सामाजिक बांधिलकी जोपासत रामकिसन मस्के यांनी विद्यादानाचे पवित्र कार्य केले – डॉ.प्रतापसिंह शिंदे
मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत मस्के सरांचा सेवापुर्ती सत्कार सोहळ्याचे आयोजन

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
अंबाजोगाई तालुका प्रतिनिधी
येथील त्र्यंबकेश्वर शिक्षण संस्था संचलित नेताजी सुभाषचंद्र माध्यमिक विद्यालयातील सहशिक्षक रामकिसन गुंडीबा मस्के यांचा सेवापुर्ती सत्कार सोहळा रविवार रोजी शहरातील अनिकेत मंगल कार्यालय येथे मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी त्र्यंबकेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव डॉ.प्रतापसिंह शिंदे हे होते. तर विचारमंचावर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ समाजसेवक नंदकिशोरजी मुंदडा, माजी आमदार पृथ्विराज साठे, बीड जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख, माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, माजी उपनगराध्यक्ष बबनराव लोमटे, शाळेचे मुख्याध्यापक जी.डी चव्हाण, आर.बी मगर, बाळासाहेब काळे व सत्कारमूर्ती रामकिसन मस्के तसेच त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.मस्के ताई इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीला सर्व मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या प्रतिमेचे पूजन करून दिपप्रज्ज्वलन करण्यात आले. यानंतर सुरवसे सर यांनी जिजाऊ वंदना घेऊन कार्यक्रमाची सुरूवात केली. जिजाऊ वंदनेनंतर उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत मस्के सरांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर मस्के सरांचे व्याही बाळासाहेब काळे यांना महाराष्ट्र शासनाचा उद्यान पंडित हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांच्या कुटुंबियांचा सर्व मान्यवरांच्या हस्ते आदरपूर्वक सत्कार करण्यात आला. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते सत्कारमूर्ती रामकिसन मस्के व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.मस्के ताई यांचा ही सपत्नीक सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ज्येष्ठ समाजसेवक नंदकिशोर मुंदडा यांनी बोलत असताना मस्के सरांनी गणितासारखा अवघड विषय शिकवित असताना आयुष्याच्या बेरीज वजाबाकीचा तंतोतंत हिशोब जुळवून बेरजेचे आयुष्य जगत असताना माणसांची बेरीज ते करीत गेले म्हणूनच आज त्यांच्या सत्कार सोहळ्यासाठी हा मोठा जनसमुदाय या ठिकाणी जमला असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. तर माजी आमदार पृथ्विराज साठे यांनी मस्के सरांनी विद्यार्थी घडवित असताना प्रत्येक विद्यार्थ्याला प्रोत्साहन देऊन शिक्षणाच्या प्रवाहात नुसते टिकवूनच ठेवले नाही. तर त्याला त्याच्या लक्ष्यापर्यंत पोहोचेपर्यंत ते मार्गदर्शन करतात असे मत त्यांनी मांडले. तर राजकिशोर मोदी यांनी मस्के सर हे जरी गणितासारख्या अवघड विषयाचे शिक्षक असले तरी हा विषय अगदी सोपा करून विद्यार्थ्यांच्या गळी उतरविण्याचे काम हे त्यांनी उभ्या आयुष्यात केले. त्यामुळे त्यांच्या शाळेचे संस्थेचे, नांव झाले. आज त्यांची शाळा ही नांवारूपाला आलेली आपल्याला दिसते. त्यात मस्के सरांचे योगदान महत्त्वाचे राहिले आहे असे सांगितले. तर बबनराव लोमटे यांनी नेताजी सुभाषचंद्र माध्यमिक विद्यालय नांवारुपाला येण्यात जसा संस्थेचा वाटा असतो. तसाच शिक्षकांचा ही मोठा वाटा असतो. यात मस्के सरांनी गणितासारखा विषय अगदी सहजपणे शिकवित असताना विद्यार्थ्यांना आयुष्याचं गणित ही सोडवण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. हे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. मुख्याध्यापक गोविंदराव चव्हाण यांनी मस्के सरांनी त्यांच्या एकूण ३४ वर्षांच्या सेवेत वेळेला अत्यंत महत्त्व देऊन अत्यावश्यक असेल तरच त्यांनी रजा घेतल्याचा उल्लेख केला तसेच न चुकता दररोजचा परिपाठ ते घेत असत, एकूणच शाळेचे नांव मोठे करण्यात मस्के सरांचेही योगदान महत्त्वाचे राहिले असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी केला. यावेळी सत्काराला उत्तर देत असताना रामकिसन मस्के यांनी आपल्या एकूण ३४ वर्षांच्या सेवेची त्रोटक माहिती देऊन या काळात आपण शाळेसाठी पूर्णपणे झोकून देऊन काम करीत असताना अंबाजोगाई व परिसरातील ग्रामीण भागातील विविध जाती-धर्माच्या, पंथाच्या, वंशाच्या विद्यार्थ्यांना समान न्याय देऊन त्यांना मार्गदर्शन करून घडविण्याचे काम केले. तर गरजू विद्यार्थ्यांना वसतिगृहाच्या माध्यमातून विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आपण नेहमी पुढाकार घेतला व संस्थेच्या माध्यमातून व सर्वांच्या सहकार्याने हे वसतीगृह नांवारूपाला आणण्याचे काम आपण करू शकल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. हे करीत असतानाच मराठा सेवा संघाच्या माध्यमातून आपण सामाजिक कार्यही करत राहिलो त्या माध्यमातून समाजाचे अनेक प्रश्न सोडविण्यासाठी नेहमी पुढाकार घेत राहिलो. तर पुढील काळात आपण सामाजिक कार्यात असेच सक्रिय राहून समाजाचे, विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासंदर्भात आग्रही राहणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप प्रसंगी बोलताना संस्थेचे सचिव प्रतापसिंह शिंदे म्हणाले की, मस्के सरांनी शाळेसाठी दिलेले योगदान हे अत्यंत मौलिक व समाधानकारक आहे. शाळेचे वसतिगृह हे केवळ आणि केवळ मस्के सरांमुळेच नांवारूपाला येऊ शकले व या ठिकाणी चांगल्या सोयी, सुविधायुक्त ते बनू शकले. तर मस्के सरांनी त्यांचे सामाजिक कार्य कधीच शाळेच्या कामाच्या आड येऊ दिले नाही असेही मत त्यांनी व्यक्त केले. याप्रसंगी बापू देवकते, सुरवसे सर, ॲड.पी.जी शिंदे, सातपुते सर, बडे सर, सौ.सुरेखा काळे मॅडम, सौ.सेलूकर मॅडम इत्यादी मान्यवरांनी ही श्री.मस्के यांच्या बाबतीत आपले यथोचित मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमात माजी विद्यार्थी, पालक, सरांचा मित्र परिवार, नातेवाईक, आप्तेष्ट, चळवळीतील सहकारी, प्रतिष्ठीत नागरिक यांनी मस्के सर यांचा सेवापूर्तीनिमित्त विशेष सन्मान केला. या कार्यक्रमाचे अतिशय सुंदर आयोजन नेताजी सुभाषचंद्र माध्यमिक व प्राथमिक विद्यालयाच्या सर्व शिक्षक, कर्मचाऱ्यांनी अतिशय उत्कृष्टपणे केले होते. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन प्रा.डॉ.सतीश कदम यांनी केले. तर उपस्थितांचे आभार सौ.नेहरकर मॅडम यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.