पंचनाम्याचे गुऱ्हाळ बंद करून शेतकऱ्यांना विनाअट तत्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी- गणेश बजगुडे पाटील
शेतकरी विशेष

बीड जिल्हा प्रतिनिधी
बीड / गेल्या काही दिवसात बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह, अवकाळी पाऊस, गारपीठ झालेली असुन यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. प्रशासनाकडून पंचनाम्याच्या नावावर वेळकाढू पणाचे धोरण आखले जात असुन असले पंचनाम्याचे गुऱ्हाळ बंद करुन शेतकऱ्यांना तत्काळ विनाअट नुकसान भरपाई देण्याची मागणी बीड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तालुकाध्यक्ष गणेश दादा बजगुडे पाटील यांनी केली आहे. जिल्ह्यात आंबा, डाळिंब, टरबुज, पपई, टोमॅटो, मिरची, यासह फळबाग, भाजीपाला, उन्हाळी बाजरी यासारखे हातातोंडाशी आलेली पीके निस्तनाबुत झालेली आहेत. जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी राजा अगोदरच संकटात असताना पुन्हा या नैसर्गिक आपत्तीमुळे बळीराजा हावलदिल झालेला आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या घराचे व गुराढोरांच्या गोट्याचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. प्रशासनाकडून पंचनाम्याच्या नावावर वेळकाढू पणा केला जात असताना लोकसभेच्या निवडणुकीत दंग असलेल्या नेत्यांना शेतकऱ्याच्या अडचणीत किंवा त्यांच्या संकटात पाठबळ देण्यासाठी वेळ दिसत नाही. मायबाप सरकारने मोठ मोठी भाषणे आणि घोषणा करण्यापेक्षा आज हवालदिल झालेल्या बळीराजाला तत्काळ विनाअट आर्थिक मदत करावी अशी मागणी बीड तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष गणेश बजगुडे पाटील यांनी केली आहे.