समाज जागृतीतून होते राष्ट्राची सुधारणा – ज्येष्ठ पत्रकार डॉ.उदय निरगुडकर यांचे प्रतिपादन
साहित्य निकेतन ग्रंथालयाचा उपक्रम ; उध्दवराव आपेगांवकर यांच्या पखवाज वादनाने श्रोते मंत्रमुग्ध

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
महाराष्ट्र राज्य विशेष (अंबाजोगाई) प्रतिनिधी
आज समाजात संघ भावना राहिली नाही, अशी खंत व्यक्त करून डॉ.निरगुडकर यांनी प्रत्येकजन माझे कुटूंब व त्याचा वैयक्तिक विकास या गोष्टीवरच लक्ष केंद्रीत करतो आहे. त्याचा परिणाम सांघिक भावना ढासळली आहे. आज समष्टी विकासाऐवजी वैयक्तिक विकासाकडेच वाटचाल सुरू आहे, हे चित्र बदलले गेले पाहिजे, संघ भावना वाढीस लागावी यासाठी जाणिवपूर्वक प्रयत्न झाले पाहिजेत अशी अपेक्षा व्यक्त करून समाज जागृतीतून होते राष्ट्राची सुधारणा असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार डॉ.उदय निरगुडकर यांनी केले. ते अंबाजोगाईत बोलत होते.
शहरातील साहित्य निकेतन ग्रंथालय, अंबाजोगाई यांच्या वतीने प्रसिद्ध पत्रकार तथा अभ्यासू वक्ते उदय निरगुडकर यांच्या व्याख्यानाचे व जागतिक किर्तीचे पखवाज वादक उध्दवराव बापू आपेगांवकर यांच्या मंगलमय पखवाज वादनाचे आयोजन मंगळवार, दिनांक २२ ऑक्टोबर रोजी करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खोलेश्वर शैक्षणिक संकुलाचे कार्यवाह किरण कोदरकर तर व्यासपीठावर साहित्य निकेतन ग्रंथालयाचे कार्यवाह शंतनू हिरळकर हे होते. प्रारंभी दीपप्रज्ज्वलन आणि भारतमातेच्या प्रतिमापूजनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत दीनदयाळ बॅंकेचे अध्यक्ष ऍड.मकरंद पत्की, शंतनू हिरळकर, अमोल जड व अक्षय खडके यांनी केले. सुरूवातीला पं.उध्दवराव बापू आपेगांवकर यांनी पखावज वादनाचा इतिहास, महत्त्व विशद केले. पखावज वादन क्षेत्रात आपण दादागुरू मख्खनजी भैय्या, पद्मश्री शंकरराव आपेगांवकर यांची परंपरा पुढे चालवत आहोत हे सांगून त्यांनी परण, पदन्यास, निकास, चाल, नाद, गजर, शब्दांचे वजन आणि लयकारी याबाबत माहिती देत. सुश्राव्य पखावज वादनाने उपस्थित रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. त्यानंतर प्रास्ताविक करताना शंतनू हिरळकर यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेले अंबाजोगाईतील वैभवशाली ग्रंथालय साहित्य निकेतनने नुकतेच ८० व्या वर्षांत पदार्पण केले आहे. त्यानिमित्त समाजामध्ये पुस्तक प्रेम वृद्धिंगत व्हावे, समाजातील सांस्कृतिक व चिंतनशील विचारांची देवाण – घेवाण वाढावी या हेतूने साहित्य निकेतन ग्रंथालय आपल्या परीने विशेष प्रयत्न करीत आहे. अशाच एक प्रयत्नांतून यावर्षी ऑगस्ट महिन्यात गीत रामायणाचे रचयिते व प्रख्यात साहित्यिक, कवी, गीतकार ग.दि.माडगूळकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेली रसाळ कृष्ण कथा “गीत गोपाल”चा संगीतमय कार्यक्रम आयोजित केला होता. त्याला अंबानगरीतील सुजाण नागरिक, रसिक श्रोत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. पुन्हा एकदा असाच एक वेगळा विषय घेऊन आज आम्ही आपल्यासमोर आलो आहोत असे हिरळकर यांनी सांगितले. अध्यक्षीय समारोप करताना किरण कोदरकर यांनी साक्षरतेचे प्रमाण जास्त असलेल्या ठिकाणी मतदानाची टक्केवारी कमी तर जिथे विकास पोहोचला नाही अशा मागास भागात मतदानाची टक्केवारी अधिक आहे याकडे सभागृहाचे लक्ष वेधले. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून ‘विकसित भारतासाठी महाराष्ट्राचे योगदान’ या विषयावर बोलताना डॉ.निरगुडकर म्हणाले की, पुढील पाच वर्षात विकास दर व नाविन्यतेची गती कायम ठेवली तर विकसित भारत व्हायला आणि ते आपण प्रत्यक्ष पाहायला वेळ लागणार नाही, आताचा भारत बदलला आहे. २०४७ मध्ये हाच भारत अधिक सामर्थ्यवान राहील, असा विश्वास व्यक्त करून डॉ.निरगुडकर म्हणाले, नीती, गती, दिशा हे केंद्रबिंदू मानून विद्यमान केंद्र सरकारने देशवासियांचा विश्वास संपादन केला आहे. पारंपरिक उद्योगाला नाविन्यतेची जोड देणे गरजेचे आणि त्यासाठी संघटितपणे प्रयत्न व्हायला हवेत, धैर्यवान अन् बलशाली समाजच बलवान राष्ट्र निर्मितीस कारणीभूत ठरणार आहे असे सांगून डॉ.निरगुडकर यांनी सद्य:स्थितीवर अत्यंत परखडपणे मते व्यक्त केली. यथा राजा तथा प्रजा हे सूत्र आता राहिलेले नाही, तर यथा प्रजा तथा राजा हे लोकशाहीचे वैशिष्ट्य ठरले आहे, असे ते म्हणाले. समाज व्यवस्थेत स्वतःवरच्या जबाबदार्या पध्दतशीरपणे झटकण्याचे काम प्रत्येकामार्फत दिवसेंदिवस सुरू आहे. ते एवढे की, राज्य व देश चालविण्याकरीता सुध्दा ठेकेदारी दिल्याचा आव समाज आणतो आहे. त्यातून स्वतःची जबाबदारी समाज पध्दतशीरपणे टाळतो आहे. समाजाचे हे वर्तन पूर्णतः चुकीचे आहे. समाज दिवसेंदिवस अलिप्तवादी भूमिका घेतो आहे. त्यातून अनेक प्रश्न उद्भवत आहेत, चिघळत आहेत. समाजाने अलिप्तवादीपणाचे धोरण सोडले पाहिजे, सक्रियता वाढवली पाहिजे, समाजाभिमुख विषयांमध्ये लक्ष केंद्रीत केले पाहिजे, वेळप्रसंगी रोखठोक भूमिका घेतल्या पाहिजेत, जाब विचारला पाहिजे, तरच सुधारणेकडे आपण वाटचाल करू, आमूलाग्र असा बदल करू, असा विश्वास व्यक्त करतेवेळी निरगुडकर यांनी आज समाजात संघ भावना राहिली नाही, अशी खंत व्यक्त केली. प्रत्येकजण माझे कुटूंब व त्याचा वैयक्तिक विकास या गोष्टीवरच लक्ष केंद्रीत करतो आहे. त्याचा परिणाम सांघिक भावना ढासळली आहे. आज समष्टी विकासाऐवजी वैयक्तिक विकासाकडेच वाटचाल सुरू आहे, हे चित्र बदलले पाहिजे, संघ भावना वाढीस लागावी यासाठी जाणिवपूर्वक प्रयत्न झाले पाहिजेत, अशी अपेक्षाही व्यक्त केली. विकसित राष्ट्राची संकल्पना विकसित समाजाशिवाय कदापिही शक्य नाही, असे स्पष्ट करतेवेळी डॉ.