केवळ निवडणुका हरले म्हणून ‘कम्युनिस्ट’ विचारधारा संपली असे होत नाही – भाजप नेते माधव भंडारी
खोलेश्वर महाविद्यालयात "डाव्यांचा खरा चेहरा" पुस्तकाचा प्रकाशन सोहळा_

अंबाजोगाई प्रतिनिधी
कम्युनिस्ट केवळ राजकीय निवडणुका हरले म्हणून विषय संपला, कम्युनिस्ट विचारधारा संपली असे होत नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि डाव्यांचा प्रवास समांतर आहे. तरी परंतु, विविध संघर्षमय कृतींच्या माध्यमातून लोकशाहीत यश प्राप्त करणे हाच डाव्यांचा उद्देश आहे असे प्रतिपादन भाजपचे जेष्ठ नेते माधव भंडारी यांनी केले. ते अंबाजोगाई येथील खोलेश्वर महाविद्यालयात रविवार, दिनांक 16 ऑक्टोबर रोजी आयोजित “डाव्यांचा खरा चेहरा” या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलत होते.साहित्य निर्मितीतून राष्ट्रभक्तीचा संचार मनावर व्हावा, राष्ट्रीय विचारांची घुसळण होऊन साहित्य रसिकांचे प्रबोधन व्हावे या हेतूने साहित्य प्रेमी वाचकांसाठी लेखक माधव भंडारी (मुंबई) लिखित “डाव्यांचा खरा चेहरा” या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन येथील भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या खोलेश्वर महाविद्यालयात स्व.गोपीनाथराव मुंडे सभागृहात रविवार, दिनांक 16 ऑक्टोबर 2022 रोजी करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवक नंदकिशोर मुंदडा हे होते. यावेळेस टी.बी.गिरवलकर अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.आय.खडकभावी यांच्या हस्ते “डाव्यांचा खरा चेहरा” या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या प्रसंगी पुस्तकाचे लेखक माधव भंडारी यांचे व्याख्यान झाले. यावेळेस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत संयोजक प्रवीण सरदेशमुख,मराठवाडा साहित्य मंच बीडचे जिल्हा संयोजक प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे तसेच जिल्हा सहसंयोजक डॉ.निशिकांत पाचेगावकर या मान्यवरांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते भारत माता व सरस्वती देवी यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. या प्रसंगी बोलताना भाजपचे जेष्ठ नेते व पुस्तकाचे लेखक माधव भंडारी म्हणाले की, केरळ, त्रिपुरा आणि पश्चिम बंगाल या राज्यात कम्युनिस्टांची दीर्घकाळ सत्ता होती, कम्युनिस्ट केवळ निवडणुका हरले म्हणून विषय संपला, विचारधारा संपली असे होत नाही. कारण, हार जीत ही निवडणुकी पुरतीच असते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा व डाव्यांचा प्रवास समांतर आहे. 1925 सालच्या कम्युनिस्ट पक्षाच्या स्थापनेपासून ते आजपर्यंत त्यांनी जो संघर्ष केला, ते आपण विसरता कामा नये, कम्युनिस्टांकडून सोशल मिडीयाचा वापर, भारताची स्वातंत्र्य चळवळ, फाळणी वेळीची भूमिका, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महात्मा गांधी यांना लिहिलेल्या पत्राचा संदर्भ यावेळेस भंडारी यांनी दिला, 1947 साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ” यह आझादी झुठी है । ” असे कम्युनिस्ट म्हणाले होते. कम्युनिस्ट आणि निजाम, 1962 मध्ये चीनने भारतावर केलेल्या आक्रमणा वेळीची कम्युनिस्टांची भूमिका, 1925 पासून ते 2022 पर्यंत त्यांच्या वागणुकीत व भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही. “डाव्यांचा खरा चेहरा” हे पुस्तक पुराव्यांसह लिहिलेले आहे असे नमूद करून कम्युनिस्टांचा हाच चेहरा आहे, तोच या पुस्तकाच्या माध्यमातून दाखविण्याचा आपण प्रयत्न केला असल्याचे सांगून कार्यक्रमाच्या नेटक्या आयोजनाबद्दल मराठवाडा साहित्य मंचचे श्री.