाय एक आदर्श माता होती. असे गौरवोद्गार स्वामी गुरूजी यांनी काढले. तर याप्रसंगी उपसरपंच गुरूवर्य सुल्तानपुरे गुरूजी, प्रा.डॉ.म.ना.गायकवाड यांनीही समायोचित मनोगत व्यक्त केले. यावेळी यवतमाळ येथील आंबेडकरी साहित्य पुरस्कार प्राप्त पंडित कांबळे यांचाही सत्कार करण्यात आला. या माय-बाप ग्रंथ प्रकाशन समारंभास ऍड.संभाजी शिंदे, शहाजी सोमवंशी, पोलीस पाटील चौधरी, पत्रकार जगन सरवदे, गावातील प्रतिष्ठित नागरिक, नातेवाईक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.गौतम गायकवाड तर सुत्रसंचालन प्रा.डॉ.किशोर थोरे यांनी केले. उपस्थितांचे आभार प्रा.डॉ.म.ना.गायकवाड यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी राहुल गायकवाड, कल्याणी कांबळे, विठोबा गायकवाड, किशोर थोरे आदींसह इतरांनी परिश्रम घेतले. मराठी कवितेतील माय-बाप हा एक महत्त्वपूर्ण समिक्षा ग्रंथ आहे. तो मराठी भाषिकांना, शिक्षकांना, विद्यार्थ्यांना आणि अभ्यासकांना उपयुक्त ठरणारा आहे. वाचकांनी संग्रही ठेवावा असा हा ग्रंथ आहे. ग्रंथाचे मुल्य – २२५ रूपये आहे, तर पृष्ठ संख्या – २०६ एवढी आहे. ज्यांना ग्रंथ हवा आहे त्यांनी या ग्रंथाचे लेखक प्रा.गौतम गायकवाड (मोबा – ८००७२७२४८३ / ९३७०९११८७४) यांचेशी संपर्क साधावा.