निरगुडकर यांनी सत्तेतून विकास होण्यापेक्षापेक्षा समाज जागृतीतून राष्ट्राची सुधारणा हीच शाश्वत सुधारणा आहे, असे म्हटले. जपान, जर्मनी, इंग्लंड आदी देश याचे उत्तम उदाहरण आहे, असे ते म्हणाले. देशावर सत्ता कोणाची यापेक्षा त्या देशातील नागरीक किती उद्यमशील व राष्ट्रभक्त आहेत, यावर त्या देशाची उन्नती ठरते, नागरीकांच्या प्रत्येक कृतीतून राष्ट्रहीताची भावना जोपासली जाणे त्यासाठी महत्वाचे ठरते, असे नमूद करतेवेळी भारतासोबत स्वतंत्र झालेल्या इतर राष्ट्रांच्या तूलनेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे देशातील लोकशाही व्यवस्था सुरूवातीपासूनच प्रगल्भ राहिली. त्या लोकशाही व्यवस्थेमुळेच नजीकच्या काळात देशाची विकसित राष्ट्राकडील वाटचाल वेगाने व दमदारपणे होत आहे, हे मान्य करावेच लागेल, असेही ते म्हणाले. राष्ट्रीय शिक्षण धोरणात इतिहासकालीन अनेक गोष्टी तथ्यांशाने न शिकविता विपरित इतिहास शिकविला गेला. त्यामुळे देशाला मिळालेले स्वातंत्र्य हे थोर स्वातंत्र्यसैनिकांच्या दूरदृष्टीचा परिणाम आहे. व ते मिळालेले स्वातंत्र्य जोरकसपणे राखून जागतिक व्यापारामध्ये भारताचे स्थान पुन्हा वाढविण्याची जबाबदारी येणार्या पिढीवर आहे, स्वातंत्र्यानंतर आपल्या प्रगतीची दिशा व केंद्रबिंदू चुकले, त्याचे परिणाम ३ पिढ्यांनी भोगले असेही ते म्हणाले. आपल्या भाषणातून डॉ.निरगुडकर यांनी लोकाभिमुख आणि विकासाभिमुख भूमिका, देशातच वेगवेगळ्या क्षेत्रात अत्यंत प्रामाणिकपणे, जिद्दीने, चिकाटीने संशोधनासह सर्व क्षेत्रात आपल्या महाराष्ट्रातील तरूण अभियंते, डॉक्टर व संशोधक हे दुरगामी विकास कामात योगदान देत आहेत याबाबत समाधान व्यक्त केले. गतवैभव मिळवण्यासाठी प्रत्येकाला पुढाकार घ्यावा लागेल, शंभर टक्के मतदान करा, फुकट काहीही देवू नये, आपल्याला रेवडीबाज कल्चर नकोय तर आंतरराष्ट्रीय प्रतिमा असलेले नेतृत्व हवे आहे. देशाचा अभिमान वाटेल असे तथ्य व सत्य आपल्यापर्यंत पोहचू दिले जात नाही. फेक नरेटिव्ह पसरवला जातोय, सोशल मीडिया, विचारवंत आणि कलावंत यांना हाताशी धरून समाजातील युवकांना आणि कर्तृत्ववान लोकांना गुमराह केले जात आहे. नुकतेच श्रीलंका व बांग्लादेशात हेच घडले आहे. त्यामुळे एक देश व एक समाज म्हणून आपण एक झाले पाहिजे असे आवाहन डॉ.निरगुडकर यांनी केले. यावेळी दत्तप्रसाद गोस्वामी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तर कौस्तुभ कोदरकर यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. तर प्रा.सागर कुलकर्णी यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाची सांगता प्रख्यात गायक जयेंद्र कुलकर्णी यांनी सादर केलेल्या पसायदानाने झाली. या कार्यक्रमास अंबाजोगाई शहर व परिसरातील शिक्षण, सामाजिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, साहित्य, पत्रकारिता, क्रीडा, सहकार, संगीत, उद्योजक, व्यापार क्षेत्रातील मान्यवरांसह नागरिक, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी साहित्य निकेतन ग्रंथालयाच्या वतीने पुढाकार घेण्यात आला.