महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या युवक जिल्हाध्यक्षपदी हरीश वाघमारे यांची फेरनिवड

अंबाजोगाई (प्रतिनिधी)
महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या युवक जिल्हाध्यक्षपदी हरीश वाघमारे यांची फेरनिवड तर यावेळी वरीष्ठ पदाधिकाऱ्यांच्या हस्ते विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडी रविवार, दिनांक १८ ऑगस्ट रोजी करण्यात आल्या.
महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष कल्याणराव दळे यांच्या नेतृत्वाखाली युवक प्रदेशाध्यक्ष सुरेंद्र कावरे, मराठवाडा अध्यक्ष युवराज शिंदे, जिल्हाध्यक्ष दिलीप झगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील कुणबी मराठा सभागृहात महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी येथील सामाजिक कार्यकर्ते हरीश वाघमारे यांनी कोविडच्या लॉकडाऊन काळात पुरवठा विभागाकडून गरजू लोकांना धान्य उपलब्ध करून दिले. नाभिक समाज बांधवांच्या घरोघरी जाऊन मोफत रेशनसाठी लागणारी कागदपत्रे जमा करून ती ऑनलाइन करून दिली. तसेच स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी आलेल्या रूग्णांना सर्वोतोपरी मदत केली. पोलीस स्टेशन तसेच इतर सरकारी कार्यालयात समाज बांधवांना मागील कार्यकाळात केलेल्या मदत व समाजकार्याची दखल घेत वरिष्ठांनी त्यांची महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या युवक जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड केली तर युवक जिल्हा उपाध्यक्षपदी गणेश राऊत, उपजिल्हाध्यक्षपदी वसंत माने, अंबाजोगाई तालुकाध्यक्षपदी दिपक सुरवसे, अंबाजोगाई युवक तालुकाध्यक्षपदी बालाजी वाघमारे, युवक शहराध्यक्षपदी श्रीनिवास कचरे, कर्मचारी संघटना तालुकाध्यक्षपदी राजकुमार वखरे आणि सोशल मीडिया अंबाजोगाई तालुकाध्यक्षपदी नागेश सावंत यांच्या निवडी नियुक्तीपत्र देवून करण्यात आल्या. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी श्रीरंग सुरवसे हे होते. नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र, पुष्पहार, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या. नवनिर्वाचित पदाधिकारी यांना देण्यात आलेल्या नियुक्तीपत्रात नमूद करण्यात आले आहे की, आपली समाजाप्रती असलेल्या सदभावनांची, संघटनात्मक कौशल्याची व महाराष्ट्र नाभिक महामंडळ, मुंबई प्रती असलेल्या दृढ विश्वासाची दखल घेवून आपली महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या पदावर महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष कल्याणराव दळे व कार्याध्यक्ष दामोदर बिडवे, प्रदेश सरचिटणीस पांडुरंग भवर, युवक प्रदेशाध्यक्ष सुरेंद्र कावरे, विभागीय अध्यक्ष युवराज शिंदे यांच्या आदेशाने नियुक्ती करण्यात येत आहे. सदरील नियुक्ती पुढील आदेशापर्यंत अबाधित असेल. नियुक्ती दरम्यान आपण महामंडळाची घटना, नियम, नियमावली अनुसरूनच कार्य करावे. जेणेकरून महामंडळाचा नांवलौकिक वाढेल. आपल्या नियुक्ती प्रित्यर्थ अभिनंदन..! यावेळी समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत मान्यवर, महामंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीचे सुत्रसंचालन बालाजी वाघमारे यांनी केले तर उपस्थितांचे आभार सामाजिक कार्यकर्ते कविराज कचरे यांनी मानले. या निवडी जाहीर होताच सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे सर्वस्तरांतून स्वागत व अभिनंदन होत आहे.