अंबाजोगाईत समाजवादी पार्टी पदाधिकाऱ्यांच्या निवडी

अंबाजोगाई (प्रतिनिधी)
शहरातील संपर्क कार्यालयात समाजवादी पार्टी पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निवडींना महत्त्व प्राप्त झाले आहे. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे सर्वस्तरांतून स्वागत होत आहे.
समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबु आझमी, प्रदेश कार्याध्यक्ष प्रताप होगाडे, प्रदेश महासचिव परवेझ सिद्दिकी, प्रदेश महासचिव अब्दुल रऊफ, प्रदेश उपाध्यक्ष पी.डी.जोशी (पाटोदेकर) आणि महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष मायाताई चौरे यांच्या सुचनेवरून अंबाजोगाईत समाजवादी पार्टी पदाधिकाऱ्यांच्या निवडी मंगळवार, दिनांक ५ नोव्हेंबर रोजी पक्षाच्या संपर्क कार्यालयात करण्यात आल्या. समाजवादी पार्टीचे प्रदेश सचिव ऍड.शिवाजी कांबळे आणि जिल्हाध्यक्ष खमरूल ईमान खान यांनी नियुक्तीपत्र देवून महिला आघाडीच्या बीड जिल्हाध्यक्षपदी सालेहा जुलानी शेख, केज विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्षपदी शेख शौकत, केज तालुकाध्यक्षपदी ऍड.सयाजी साखरे, अंबाजोगाई तालुकाध्यक्षपदी शेख जिलानी, अंबाजोगाई शहराध्यक्षपदी राजेश मातादीन परदेशी आणि अंबाजोगाई उपशहराध्यक्षपदी शेख शाकेर यांच्या निवडी करण्यात आल्या आहेत. याबाबत नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना समाजवादी पार्टीचे प्रदेश सचिव ऍड.शिवाजी कांबळे यांनी सांगितले की, समाजवादी पार्टी हा पक्ष देशात तीन नंबरचा पक्ष आहे. आगामी काळात बेरोजगारी दूर व्हावी, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमी भाव मिळावा यासाठी केंद्र सरकार विरोधात समाजवादी पार्टी हा पक्ष आंदोलनाची भूमिका घेणार आहे. यासाठी आपल्याला पक्ष संघटना अधिक बळकट करायची आहे. जिल्हाध्यक्ष खमरूल ईमान खान यांच्या नेतृत्वाखाली नवनिर्वाचित पदाधिकारी व कार्यकर्ते अधिक जोमाने काम करतील अशी अपेक्षा प्रदेश सचिव ऍड.कांबळे यांनी व्यक्त केली. पदाधिकारी निवडी वेळी पक्षाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.