आपत्कालीन स्थितीत पीक व्यवस्थापन विषयावर शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रम संपन्न

आपत्कालीन स्थितीत पीक व्यवस्थापन विषयावर शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रम संपन्न
माळेगांव प्रतिनिधी / बळीराम लोकरे
माळेगाव/प्रतिनिधी: आपत्कालीन परिस्थितीमध्ये सोयाबीन पिकाचा वाण, पेरणी दिनांक, जमिनीचा प्रकार – पोत पीक यानुसार परिस्थिती वेगवेगळी असते. सोयाबीन पिकात मुख्यतः तीन प्रकारच्या अवस्था दिसून येत आहेत. त्यामध्ये फुले लागणे, पूर्ण फुलांची अवस्था व शेंगा लागण्यास सुरुवात. सोयाबीन पिकामध्ये फुले लागण्याची अवस्था अत्यंत संवेदनशील असते. ज्या ठिकाणी फुले लागण्यास सुरुवात झाली आहे, अशाच ठिकाणी १३:००:४५ या अन्नद्रव्याची १ टक्का या प्रमाणात फवारणी करावी. पिकामध्ये नियमित निरीक्षणे घ्यावीत, असे डॉ. वसंत सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.
दीनदयात शोध संस्थान कृषि विज्ञान केंद्र अंबाजोगाई व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा जिल्हा बीड यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद’ कार्यक्रमाचे आयोजन कृषी विज्ञान केंद्र अंबाजोगाई येथे दि २६ शनिवारी करण्यात आले होते. सध्या स्थितीमध्ये आपत्कालीन पीक व्यवस्थापन या विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना कृष्णा कर्डिले (पिकविद्या शास्त्रज्ञ) यांनी सांगितले की, जिल्ह्यामध्ये पर्जन्याचे असमान वितरण, सरासरी पेक्षा कमी पर्जन्य अशी परिस्थिती दिसून येत आहे. अशा कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांना पिकाचे व्यवस्थापन करता यावे, पिकाचे नुकसान पातळी कमी करता यावी यासाठी तंत्रज्ञान सुचवण्यासाठी शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी मंचावर उद्घाटक म्हणून अंबाजोगाई तालुका कृषी अधिकारी सूर्यकांत वडखेलकर विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र अंबाजोगाई येथील विस्तार कृषिविद्यावेत्ता डॉ. वसंत सूर्यवंशी, केज तालुका कृषी अधिकारी सागर पठाडे, कृषी विज्ञान केंद्र अंबाजोगाई चे वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रमुख डॉ.वसंत देशमुख यांची उपस्थिती होती.डॉ. वसंत सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, सोयाबीन पिकामध्ये वाण, पेरणीचा दिनांक, जमिनीचा प्रकार, जमिनीचा पोत यानुसार वेगवेगळी पीक परिस्थिती दिसून येते आहे. सध्या सोयाबीन पिकाच्या तीन वेगवेगळ्या अवस्था दिसून येत आहेत. त्यामध्ये फुले लागण्याची अवस्था, पूर्ण फुले लागलेली अवस्था व शेंगा लागायला सुरुवात झालेली अवस्था. सोयाबीन पिकात फुले लागण्याची अवस्था अत्यंत संवेदनशील असते. ज्या ठिकाणी शेंगा लागायला सुरुवात झाली आहे, अशाच ठिकाणी १३:००:४५ या अन्नद्रव्याची १ टक्का या प्रमाणात फवारणी करावी. तसेच शेतकऱ्यांनी पिकात नियमित फिरून किडीचे निरीक्षण करावे. पूर्ण फुलोऱ्यात असलेल्या सोयाबीन पिकात शक्यतो फवारणी करू नये. त्या ठिकाणी इमामेक्टीन बेंझोएट (१.९%) वापर करून अळ्यांचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास फवारणी करावे.कापूस पिकामध्ये गुलाबी बोंड अळीच्या व्यवस्थापनासाठी पेक्टिनो ल्युर कामगंध सापळे १५ ते २० प्रति एकर लावावे तसेच दहा हजार पीपीएम निमार्कची फवारणी करावी.
कीटक शास्त्रज्ञ डॉ प्रदीप सांगळे यांनी पिकातील किडरोग नियंत्रण करण्यासाठी उपयोजना सांगितल्या.
तज्ञांच्या मार्गदर्शनानंतर शेतकऱ्यांनी विचारलेल्या तुर, मूग, ऊस, गवारी, आद्रक, कापूस, भाजीपाला इत्यादी पिकातील विविध प्रश्नांला समाधानकारक उत्तरे देण्यात आली. शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवादामध्ये कृषी विज्ञान केंद्र, कृषी विद्यापीठ, कृषी विभाग व आत्मा यांचे शास्त्रज्ञ व अधिकारी यांनी सहभाग घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय समारोप करताना डॉ. वसंत देशमुख यांनी सांगितले की, सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी हताश न होता तज्ञांनी सांगितलेल्या तंत्रज्ञानाचा अवलंब करून आपल्या पिकाचे नुकसान टाळावे. पिकाविषयी काही समस्या असतील तर कृषी विज्ञान केंद्र, कृषी विद्यापीठ, कृषी विभाग येथील अधिकारी व शास्त्रज्ञ यांच्याशी संपर्क करावा, असे आव्हान त्यांनी यावेळी केले.
सर्व उपस्थितांचे आभार पशुविज्ञान शास्त्रज्ञ पशुविज्ञान डॉ. रवींद्र कोरके मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी विस्तार शास्त्रज्ञ
सुहास पंके यांनी केले.