ऊस तोड कामगारांसाठी विशेष तरतूद करा; आरोग्याचे प्रश्नही सोडवा – खासदार बजरंग सोनवणे
खा.बजरंग सोनवणेंनी लोकसभा सभागृहातील पहिल्याच भाषणात मांडले बीडकरांचे प्रश्न, मुद्देसूद केलेल्या भाषणाची जिल्हाभर चर्चा

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज विशेष
बीड: माझ्या बीड जिल्ह्याला ऊसतोड कामगारांचा जिल्हा अशी ओळख आहे.याठिकाणी ऊसतोड कामगारांच्या नावावर केवळ राजारकण केले, मात्र त्यांच्यासाठी कुठल्याही सोयीसुविधा आजवर दिल्या नाहीत. त्यांच्यासाठी विशेष तरतूद करा आणि बीड जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेला उभारी देण्यासाठी विशेष प्रयत्न करा, रिक्त जागा, अत्याधुनिक मशीनरी आणि रूग्णालये मंजूर करा, अशी मागणी खा.बजरंग सानवणे यांनी लोकसभा सभागृहात पहिल्याच भाषणात केली. त्यांनी केलेल्या मुद्देसूद भाषणाची जिल्हाभर चर्चा होत आहे.
दिल्ली येथे लोकसभा अधिवेशन सुरू असून दि.२ ऑगस्ट रोजी आरोग्य मंत्री यांच्या उपस्थितीत खा.बजरंग सोनवणे यांनी सभागृहातील पहिले भाषण केले. यावेळी बोलताना ते म्हणाले,मी जिथे राहतो त्या भागाची ओळख ऊसतोड कामगारांचा जिल्हा अशी आहे. ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून माझ्या जिल्ह्यावर फक्त राजकारण केलं गेलं. मात्र माझ्या ऊसतोड कामगारांसाठी कुठल्याही सोयीसुविधा आजवर या राजकारण्यांनी दिल्या नाही.या ऊसतोड कामगारांसाठी विशेष तरतूद करावी. हातात कोयते घेऊन रात्रंदिवस आमच्या मायमाऊल्या शेतावर ऊस तोडतात. त्यांचेही प्रश्न सोडवले गेले पाहिजेत. तर आरोग्य विभागाच्या दृष्टीने बोलताना ते म्हणाले, जिल्ह्यात एक वैद्यकीय महाविद्यालय, मोठे सरकारी इस्पितळ, शेकडो आरोग्य केंद्र आहेत. परंतु या आरोग्य केंद्रांवरती स्टाफच उपलब्ध नाही. या सुविधा आपण उपलब्ध करून द्याव्यात. जिल्ह्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नाही. आमच्या लेकरांच्या शिक्षणाचा हा प्रश्न मोठा गंभीर आहे. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय झाले तर इथल्या गुणवान विद्यार्थ्यांच्या कष्टाला फळ येऊन ते इथेच आपले शिक्षण पूर्ण करून वैद्यकीय सेवा देतील. त्यामुळे विशेष पॅकेज देऊन हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी झालेच पाहिजे.जिल्ह्याच्या ठिकाणी स्त्री रुग्णालय सुद्धा नाहीये. इथे स्त्री रुग्णालय झाले पाहिजे. महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी स्त्री रुग्णालयाची अत्यंत आवश्यकता जिल्ह्याला आहे.अंबाजोगाई शहरात जे वैद्यकीय महाविद्यालय आहे, तेथे ५० विद्यार्थ्यांची क्षमता असताना कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली होती. आज तिथे विद्यार्थ्यांची संख्या १५० झाली आहे. परंतु स्टाफ मात्र तेवढाच आहे. डॉक्टर, नर्सेस, वर्ग ३, ४ हा स्टाफ तेव्हा भरती झाला. तेवढाच मर्यादित आहे.त्यामुळे इथे आता नव्या कर्मचाऱ्यांची गरज आहे. ती वाणवा सरकारने तात्काळ भरून काढावी, अशी आग्रही मांडणी त्यांनी केली.
००
‘सिटीस्कॅन’चा प्रश्न सभागृहात पोहचला
अंबाजोगाईच्या दवाखान्यातील सिटीस्कॅनची मशीन वारंवार बंद पडते. त्यामुळे रुग्णांची हेळसांड नेहमीचीच आहे. तिथे नवीन मशीन घेण्यासाठी स्थानिक प्रशासनाला सूचना आरोग्यमंत्र्याच्या माध्यमातून करण्यात याव्यात. तसेच जिल्हा रुग्णालयात व्हेंटिलेटर व इतर आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना द्याव्यात. असेही ते म्हणाले.
००
‘त्याला’ आरोग्यव्यवस्थाही कारणीभूत
बीड जिल्ह्यात लिंग गुणोत्तर १ हजार पुरुषांमागे ९३३ महिला असे आहे. याला वर्षानुवर्षे चालत आलेली आरोग्यव्यवस्था तेवढीच कारणीभूत आहे.या मुद्द्यांसह इतर अनेक मुद्द्यांवर यावेळी आग्रहपूर्वक प्रश्न मांडले.
००
मराठीतूनच केले भाषण
लोकसभेतील माझे पहिले भाषण..मराठी ही आपली जन्मभाषा असल्याने मराठीतूनच बोलणार, असे सांगून माझे संपूर्ण भाषण मराठीत केले. यावेळी त्यांनी माझी शेतकरी पुत्र अशी ओळख असून एक सामान्य शेतकरी पुत्र संसदेत पोहोचला, तो शेतकऱ्यांनी पोहचवला, त्याबद्दल शेतकऱ्यांचे आभार मानले.
००
जरांगे पाटील, पवारांना नमस्कार..
लोकसभेतील पहिल्या भाषणात शेतकऱ्यांचे आभार मानल्यानंतर खा.सोनवणे यांनी मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना नमस्कार करून त्यांच्या समाजाभिमुख कार्याचे स्मरण करतो. असे म्हणत जिल्ह्याच्या मागण्या मांडण्यास सुरूवात केली.