शिक्षण हे समाज निर्मितीचे साधन आहे – माजी प्राचार्य रा.गो.धाट
जयंतीनिमित्त महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना खोलेश्वर महाविद्यालयात अभिवादन

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज विशेष
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
“शिक्षण हे समाज संघटित करण्याचे साधन असून तत्कालीन काळात वंचित समाज घटक आणि महिला यांच्या उत्थानासाठी खूप मोठे कार्य भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केले आहे. आपण केवळ शिक्षण घेवून उपयोगाचे नाही. तर शिक्षणातून मिळालेल्या ज्ञानाची अंमलबजावणी कशी करायची हे आपणास समजले पाहिजे, त्यासाठी समाजात समता, स्वातंत्र्य व बंधुता निर्माण करण्याची आवश्यकता आहे, म्हणून शिक्षण हा संस्कार आहे आणि शिक्षण हे समाज निर्मितीचे साधन आहे, साध्य नाही,” असे प्रतिपादन खोलेश्वर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य राजाभाऊ धाट यांनी केले. ते खोलेश्वर महाविद्यालयात सांस्कृतिक आणि संगीत विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भा.शि.प्र.संस्थेच्या केंद्रीय कार्यकारणीचे सदस्य तथा महाविद्यालयीन विकास समितीचे अध्यक्ष रामभाऊ कुलकर्णी हे उपस्थित होते. तर व्यासपीठावर महाविद्यालयीन विकास समितीचे सदस्य डॉ.प्रवीण जोशी, सदस्य सौ.संगिताताई धर्मराव, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मुकुंद देवर्षी आदी मान्यवरांची उपस्थिती होती. प्रारंभी सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. पुढे बोलताना माजी प्राचार्य धाट यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याचा परिचय करून देताना डॉ.आंबेडकरांचे शैक्षणिक चिंतन आणि कार्य याविषयी सविस्तर माहिती दिली तसेच त्यांनी भारतीय राज्यघटनेच्या कलम ४५ अनुसार प्रत्येकाला शिक्षणाचा मुलभूत अधिकार देवून डॉ.आंबेडकर यांनी सर्वांना शिका, संघटित व्हा, संघर्ष करा असा संदेश दिला असे सांगितले. डॉ.आंबेडकर यांचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ.आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या विचारधनातून आपण काही तरी घेऊ व त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालू अशी अपेक्षा त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली. अध्यक्षीय समारोप करताना रामभाऊ कुलकर्णी म्हणाले की, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सारख्या महान व्यक्तींच्या कार्याला स्मरून आपण जर जीवन जगलो तर समाजोन्नती नक्की होईल अशा भावना या प्रसंगी कुलकर्णी यांनी व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा.डॉ.तात्या पुरी यांनी केले. ते म्हणाले की, अभ्यास मंडळाच्या वतीने वर्षभर विद्यार्थ्यांचे व अध्यापकांचे उद्बोधन होईल अशा प्रकारचे विविध कार्यक्रम, उपक्रम आयोजित केले जातात. त्याचाच एक भाग म्हणून आजचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.कालिदास चिटणीस यांनी केले. तर उपस्थितांचे आभार प्रा.शैलेश पुराणिक यांनी मानले. मुख्य कार्यक्रमापूर्वी सकाळी नऊ ते दहाच्या दरम्यान खोलेश्वर महाविद्यालयाच्या आजी-माजी विद्यार्थ्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित भीमगीतांच्या गायनाचा अतिशय सुरेख व प्रबोधनपर असा कार्यक्रम सादर करून महामानवांना अभिवादन केले. यावेळी कु.क्रांती एडके, कु.प्रतिक्षा भुतकर, सौ.मनिषा वैरागे, शाहीर गणेश मामा काळे, बळीराम उपाडे, प्रा.महादेव माने आदींनी गायन केले. तर सिंथेसायझरवर विकास एडके, पांडुरंग कुलकर्णी व सिद्धार्थ आवशंख यांनी साथ-संगत केली. शांती मंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी – विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.