खोलेश्वर महाविद्यालय ५० असंघटित महिला कामगारांना साडी चोळी देऊन सन्मानित करणार
शैक्षणिक सामाजिक विशेष

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
=======================
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
एकीकडे सामाजिक संवेदना बोथट होत जात असताना गोरगरीब, सामान्य लोकांविषयी असलेल्या संवेदना जागृत ठेवण्याचे काम शिक्षण क्षेत्रात खोलेश्वर महाविद्यालय करीत आहे. महिला दिनानिमित्त एक अभिनव उपक्रम आयोजित केला आहे. अंबाजोगाई शहरातील घरकाम करणाऱ्या ५० असंघटित महिला कामगार भगिनींचा सन्मान करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम गुरूवार, दिनांक ७ मार्च रोजी आयोजित करण्यात आला आहे. ज्या महिलांनी आयुष्यभर कष्ट करून कुटुंब उभे केले. त्या महिलांचा सन्मान यानिमित्ताने होत आहे.
घराची धुरा सांभाळताना, कष्ट करीत जबाबदारी घेऊन कुटुंबास आधार, आकार देणा-या माता-भगिनींचा सन्मान करण्याचे खोलेश्वर महाविद्यालयाने ठरविले आहे. कामगार महिलांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी या महाविद्यालयाने सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमिच्यानिमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थी आणि विद्यार्थिनींच्या समोर खऱ्या अर्थाने महिला कामगार भगिनींचा सन्मान करून त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी या महाविद्यालयाच्या या उपक़माचा उद्देश आहे. वंचित, दुर्लक्षित अशा लोकांसाठी खऱ्या अर्थाने संघटना किंवा इतर मंडळींनी पुढे यायला पाहिजे असे वाटते. महिला दिनानिमित्त नारीशक्ती वंदन कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या विशाखा समिती आणि अंतर्गत महिला तक्रार निवारण समितीच्या वतीने स्व.गोपीनाथराव मुंडे सभागृहामध्ये गुरूवार, दिनांक ७ मार्च २०२४ रोजी सकाळी १० वाजता करण्यात आले आहे. या कार्यक्रमास संस्थेचे कार्यवाह डॉ.हेमंत वैद्य, अंबाजोगाईच्या अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह बिपिनदादा क्षीरसागर, महाविद्यालयीन विकास समितीचे अध्यक्ष रामभाऊ कुलकर्णी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मुकुंद देवर्षी व इतर संस्था पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मुकुंद देवर्षी यांनी दिली आहे.