भंडारी यांनी कौतुक केले. प्रास्ताविक करताना प्रविण सरदेशमुख यांनी मागील चार वर्षांपासून साहित्य क्षेत्रामध्ये मराठी साहित्यातून राष्ट्रभक्ती निर्माण व्हावी या हेतूने मराठवाडा साहित्य मंच कार्यरत आहे असे सांगितले, साहित्य रूची असणारे सर्व लेखक, वाचक, श्रोता, प्रकाशक, साहित्यिक या सर्वांसाठी मराठवाडा साहित्य मंचची निर्मिती केली असल्याचे सांगून यावेळी त्यांनी कार्यकारिणीची घोषणा केली, या कार्यकारिणीत डॉ.कल्पनाताई चौसाळकर, आप्पाराव यादव, राजेंद्र शेप, नभाताई वालवडकर, डॉ.कमलाकर कांबळे, डॉ.निशिकांत पाचेगावकर, डॉ.देवीदास खोडेवाड यांचा समावेश आहे असे सांगून कम्युनिस्टांचा इतिहास, इच्छा, परंपरा, त्यांचा स्वभाव याबाबत सरदेशमुख यांनी मौलिक भाष्य केले. प्रास्ताविक झाल्यानंतर उपस्थित मान्यवरांचे संयोजकांकडून स्वागत करण्यात आले. तर यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत “डाव्यांचा खरा चेहरा” या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या प्रसंगी बोलताना प्राचार्य डॉ.बी.आय.खडकभावी यांनी कम्युनिस्ट पक्षाची स्थापना, कम्युनिस्टांची शिक्षण विषयक भूमिका, त्यांची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये शिक्षणाची सद्यस्थिती, भारतीय संस्कृती, नवीन शैक्षणिक धोरणावर देखिल त्यांनी भाष्य केले, देशातील सर्व चार ही दाक्षिणात्य भाषेतून या पुस्तकाचे भाषांतर करावे अशी अपेक्षा व विनंती प्राचार्य डॉ.खडकभावी यांनी केली. अध्यक्षीय समारोप करताना ज्येष्ठ समाजसेवक नंदकिशोर मुंदडा यांनी गोरगरीब, गरजू मुलांच्या शिक्षणासाठी सातत्यपूर्ण धडपड करणारे प्राचार्य डॉ.बी.आय.खडकभावी यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले आहे हे स्वागतार्ह असून, श्री.भंडारी यांनी स्वानुभवातून या पुस्तकाचे लेखन केले, समाजात संवाद झाला पाहिजे, वैचारिक मंथन केले पाहिजे, भारतीय स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही ‘नक्षलवाद’ अस्तित्वात आहे यावर चिंतन होणे गरजेचे आहे, त्यामुळे या पुस्तकाचे सर्वत्र वाचन झाले पाहिजे, समाजात नेमके काय चालले आहे याचा विचार या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याच्या माध्यमातून मिळाला, आपले मत आपण निर्भिडपणे मांडायला शिकले पाहिजे असे श्री.मुंदडा यांनी सांगितले, वैयक्तिक पद्य जयेंद्र कुलकर्णी यांनी सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र शेप यांनी केले, तर उपस्थितांचे आभार डॉ.निशिकांत पाचेगावकर यांनी मानले. या कार्यक्रमासाठी माजी प्राचार्य रा.गो.धाट, प्रा.डॉ.शरदराव हेबाळकर, विजयराव वालवडकर,अप्पाराव यादव,डॉ.गोपाळ चौसाळकर, नारायण केंद्रे, आबा नरवडे, अविनाशराव तळणीकर, रामभाऊ कुलकर्णी, हिंदूलाल काकडे, बिपिनदादा क्षिरसागर, अच्युतराव गंगणे आदी मान्यवरांसह साहित्य प्रेमी नागरिकांची या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी उपस्थिती होती